गेल्याकाही वर्षात भारतीय महिलांचा नोकरी व उद्योगातील सहभाग वाढला आहे. यामुळे आर्थिक समावेशनासह गुंतवणुकीशी संदर्भातील निर्णयात देखील त्यांचे मत जाणून घेतले जाते. विशेष करून नोकरी करणाऱ्या महिलांचा जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याकडे कल वाढल्याचे दिसून येते.
शहरी भागात राहणाऱ्या महिला म्युच्युअल फंड आणि एफडीमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करत असल्याचे समोर आले आहे. DBS Bank India च्या एका रिपोर्टमध्ये याविषयीची आकडेवारी समोर आली आहे.
भारतातील शहरी भागात राहणाऱ्या महिला नक्की कुठे गुंतवणूक करतात, याविषयी जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
बँकेत गुंतवणुकीला सर्वाधिक प्राधान्य
शहरी भागात राहणाऱ्या महिलांकडून गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंती बँकेला दिली जाते. महिला बँकेत फिक्स्ड डिपॉजिट म्हणून गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत असल्याचे रिपोर्टमध्ये समोर आले आहे. जास्तीत जास्त पैसे बचत खात्यात देखील जमा केले जातात. जवळपास 51 टक्के महिला या पैसे फिक्स्ड डिपॉजिट म्हणून गुंतवतात. तर 16 टक्के महिला सोने, 15 टक्के महिला म्युच्युअल फंड, 10 टक्के महिला रिअल इस्टेट आणि 7 टक्के महिला या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतात.
एफडीवर मिळते जास्त व्याजदर
गुंतवणुकीसाठी एफडीला पसंती देण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण हे व्याजदर आहे. जास्त व्याजदर व सुरक्षितता असल्याने एफडीमध्ये गुंतवणुकीचा निर्णय चांगला मानला जातो. याशिवाय, गुंतवणुकीला सुरुवातच केली असल्याने व इतर गुंतवणुकीतील जोखीम पाहता एफडीला प्राधान्य दिले जाते. निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी व मुलांचे शिक्षण हे देखील गुंतवणुकीमागचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.
म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक वाढली
महिला एफडीसोबतच म्युच्युअल फंडमध्ये देखील गुंतवणूक करत असल्याचे दिसून येते. Nippon India Mutual Fund च्या रिपोर्टनुसार, तरूण महिलांकडून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे.
जवळपास 18 चे 26 वयोगटातील सर्वाधिक महिला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. तसेच, एकरकमीऐवजी एसआयपीच्या माध्यमातून सर्वाधिक गुंतवणूक केली जाते. यात गुंतवणूक करण्यामागचे महत्त्वाचे कारण हे कुटुंबाची आर्थिक सुरक्षा व दीर्घकालीन फायदा मिळावा हे आहे.
घराला सर्वाधिक प्राधान्य
नोकरी करणाऱ्या व जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांचे सर्वाधिक प्राधान्य हे घराला असल्याचे दिसून येते. घर खरेदी करणे, घराची दुरुस्ती व कुटुंब-मुलांना आर्थिक आधार देणे या गोष्टींना नोकरदार महिलांचा सर्वात प्रथम प्राधान्य आहे. याशिवाय, जास्त उत्पन्न असणाऱ्या जवळपास 82 टक्के महिला क्रेडिट कार्डचा वापर करतात.