Investment: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023- 24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी अनेक गोष्टींवरील सीमाशुल्क बदलून पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. वैयक्तिक आयकराच्या बाबतीतही बदल करण्यात आले आहेत. सरकारकडून सर्व क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर आता अनेक बाबींमध्ये बदल घडून येणार ही बाब सगळ्यांच्या लक्षात येणारी आहे. दैनंदिन आयुष्यात गुंतवणुकीला जे महत्व आहे त्यानुसार आता बजेट सादर झाल्यानंतर गुंतवणूक कशात करायची हे जाणून घेणे महत्वाचे ठरते.
सोने चांदी, रियल इस्टेट, शेअर बाजार, म्युच्युअल फंड्स यापैकी ज्यात सर्वात चांगला परतावा मिळेल त्यातच आपण गुंतवणूक करत आलो आहे. तर जाणून घेऊया या क्षेत्रात बजेट मुळे कोणते बदल घडून आले.
सोने-चांदी (Gold and silver)
सोन्यावरील आयात कर कमी होण्याची अपेक्षा पूर्ण झाली नाही. त्याचप्रमाणे आयात होणाऱ्या इटालियन दागिन्यांवर कर वाढल्याने खरेदी थोडी कमी होईल. मात्र, गुंतवणुकीसाठी सोने-चांदी हाच चांगला पर्याय असू शकतो . अर्थसंकल्पानंतर लगेच सोने-चांदीचे दर वाढले आहेत.
रियल इस्टेट (real estate)
केंद्र सरकारने परवडणाऱ्या घरांसाठी असलेली सवलत कायम ठेवली असून त्यासाठीची तरतूद वाढविली आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांना घर खरेदी करणे अधिक लाभदायक ठरणार असून घर खरेदी वाढू शकते.
शेअर बाजार (stock market)
शेअर बाजार पायाभूत सुविधांसाठी केलेली जादाची तरतूद त्याचप्रमाणे वाहने भंगारात काढण्याची आणलेली पॉलिसी यामुळे शेअर बाजारात काही क्षेत्रांना उठाव मिळू शकतो. यामध्ये वाहन उद्योग, पायाभूत सुविधा या क्षेत्रांचा समावेश आहे. बाजाराला काही सवलती मिळाल्या असत्या तर गुंतवणुकीला अधिक प्रोत्साहन मिळाले असते.
म्युच्युअल फंड्स (Mutual Funds)
या क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, काहीही मिळाले नाही. नवीन कर रचनेमुळे जो वाढीव पैसा गुंतवणुकीसाठी उपलब्ध होईल तो म्युच्युअल फंडांकडे वळू शकतो. या क्षेत्रातील गुंतवणूक दीर्घ काळासाठी फायदेशीर ठरते.