• 02 Oct, 2022 09:18

भाज्या नेमक्या कशामुळे महागतात?

vegetables hike

सध्या किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर पाहता विशेषत: टोमॅटोने शंभरी गाठल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. काही दिवसांनी हे दर खाली येतात. पण या दरवाढी मागचं नेमकं कोडं काय आहे?

टोमॅटो हा स्वयंपाकगृहातला महत्त्वाचा घटक आहे. घरात इतर भाज्या नसताना किंवा घाई गडबडीत असताना टोमॅटो भाजी, चटणी आणि सॅलडच्या रूपाने वेळ मारून नेण्यासाठी उपयोगात येतो. अशा विविध प्रकारे टोमॅटोचा वापर होत असल्याने मागील आठवड्यात टोमॅटोमध्ये झालेली दरवाढ अधिक तीव्रपणे जाणवली. फक्त टोमॅटोच नाही, तर अनेक भाज्या ठराविक काळात महाग होतात. हवामान बदल, भाज्यांच्या विशेष हंगामासह काही ठराविक घटक हे भाज्यांच्या किमतीत होणाऱ्या चढ-उतारावर परिणाम करत असतात. आज आपण अशाच काही घटकांबद्दल जाणून घेणार आहोत.

कमाल उष्णता किंवा पाऊस

वातावरणातील कमालीचा बदल हा कुठल्याही पिकासाठी हानीकारकच असतो. टोमॅटोबाबतच सांगायचं झालं तर महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचं उत्पादन घेतलं जातं. दख्खनच्या पठारावरची ही तीन प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्ये आहेत. दरम्यानच्या काळात या भागात उष्णतेची लाट जोरदार होती. त्याचा थेट परिणाम पिकांवर झाला. कमाल तापमानुळे भाज्यांच्या काढणीपासून तो माल बाजारापर्यंत पोहोचवताना भाज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. भाज्यांच्या लागवडीसोबत त्यांची काढणी ते मार्केटपर्यंतचा सगळा प्रवास शीत कंटेनरमधून (Cold Container) झाला तर भाज्यांचं आयुष्य वाढू शकतं. त्यासाठी कोल्ड स्टोरेजचा वापर करावा लागतो. यासाठी बऱ्यापैकी खर्च येतो. साहजिकच हा खर्च भाज्यांच्या किमतीत समाविष्ट होतो, हे लक्षात घ्यायला हवं.

कमाल उष्णतेप्रमाणेच गरजेपेक्षा अधिक पाऊसही भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम करतो. एका ठराविक मर्यादेपलीकडे पाऊस पडत राहिल्यास, वातावरण दमट राहिलं किंवा शेतात पाणी साचू लागलं की, त्यामुळेही भाज्यांचं नुकसान होतं.

भाज्यांचा ठराविक हंगाम

प्रत्येक भाजी तयार होण्याचा ठराविक हंगाम असतो. त्या हंगामातच भाज्या खूप मोठ्या प्रमाणात येतात. तो हंगाम संपला की पुरवठा आपोआप कमी होतो. मात्र, चवीने खाणाऱ्यांची मागणी कमी होत नाही. त्यामुळे भाज्या महागतात. टोमॅटोच्या बाबतीतही, नवीन पीक आले की, मागणीवरचा ताण कमी होऊन किमती आटोक्यात येतील, असं सांगितलं जातं.

अनेक सुधारित वाणांच्या मदतीने हा काळ लांबवण्याचे प्रयत्न सुरू असतात. काही विशिष्ट वाण हे उशीरा, हंगाम संपताना किंवा संपल्यानंतर तयार व्हावेत, अशा पद्धतीने बदल केले जाऊ शकतात. त्यामुळे हंगामापलीकडेही भाज्या अधिक संख्येने उपलब्ध होतात आणि भाव आटोक्यात राहू शकतात.

टिकाऊपणा

भाज्या तोडणीनंतर ग्राहकांच्या किचनमध्ये जाईपर्यंत किती काळ टिकतात, हा घटकही त्यांच्या किमतीवर परिणाम करतो. टोमॅटोसारख्या पिकांमध्ये पाण्याचा अंश अधिक असल्याने ते लवकर खराब होऊ शकतात. क्रेटमध्ये भरून ठेवलेले टोमॅटो हे नेहमीपेक्षा खूप जास्त तापमानात खराब होण्याची शक्यताही अधिक असते.

कांद्यासारख्या उत्पादनावर प्रक्रिया करता येते आणि त्याचे जीवनमान (shelf-life) वाढवता येते. त्यामुळे कांद्याच्या हंगामात अनेक उत्पादक प्रक्रिया करून कांदा साठवून ठेवतात आणि जेव्हा अधिक दर मिळतो तेव्हा ते विक्रीला आणतात. अशाप्रकारच्या सुविधेमुळे उत्पादकाला अपेक्षित दर मिळतो. भाजी बाजारात दीर्घकाळ उपलब्ध होत राहते आणि दरातले चढ-उतार आटोक्यात राहायला त्याची मदत होऊ शकते.

कमी उत्पादन

उन्हाळ्यासारख्या ठराविक काळात भाज्यांचे उत्पादन कमी होते. याचे कारण, ज्या भागात सिंचनाची सोय (irrigation facility) कमी, सुविधा कमी अशा भागात त्या घेता येत नाहीत. खास करून पालेभाज्यांची (leafy vegetables) आवक आणखी कमी होते. अशावेळी भाजीसाठी फळभाज्यांवर अवलंबून राहावे लागते.

सिंचनाची सोय करून आणि आवश्यक तिथे निवारा व साठवणुकीची सोय करून भाजीपिकाचे उन्हापासून संरक्षण करता येते आणि उत्पादन वाढण्यासाठी त्याची मदत होते.