Wheat Production: मागील वर्षी रब्बी हंगामात उष्णतेच्या लाटेमुळे गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे संपूर्ण देशभरात गव्हाचे दर कडाडले होते. किरकोळ बाजारात तर गव्हाचे दर 3 हजार रुपये क्विंटलच्या पुढे गेले होते. दरम्यान, यावर्षीही अवकाळी पाऊस आणि गारपीटीने गहू पिकाचे नुकसान झाले आहे. पूर्णत: गहू पिक वाया गेले नसले तरी गव्हाची गुणवत्ता खालावली आहे. उत्तरेकडील राज्यांना खराब हवामानाचा सर्वाधिक फटका बसला आहे. असे असले तरी सरकारकडून या गव्हाची खरेदी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
गहू पिक कापणीला आले असतानाच पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश या गहू उत्पादक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. (Wheat crop damaged due to rain) त्यामुळे गव्हाला जी नैसर्गिक चमक होती, (Wheat lost luster) ती नाहीशी झाली. तसेच पावसामुळे गव्हात ओलावा आला. हा गहू दीर्घकाळ साठवणूक करण्यात अडचणी येऊ शकतात. पंजाब, हरियाणा आणि मध्यप्रदेशात देशातील 98% गव्हाचे उत्पादन होते. मात्र, खराब हवामानामुळे रब्बी हंगामातील पिकाला फटका बसला आहे.
गहू खरेदीसाठी नियमावली शिथिल
मागील वर्षी गव्हाची टंचाई निर्माण झाल्याने सरकारी गोदामातील गहू खुल्या बाजारात विकला होता. त्यामुळे गोदामे निम्मी मोकळी आहेत. या रब्बी हंगामात तयार झालेला गहू पुन्हा एकदा गोदामात साठवण्यात येईल. खराब हवामानामुळे फटका बसलेला गहू सरकारकडून खरेदी केला जाईल. त्यासाठी नियमावली शिथिलही केली जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती काही सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.
गहू उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. चालू रब्बी हंगामात तयार झालेल्या गव्हापैकी 34 मिलियन टन गहू सरकार खरेदी करण्याचा विचार करत आहे. हा सर्व गहू स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी केला जाईल. मागील वर्षीच्या कमी उत्पादनामुळे सरकारी गोदामांत फक्त 18 मिलियन टन गहू शिल्लक राहिला आहे. नवा गहू बाजारात दाखल होत आहे. मात्र, या गव्हाची क्वालिटी (Wheat lost luster) चांगली नाही.
शेतकऱ्यांकडून खराब गव्हाची कमी किंमतीत विक्री
10 टक्क्यांपर्यंत चमक नसलेला गहू खरेदी करण्यास मध्यप्रदेश सरकारला सांगण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. चमक नसलेल्या गव्हाची खुल्या बाजारात स्वस्तात विक्री होत आहे. त्यामुळे हा गहू सुद्धा सरकार खरेदी करण्याचा विचार करत आहे. जर सरकारने गहू खरेदी केली तर घाईघाईने खुल्या बाजारात कमी किंमतीला गहू विक्री करण्याचे प्रमाण कमी होईल. पुढील आठवड्यापासून सरकारकडून मोठ्या प्रमाणात गहू खरेदी करण्यात येईल. तसेच ज्या गव्हामध्ये आर्द्रता म्हणजेच ओलावा आहे अशा गव्हाबाबत लवकरच सरकार निर्णय घेईल.