म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करणे हा सध्या लोकप्रिय असा गुंतवणुकीचा पर्याय बनला आहे. मागील महिन्यात प्रथमच म्युच्युअल फंडात रेकॉर्ड ब्रेक 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. एक शिस्तप्रिय बचतीचा पर्याय म्हणून तरुणाई SIP म्हणजेच Systematic Investment Plan ला पसंती देताना दिसत आहे.
तुम्ही देखील आतापर्यंत म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली नसेल तर याबद्दल नक्कीच विचार करा. यासोबतच गुंतवणूक करताना नॉमिनी डीटेल्स देणे विसरू नका. जर तुम्ही नॉमिनी डीटेल्स दिले नाहीत तर भविष्यात तुम्हांला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊयात नॉमिनी डीटेल्स देणे का महत्वाचे आहे.
नॉमिनेशन महत्वाचे
जर तुम्ही म्युच्युअल फंडातही पैसे गुंतवले तर कंपनीला तुम्हाला नॉमिनेशनबद्दल माहिती देणे आवश्यक आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत देशभरातील ग्राहकांना SEBI ने त्यांचे नॉमिनी जाहीर करण्यास सांगितले होते. आता ही मुदत 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच जे गुंतवणूकदार नॉमिनी डीटेल्स सादर करणार नाहीत त्यांचे म्युच्युअल फंड खाते बंद केले जाईल असे देखील सेबीने म्हटले होते.
का द्यायचे नॉमिनेशन?
म्युच्युअल फंड फोलिओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे जर अचानक निधन झाले आणि त्याने दावेदार म्हणून कुणाचेही डीटेल्स दिले नसल्यास कंपन्यांना गुंतवणूकदारांच्या पैशाचे काय करायचे हा प्रश्न असतो. केवायसी डीटेल्स कंपन्यांकडून भरून घेतले जात असले तरी गुंतवणूकदाराच्या मृत्यूपश्चात गुंतवलेल्या रकमेचे काय करायचे हा मोठा पेच निर्माण होत असतो. एका ठराविक कालावधीनंतर ही रक्कम रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे वळवण्यात येते. मागीलवर्षी तब्बल 35,000 कोटींच्या आसपास रक्कम (Unclaimed Deposits) सरकारजमा करावी लागली होती.
किती नॉमिनी देता येतात?
म्युच्युअल फंडासाठी जास्तीत जास्त 3 आणि कमीत कमी 1 नॉमिनी दिले जाऊ शकतात. म्युच्युअल फंड कंपनीत गुंतवणूक करताना नॉमिनी व्यक्तीचे नाव, गुंतवणूक दाराचा सदर नॉमिनीसोबत असलेले नाते तसेच गुंतवणुकीत किती टक्के हिस्सा दिला जावा याबाबतचे तपशील द्यावे लागतात.
एकदा दिलेले नॉमिनी डीटेल्स गुंतवणूकदाराला बदलता देखील येतात. ही प्रक्रिया अगदीच सोपी आहे. गुंतवणूकदार मोबाईल ॲपद्वारे किंवा थेट म्युच्युअल फंड कंपनीत जाऊन नॉमिनी डीटेल्स देऊ शकते अथवा बदलू शकते.