Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Salary Hike 2023: पगारवाढीची गुड न्यूज मिळणार! सॅलरी वाढवताना कंपनी कोणत्या गोष्टी विचारात घेते माहितीये का?

Salary Hike 2023

वर्षभर काम केल्यानंतर एखादा कर्मचारी कंपनीकडून जर कोणती अपेक्षा ठेवत असेल तर ती चांगल्या पगारवाढीची. महागाईने कंबरडे मोडलं असताना पगारवाढ तेवढीच मदतीला धावून येते. आधीच कोरोनामुळे दोन वर्षांपासून अनेक कंपन्यांनी चांगली पगारवाढ दिली नाही. आयटी कंपन्यांचा यास अपवाद आहे. मात्र, आता नोकरकपातीतून त्याचे पडसादही दिसत आहेत. भारतात यावर्षी कंपन्या सरासरी किती पगारवाढ करतील, याचा अंदाज या लेखात पाहूया

मार्च महिना अर्धा संपला असून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे वेध लागले आहे. दरवर्षी कंपन्यांकडून एप्रिल महिन्यात पगारवाढ केली जाते. मात्र, त्याआधी कर्मचाऱ्यांच्या कामाचं मूल्यमापन केलं जाते. त्या कर्मचाऱ्यांची कामगिरी चांगली आहे, त्यांना जास्त पगार वाढ मिळते. (Appraisal season 2023) तर सुमार किंवा साधारण कामगिरी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात. म्हणजेच नाममात्र, पगारवाढ केली जाते. यावर्षीची पगारवाढ जरा जास्त चर्चेत आहे. कारण, सर्वात जास्त पगार देणाऱ्या आयटी क्षेत्रालाच मंदीची झळ पोहचली आहे. मात्र, अर्थव्यवस्थेतील इतर क्षेत्रे चांगली प्रगती करत आहेत.

चालू वर्षात इ-कॉमर्स, रिअॅलिटी, निर्मिती, रिटेलसह विविध क्षेत्रातील कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ केली जाईल, याचे एक सर्वेक्षण समोर आले आहे. Aon कन्सल्टिंग या कंपनीने हा अभ्यास केला आहे.  (Salary outlook for 2023) चालू वर्षात पगारवाढ करण्याबाबत कंपन्या नक्की काय विचार करत आहेत, याचा अंदाज बांधण्यात आला आहे.

आर्थिक घडामोडींचा पगारवाढीवर परिणाम (Things which impact on pay hike)

आयटी कंपन्यांच्या उत्पन्नावर जागतिक मंदीसदृश्य परिस्थितीचा परिणाम दिसू शकतो. मागील काही महिन्यांपासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडील कामाचा ओघ मंदावला आहे. परिणामी उत्पन्नही रोडावले आहे. अनेक कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपात देखील केली. जागतिक स्तरावर बँकांकडून व्याजदरात वाढ केली जात आहे. त्याचा परिणाम देखील पगारवाढीच्या निर्णयावर होण्याची शक्यता सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे.

कार्यक्षम कर्मचाऱ्यांना कंपन्या खूश करतील (High performance emp salary hike)

कोर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांकडून खर्चावर जरी बारकाईने नियंत्रण ठेवण्यात येत असले तरी जे कर्मचारी कार्यक्षम आहेत त्यांना चांगली पगारवाढ मिळू शकते, असे अभ्यासात म्हटले आहे. कारण, जर सर्वोत्तम काम करणारे कर्मचारी कंपनी सोडून गेले तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी कंपन्यांना अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतात. तसेच नव्याने रूजू झालेल्या कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देण्यातही वेळ जातो. तसेच त्यानंतरही कर्मचारी चांगला प्रशिक्षित होईल याची खात्री नाही. नवी कर्मचारी भरती ही प्रक्रिया वेळखाऊ आहे, हे कंपन्यांना चांगलेच माहीत आहे. 

कंपनीची आर्थिक स्थिती निर्णायक

एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांना चांगली पगार वाढ मिळेल की नाही, हे ठरवण्यामध्ये कंपनीच्या आर्थिक स्थितीचा वाटाही मोठा आहे. ज्या कंपन्यांनी त्यांची फायनान्शिअल टार्गेट्स पूर्ण केली असतील,  बाजारात कंपनी स्पर्धात्मक असेल अशा कंपन्या जास्त पगारवाढ देतील. मात्र, ज्या कंपन्यांचे आर्थिक गणित बिघडलेले असेल अशा कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना फार काही मिळण्याची अपेक्षा नाही.

सरासरी किती टक्के पगारवाढ मिळू शकते? (Average salary hike in percentage for 2023)

भारतामध्ये सर्व क्षेत्रांचा सरासरी विचार करता 10% पगारवाढ 2023/24 वर्षात कर्मचाऱ्यांना मिळेल, असे Aon कन्सलटिंग कंपनीने केलेल्या रिसर्चमध्ये म्हटले आहे. अमेरिका, जर्मनी आणि इतर काही युरोपियन देशांची तुलना करता भारताचा पगारवाढीचा दर जास्त राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोणत्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना जास्त पगारवाढ मिळू शकते

आर्थिक सेवा पुरवणाऱ्या कंपन्या 
मीडिया तंत्रज्ञान
गेमिंग, बायोटेक, केमिकल्स
रिटेल, इकॉमर्स, टेक कन्सल्टिंग कंपन्या
ग्राहकोपयोगी उत्पादने बनवणाऱ्या कंपन्या (FMCG)

या घटकांचाही पगार वाढीवर परिणाम होणार? (Work from home impact on salary hike) 

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा कर्मचाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी फ्रिलान्सिंग आणि इतर छोटीमोठी कामेही पूर्णवेळ नोकरी करताना करू लागली आहेत. गिग इकॉनॉमी, मूनलाइटिंग रूढ होत असताना, कंपन्या पगारवाढ करताना या गोष्टीही विचारात घेतील, असे दिसते. महागाई दर, जेंडर पे गॅप, कर्मचारी कंपनी सोडून जाण्याचे प्रमाण या गोष्टीही कंपन्यांकडून पगारवाढ करताना विचारात घेतल्या जाऊ शकतात.