आपल्यापैकी प्रत्येकाची इच्छा असते की, आपले स्वतःचे हक्काचे घर असावे. मात्र सध्या रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रॉपर्टीचे (Real Estate Property) दर प्रचंड प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे एकरकमी पैसे देऊन प्रॉपर्टी खरेदी करणे, आता प्रत्येकालाच शक्य नाही. घर खरेदी करणे ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठी आर्थिक गुंतवणूकच म्हणावी लागेल. लोकांचे हेच स्वप्न साकार करण्यासाठी बँकांकडून गृह कर्ज (Home Loan) उपलब्ध करून दिले जाते. या सुविधेअंतर्गत लोक थोड्या रकमेचे डाऊन पेमेंट करून उर्वरित रकमेचे कर्ज बँकेकडून घेतात.
प्रत्येक बँकेचा गृह कर्जावरील व्याजदर हा वेगवेगळा असतो. हे कर्ज घेतल्यानंतर कर्जदार महिन्याला ठराविक रकमेचा हप्ता बँकेला व्याजासहित परत करतो. गृह कर्ज हे दीर्घकालीन मुदतीचे कर्ज आहे. या कर्जावरील व्याजदर जितका कमी तितके हे कर्ज लवकरात लवकर फेडणे शक्य असते. सध्या देशातील कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank), ॲक्सिस बँक (Axis Bank) आणि युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) गृह कर्जाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. जर तुम्हीही नवीन घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कोणत्या बँकेतून गृह कर्ज घेतल्यावर सर्वात कमी व्याजदर मिळेल आणि सर्वात कमी ईएमआय भरावा लागेल, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
गृह कर्जावरील बँकांचा व्याजदर जाणून घ्या
खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) आपल्या ग्राहकांना गृह कर्जाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. ही बँक गृहकर्जावर 8.75 % पर्यंत व्याजदर आकारते. तर गृह कर्जाची प्रक्रिया करण्यासाठी बँकेकडून 2% प्रोसेसिंग फी घेतली जाते. या बँकेकडून 25 लाखांचे गृह कर्ज 20 वर्षाच्या मुदतीवर घेतले, तर ग्राहकांना मासिक 22,093 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.
देशातील नामांकित ॲक्सिस बँक (Axis Bank) देखील आपल्या ग्राहकांना गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. ही बँक ग्राहकांना 9% गृहकर्जावर व्याजदर आकारत आहे. या बँकेतून ग्राहकांनी 25 लाखांचे गृह कर्ज 20 वर्षाच्या मुदतीवर घेतले, तर मासिक 22,493 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे. ॲक्सिस बँक गृह कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रोसेसिंग फी आकारते. ही रक्कम एकूण कर्जाच्या 1% किंवा 10,000 रुपये यापैकी जी कोणती रक्कम जास्त असेल, तितकी रक्कम स्वीकारते.
युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) आपल्या ग्राहकांना गृह कर्जाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. ही बँक गृहकर्जावर 8.70% व्याजदर आकारत आहे. या बँकेतून ग्राहकांनी 25 लाखांचे कर्ज 20 वर्षांच्या मुदतीवर घेतले, तर त्यांना मासिक 22,013 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. गृह कर्ज देण्यासाठी बँक एकूण रकमेच्या 0.50% रकमेची प्रोसेसिंग फी चार्ज करते.