Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund SIP Types: एसआयपीचा कोणता प्रकार तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो?

Types of SIP

Mutual Fund SIP Types: सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमुळे (एसआयपी) अनेकांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीची आणि बचतीची सवयसुद्धा लागली आहे. पण अनेकांना अजूनही एसआयपीचा एकच प्रकार माहिती आहे आणि बहुतांश गुंतवणूकदार त्याचाच वापर करतात. तर आज आपण एसआयपीच्या 7 प्रकारांबद्दल जाणून घेणार आहोत.

Mutual Fund SIP Types: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वांत सोपा आणि प्रचलित मार्ग म्हणजे एसआयपी (नियोजनबद्ध गुंतवणूक). एसआयपीमुळे अनेकांना लहान रकमेपासून गुंतवणूक करणे शक्य झाले. तसेच शेअर मार्केट किंवा इक्विटीमध्ये पैसे गुंतवणे प्रत्येकालाच शक्य नसते. पण एसआयपीमुळे अनेकांना म्युच्युअल फंडच्या मार्गाने इक्विटीमध्ये  पैसे गुंतवणे शक्य झाले.

सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमुळे (एसआयपी) अनेकांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीची आणि बचतीची सवयसुद्धा लागली आहे. पण अनेकांना अजूनही एसआयपीचा एकच प्रकार माहिती आहे आणि बहुतांश गुंतवणूकदार त्याचाच वापर करतात. तर एसआयपीचे अजून बरेच प्रकार उपलब्ध आहेत. त्याचा योग्य पद्धतीने वापर केला तर आर्थिक उद्दिष्ट पूर्ण  होण्यास मदत होईल. एसआयपीच्या विविध प्रकारांपैकी आपण 7 प्रकारांबद्दल जाणून घेणार आहोत.

एसआयपीचे प्रकार

नियमित एसआयपी (Regular SIP)

रेग्युलर किंवा नियमित एसआयपी हा सर्वाधिक वापरला जाणारा एसआयपीचा प्रचलित प्रकार आहे. या गुंतवणूक प्रकारामध्ये गुंतवणूकदार एक ठराविक रक्कम नियमितपणे गुंतवत असतो.  यामध्ये गुंतवणूकदार प्रत्येक महिन्याला, दोन महिन्यांनी, तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा वर्षाने पैसे गुंतवू शकतो. या पद्धतीने दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक केल्यास त्याचा चांगला परतावा गुंतवणूकदारांना मिळतो. तसेच छोट्या गुंतवणुकीतून मोठी संपत्तीदेखील निर्माण करता येऊ शकते.

फ्लेक्सीबल एसआयपी (Flexible SIP)

फ्लेक्सीबल एसआयपी हा प्रकार गुंतवणूकदाराला पद्धतशीर गुंतवणुकीमध्ये गुंतवणुकीचे स्वातंत्र्य देतो. ज्यांचे उत्पन्न अनियमित आहे; त्यांच्यासाठी हा प्रकार फायदेशीर ठरू शकतो. यामध्ये गुंतवणूकदाराला त्याच्या सोयीनुसार गुंतवणूक सुरू करण्याचे आणि थांबवण्याचे किंवा गुंतवणुकीची रक्कम वाढवण्याचे आणि कमी करण्याचे स्वातंत्र्य असते. पण असे बदल करण्यापूर्वी ते संबंधित कंपनीला वेळेत कळवणे गरजेचे असते.

टॉप-अप एसआयपी (Top-up SIP)

टॉप-अप एसआयपी हा प्रकार स्टेप-अप एसआयपी म्हणूनही ओळखला जातो. या प्रकारामध्ये गुंतवणूकदार ठराविक कालावधीने गुंतवणुकीची रक्कम वाढवू शकतो. वाढीव एसआयपी प्रत्येक महिन्याने किंवा वर्षाने वाढवता येते. उदाहरणार्थ, सध्या तुमची प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयांची एसआयपी सुरू आहे आणि तुम्ही ती 10 टक्के टॉप-अपने वाढवू इच्छित आहात. तर पुढच्या वर्षी तुमची एसआयपी 11 हजारांची होईल.

Benefits of SIP

ट्रिगर एसआयपी (Trigger SIP)

ट्रिगर एसआयपी ही बाजारातील घडामोडींवर अवलंबून असते. म्हणजे बाजारावर एखाद्या घटनेचे प्रतिसाद उमटत असतील तर अशावेळी जास्तीचे एनएव्ही विकत घेणे किंवा त्यांची विक्री केली जाते, त्याला ट्रिगर एसआयपी म्हणतात. पण यासाठी मार्केटचे ज्ञान आणि माहिती असणे आवश्यक आहे.

मल्टी एसआयपी (Multi SIP)

मल्टी एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदाराला एकाच म्युच्युअल फंड कंपनीतील वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते. तसेच यासाठी गुंतवणूकदाराला वेगवेगळ्या एसआयपीसुद्धा कराव्या लागत नाहीत. एकाच एसआयपीच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्कीममध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा या प्रकारात आहे. उदाहरणार्थ तुम्ही मल्टी एसआयपीच्या माध्यमातून 10 हजार रुपये 5 वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवू शकता.

निरंतर एसआयपी (Perpetual SIP)

निरंतर एसआयपी ही रेग्युलर एसआयपीप्रमाणेच असते, फक्त यामध्ये गुंतवणुकीचा कालावधी फिक्सड् नसतो. या एसआयपी प्रकारामध्ये गुंतवणूकदार जोपर्यंत एसआयपी थांबवण्याची किंवा बंद करण्याची सूचना करत नाही. तोपर्यंत ही गुंतवणूक सुरू राहते. या प्रकारातून गुंतवणूकदारा दीर्घकालीन गुंतवणुकीतून चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो.

इन्शुरन्स आणि एसआयपी (SIP with Insurance)

या प्रकारातून गुंतवणूकदाराला एसआयपी आणि इन्शुरन्स (Insurance) असे दोन्ही लाभ मिळतात. गुंतवणूकदाराला गुंतवणुकीच्या रकमेसह  त्या म्युच्युअल फंड कंपनीकडून विमा संरक्षण मिळते. हा प्रकार काही ठराविक म्युच्युअल फंड कंपन्यांद्वारे पुरवला जातो. यामध्ये गुंतवणूकदाराचा गुंतवणूक सुरू असलेल्या कालावधीत अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला विमा अंतर्गत एक ठराविक रक्कम दिली जाते. विम्या अंतर्गत मिळणारी रक्कम ही एसआयपीच्या रकमेवर आधारित असते.

एसआयपीचा बेस्ट प्रकार कोणता?

कोणताही एक प्रत्येकासाठी योग्य ठरू शकत नाही. प्रत्येक गरजा आणि उद्दिष्ट वेगवेगळी असल्याने त्याचा वापरही प्रत्येकासाठी वेगळा ठरू शकतो. गुंतवणूकदाराने आपली गरज, उत्पन्नाची मर्यादा आणि आर्थिक उद्दिष्ट गृहित धरून त्यानुसार एसआयपीची निवड करावी. उपलब्ध माहितीनुसार, रेग्युलर एसआयपी ही नियमित उत्पन्न असणाऱ्या सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे आणि त्यातून त्यांना फायदाही होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार आपल्या सोयीचा एसआयपी प्रकार निवडावा.

(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)