Indian Currency Note : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 च्या नोटा, 23 सप्टेंबर 2023 नंतर, चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. आणि 23 सप्टेंबर 2023 पर्यंत ज्या नागरिकांजवळ 2000 च्या नोटा आहेत, त्यांना कोणत्याही बँकेत जाऊन एक्सचेंज करण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहे. मग चर्चेचा विषय बनलेल्या या नोटांबाबत सविस्तरपणे माहिती करुन घ्यायची झाल्यास, भारतात नोटा कुठे छापल्या जातात? नोटांसाठी लागणारा कागद आणि शाई कुठे मिळते? यासारख्या प्रश्नांची माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे.
Table of contents [Show]
देशात एकूण चार मुद्रणालये
संपूर्ण भारतामध्ये भारतीय चलनाच्या नोटा छापण्यासाठी एकूण 4 मुद्रणालये आहेत. देशभरात वापरल्या जाणाऱ्या नोटांची छपाई या 'प्रिंटिंग प्रेस' मध्ये केली जाते. या नोटा छापण्याचे काम भारत सरकार आणि देशातील सर्वोच्च बँक असलेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते.
1928 मध्ये पहिली प्रिंटिंग प्रेस सुरु
भारतात नोटा छापण्याच्या उद्देशाने 1928 साली महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात एक प्रिंटिंग प्रेस सुरु करण्यात आली होती. त्यावेळी तेथे केवळ 10, 100 आणि 1000 रुपयांच्या नोटा छापल्या जात होत्या. आणि काही नोटा इंग्लंड वरुन आयात केल्या जात असे. त्यानंतर 1975 मध्ये मध्य प्रदेशातील देवास येथे देशातील दुसरा नोटा छपाईचा कारखाना सुरु झाला. देवास आणि नाशिक येथील या दोन्ही प्रेस, वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या, 'सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या' नेतृत्वाखाली कार्य करतात. येथे 1997 पर्यंत नोटा छापण्याचे कार्य सुरु होते.
परदेशातून आल्या भारतीय नोटा
त्यानंतर 1997 पासून भारत सरकारने अमेरिका,कॅनडा आणि युरोपमधील कंपन्यांकडूनही नोटा मागवायला सुरुवात केली. त्यानंतर, नोटा छापण्यासाठी कर्नाटकातील म्हैसूर येथे 1999 मध्ये आणि पुन्हा 2000 साली पश्चिम बंगालमधील सालबोनी येथे आणखी दोन टांकसाळी सुरु करण्यात आल्या. सालबोनी आणि म्हैसूर येथील प्रेस भारतीय रिझर्व्ह बँकेची उपकंपनी भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडमार्फत चालवली जाते. अश्याप्रकारे सध्या भारतात चार प्रिंटिंग प्रेस आहेत.
नोटांसाठी लागणारा कागद कुठून येतो?
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, नोटांसाठी वापरण्यात येणारा 80 टक्के कागद जर्मनी, यूके आणि जपानमधून येतो. तथापि,भारतात नोटांसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदाची पेपर मिल मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे आहे. येथे नोट आणि स्टॅम्प पेपरसाठी वापरला जाणारा कागद तयार केला जातो.
शाई कुठून येते?
नोटांमध्ये वापरली जाणारी शाई ही स्विस कंपनी SICPA कडून आयात केली जाते. भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रान (BRBNMPL), म्हैसूर, कर्नाटक येथे भारतीय रिझर्व्ह बँकेची उपकंपनी आहे, जी नोटांमध्ये वापरली जाणारी शाई तयार करते. या कंपनीचे नाव व्हर्निका असे आहे. अश्याप्रकारे विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नोटा छपाई करण्याच्या बाबतीत भारत एक स्वयंपूर्ण देश बनला आहे.