Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आरबीआयने अभ्युदय सहकारी बँकेवर का केली कारवाई? खातेदारांवर काय होणार परिणाम? जाणून घ्या

Abhyudaya Co-operative Bank Ltd

आरबीआयद्वारे अभ्युदय सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यानंतरही बँकेचे व्यवहार सुरळीतपणे चालू राहतील.

आरबीआयद्वारे सातत्याने खराब प्रशासनामुळे बँकांवर कारवाई केली जात आहे. आता या यादीमध्ये अभ्युदय सहकारी बँकेचा समावेश झाला आहे. आरबीआयने अभ्युदय सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयद्वारे ही कारवाई का करण्यात आली व याचा बँकेच्या खातेदारांवर काय परिणाम होणार? याविषयी जाणून घेऊया.

आरबीआयने अभ्युदय सहकारी बँकेवर का केली कारवाई?

आरबीआयने अभ्युदय सहकारी बँकेचे संचालक मंडळ 12 महिन्यांसाठी बरखास्त केले आहे. आरबीआयनुसार संचालक मंडळाद्वारे बँकेतील अयोग्य प्रशाकीय कार्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयद्वारे बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 56 अंतर्गत ही कारवाई केली आहे. 

संचालक मंडळ बरखास्त करण्यासोबतच प्रशासकीय कार्यासाठी इतर नेमणुका देखील करण्यात आल्या आहेत. आरबीआयने सत्यप्रकाश पाठक यांची बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. पाठक हे एसबीआयचे माजी मुख्य महाव्यवस्थापक आहेत. त्यांच्यासह सल्लागार समितीची देखील नेमणूक करण्यात आली आहे. कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले, एसयबीआयचे माजी महाव्यवस्थापक व्यंकटेश हेगडे आणि चार्टर्ड अकाउंटंट महेंद्र छाजेड यांचा समावेश आहे.

खातेदारांवर काय परिणाम होणार?

आरबीआयद्वारे केवळ बँकेच्या संचालक मंडळावर कारवाई करण्यात आली आहे. बँकच्या कार्यावर कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाही. व्यावसायिक निर्बंध लादण्यात आलेले नसल्याने याचा खातेदारकांवर कोणताही परिणाम होणार नाही.

आरबीआयनुसार, खातेदारांसाठी नेहमीप्रमाणेच बँकेची कार्य सुरू राहतील. खातेदार नेहमीप्रमाणेच बँकेच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करू शकतील.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आरबीआयने अभ्युदय बँकेचे लायसन्स रद्द केल्यासंदर्भातील मेसेज व्हायरल होत होता. मात्र, अशी कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नसल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.

1965 पासून बँकेची सुरुवात 

वर्ष 1964 साली 5 हजार रुपयांच्या भांडवलातून अभ्‍युदय सहकारी पतपेढीची सुरुवात झाली होती. पुढे 1965 साली याचेच रुपांतर अभ्‍युदय सहकारी बँक लिमिटेडमध्ये करण्यात आले. सप्टेंबर 1988 साली आरबीआयद्वारे अभ्युदयला 'अनुसूचित बँकेचा दर्जा देण्यात आला.

बँकेच्या वेबसाइटनुसार महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यात बँकेच्या शाखा पसरलेल्या आहेत. या बँकेच्या 109 शाखा व 113 एटीएम कार्यरत आहेत. तसेच, 31 मार्च 2020 पर्यंत बँकेचे 2.23 लाख पेक्षा अधिक सभासद व 17.30 लाख ठेवीदार आहेत. याच कालावधीपर्यंत 10 हजार कोटींपेक्षा अधिक ठेवी व 6,654 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यात आले.