Upcoming Electric two Wheelers: दुचाकी प्रेमींसाठी खूशखबर आहे. पुढील काही महिन्यांमध्ये दहा पेक्षा जास्त इलेक्ट्रिक गाड्या लाँच होणार आहेत. यामध्ये स्पोर्टी गाड्यांपासून आकर्षक डिझाइन असलेल्या स्कूटी आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी रोडावली होती. मात्र, आता पुन्हा दुचाकी खरेदी जोमात सुरू आहे.
कोणकोणत्या कंपन्यांच्या गाड्या बाजारात येणार
TVS Creon, कायनॅटिक इ लूना, होंडा अॅक्टिव्हा, सुझुकी बर्गमॅन, वेस्पा इलेक्ट्रिका, एलएमएल स्टार, Harley Davidson Live Wire, हिरो इलेक्ट्रिक AE 47E या आघाडीच्या कंपन्यांच्या गाड्या पुढील काही महिन्यांमध्ये लाँच होणार आहेत.
टु व्हिलर स्टार्टअप कंपनीच्या गाड्या लाँच होणार
भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक स्टार्टअप टु व्हिलर कंपन्यांनी उडी घेतली आहे. या कंपन्यांकडूनही ग्राहकांना अत्याधुनिक फिचर्स, आकर्षक डिझाइन कमी किंमतीमध्ये गाड्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. झिरो कंपनीची SR/F, Svitch कंपनीची CSR 762, Liger X आणि Gogoro 2 series या गाड्या लाँच होणार आहेत.
इ-दुचाकीवरील सबसिडी कमी केल्याचा परिणाम
सरकारने इलेक्ट्रिक दुचाकी गाड्यांवरील सबसिडी कमी केली त्याचा तात्पुरता परिणाम बाजारावर झाला. मात्र, आता पुन्हा विक्री वाढत आहे. मे महिन्यात तब्बल 1 लाख इ-दुचाकींची विक्री झाली. त्यानंतर सबसिडी कमी केल्याने जून महिन्यात फक्त 46 हजार गाड्या विकल्या गेल्या. जुलैमध्ये पुन्हा 54,292 गाड्यांची विक्री झाली. हा आकडा वाढत जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
इलेक्ट्रिक गाड्यांचे प्रमाण एकूण विक्रीमध्ये किती टक्के?
जानेवारी 2023 पासून जुलैअखेरीस देशात 4 लाख इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली. एकंदर पेट्रोल गाड्यांच्या विक्रीशी तुलना करता इलेक्ट्रिक गाड्यांचे प्रमाण 5% आहे. यामध्ये वाढ होत आहे.
दसरा-दिवाळीत बंपर ऑफर?
पुढील काही महिन्यांमध्ये गणेशोत्सव, दसरा दिवाळी, नाताळ हे काही मोठे सण आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी नवी मॉडेल्स कंपन्या बाजारात आणत आहेत. तसेच डिस्काउंट आणि ऑफर्सही मोठ्या प्रमाणात दिल्या जातील.
टॉप दुचाकी निर्मिती कंपन्या कोणत्या?
ओला इलेक्ट्रिक, बजाज ऑटो, टीव्हीएस, एथर, ओकिनावा, होंडा या आघाडीच्या कंपन्या आहेत. आघाडीच्या 10 कंपन्या मिळून 80% गाड्यांची विक्री करतात. तर इतर कंपन्यांचा वाटा फक्त 20% आहे.