मान्सून महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावर येऊन ठेपला आहे. मान्सून वेळेवर दाखल झाल्याने अर्थव्यवस्थेला गती मिळते. सर्वच वस्तू आणि सेवांच्या (goods and services) बाजारपेठांना यंदा अधिक व्यवसाय करता येण्याची अपेक्षा आहे. कोविडमुळे विस्कळितपणाच्या पार्श्वभूमीवर, अधिक पाऊस हा भारतीय व्यवसाय (Business) आणि अर्थव्यवस्थेसाठी (economy) खूप साहाय्य करणारा ठरेल अशी अपेक्षा आहे.
मान्सून भारतासाठी का महत्वाचा आहे
भारतातील ६० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. पाऊस अधिक झाला आणि पीक जोमदार आलं तर देशातल्या शेतकऱ्याला स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी त्याची आर्थिक बाजू भक्कम होऊ शकते. हातात पैसे आल्याने शेतकरी शेतीसाठी आणि कुटुंबासाठी खुल्या हाताने खर्च करू शकेल. तसेच कारखान्यात तयार होणारी उत्पादने आणि सर्व प्रकारच्या सेवांसाठी ग्रामीण भागात खरेदी शक्ती (purchasing power) निर्माण होण्यात मान्सूनचा मोठा हातभार आहे. हा पाऊस अधिक झाला तर एक सकारात्मक आर्थिक चक्र (financial cycle) सुरू होतं. त्याचा लाभ एकूण देशभरात होतो. भारतात अनेक भागांत पाऊस आणि पाणीपुरवठ्यात सातत्य असल्याने तेथील शेती बहरून एकूणच त्या भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली हे पाहता येतं. यंदा मान्सून वेळेआधी दाखल होण्याचा अंदाज सुरुवातीपासून वर्तवण्यात आला होता. त्यादृष्टीने शेतकरी आपल्या कमला लागले आहेत. आता फक्त मान्सून कधी बरसणार याची वाट पाहत आहे. मान्सून देशातल्या बाजारांपेठांवर, उद्योग – व्यापारावर, वस्तूच्या उपलब्धतेवर परिणाम करतो. तो कसा परिणाम करतो याची माहिती आपल्याला एक ग्राहक म्हणून असणं आवश्यक आहे.
फूड इंडस्ट्री
देशभरात अन्नधान्याचे उत्पादन आणि वितरण हा मोठा व्यवसाय आहे. अन्नधान्य हे संपूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. अन्नधान्य किंवा अन्नधान्यावर प्रक्रिया करणारे उद्योग हे शेतीतून येणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून असतात. फूड इंड्रस्टीसाठी (food industry) लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती या शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अवलंबून असतात. पावसाने शेतीचे उत्पादन वाढले तर फूड इंड्रस्टीला आणि पर्यायाने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
शेतीशी निगडित व्यवसाय
पावसाच्या आगमनावर बी-बियाणं, खतं, कीटकनाशकं, पाणीपुरवठ्याशी संबंधित उत्पादनं, ट्रॅक्टर आणि शेतीतील यंत्रसामग्री असे अनेक उद्योग अवलंबून असतात. शेतमालाचे वाहतूकदार, उत्पादित शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग असे अनेक व्यवसायही त्यावर अवलंबून असतात. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. त्यातही विस्ताराला वाव आहे.
वाहतूक, गृहनिर्माण
भारताच्या ग्रामीण भागातही घरबांधणी मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. चांगली घरं, सर्व सुविधांनी युक्त वसाहती सर्वदूर दिसू लागल्या आहेत. शेतीवर आधारित ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत राहिली तर घर खरेदी, वाहन खरेदी यांना अधिक चालना मिळते. किचन आणि होम अप्लायन्सेसपासून अनेक प्रकारच्या वस्तूंची विक्री वाढते, लग्नकार्ये, पर्यटन या निमित्ताने अधिक प्रमाणात लोक बाहेर पडतात.
व्यवसायासाठी इंटरनेटचा वापर
आता इंटरनेटमुळे देशाच्या कुठल्याही भागातील शेतमालाचे बाजारभाव कळू लागले आहेत. त्यामुळे दूरवरच्या बाजारपेठांमध्येही शेतमाल पुढील प्रक्रियेसाठी पाठवला जाण्याचं प्रमाण वाढत आहे. साहजिक त्याने वाहतूक व्यावसायिकांना लाभ होतो. ऑनलाईन सेवांमुळे वस्तू आणि सेवांच्या विक्रेत्यांवरची भौगोलिक मर्यादा संपुष्टात आली आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून वस्तूला ग्राहक मिळतो. ग्रामीण भागात बाजारपेठांची सुविधा कमी प्रमाणात असल्याने वस्तू ऑनलाईन मागवण्याचे प्रमाण वाढताना दिसते.
बॅंका आणि वित्तीय सेवा
ग्रामीण भागातील बॅंका आणि वित्तीय सेवा देणाऱ्या संस्थांचे जाळे (network) अतिशय विस्तृत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदत करतील अशा वित्तीय सेवा त्यांच्याकडून दिल्या जातात. हे सगळे नेटवर्क ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते. जिथे अधिक सुबत्ता आहे अशा ग्रामीण भागातून गुंतवणुकीला चालना मिळते. वेगवेगळ्या निमित्ताने दागिने, महाग वस्तूही खरेदी केल्या जातात.
मान्सून व्यवसायांवर कसा परिणाम करतो याची वर काही मोजकीच उदाहरणे दिलेली आहेत. या पलीकडेदेखील विविध प्रकारे मान्सूनचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतात. वेळेवर आणि नियमित पाऊस होणं हे ग्रामीण भारतासाठीच नाही तर एकूणच अर्थव्यवस्थेसाठी आणि प्रत्येकासाठी आवश्यक आहे.