Health Insurance Claim: अचानक कुटुंबातील व्यक्ती किंवा स्वत: आजारी पडल्यावर खिशातून पैसे जायला नको यासाठी आपण आरोग्य विमा काढतो. यातून संपूर्ण कुटुंबाला सुरक्षितता मिळते. मात्र, प्रत्यक्षात कोणी आजारी पडल्यानंतर विम्याचा दावा करायची वेळ येते तेव्हा गोंधळ उडतो. अनेकांना दावा कसा करायचा याची माहिती देखील नसते. विमा पॉलिसी खरेदी करताना कॅशलेस आणि रिम्बर्समेंट असे दोन पर्याय सहसा पॉलिसीत असतात.
कॅशलेस आणि रिम्बर्समेंटमध्ये फरक काय?
कॅशलेस नावाप्रमाणेच तुम्हाला रुग्णालयाचे बिल भरण्याची गरज नाही. विमा कंपनीकडे दावा केल्यानंतर कंपनी आणि रुग्णालय क्लेम सेटलमेंट करून घेते. तुम्हाला खिशातून पैसे देण्याची गरज पडत नाही. फक्त पॉलिसीतील तरतुदीनुसार थोडी रक्कम तुम्हाला भरावी लागू शकते. तर रिम्बर्समेंट म्हणजे प्रतिपूर्ती. रुग्णालयात भरती झाल्यानंतर तुम्ही कंपनीकडे विम्याचा दावा करता. मात्र, रुग्णालयाचे बिल तुम्हाला आधी भरावे लागते. कागदपत्रे सादर केल्यानंतर विमा कंपनी तुम्हाला पैसे देते.
रिम्बर्समेंटमध्ये काय अडचणी येऊ शकतात?
जर तुम्ही पॉलिसीचा दावा रिम्बर्समेंट पद्धतीने करत असाल तर विमा कंपनीकडून विविध प्रकारची कागदपत्रे मागितली जातात. रुग्णालयात असतानाचे बिल्स, रिपोर्ट, डिस्चार्ज कार्ड, डॉक्टरांचे पत्र, काही ठराविक आजार आधीपासून नसल्याचे प्रमाणपत्र यासह अनेक कागदपत्रे लागू शकतात. यातील एकजरी पुरावा कमी असला तरी विमा कंपनी क्लेम पुढे घेऊन जात नाही. म्हणजेच तुम्हाला पैसे मिळण्यास दिरंगाई होते. आधीच घरामध्ये वैद्यकीय एमर्जन्सी असल्याने अशा वेळी तुम्ही कागदपत्रांसाठी धावपळही करू शकत नाहीत. त्यामुळे कधीही कॅशलेस दावा करणे चांगले.
रिम्बर्समेंटची गरज कधी पडू शकते?
तुमची आरोग्य विमा पॉलिसी कोणत्या कंपनीची आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असते. विमा कंपनीच्या नेटवर्कमध्ये जी रुग्णालये आहेत त्यामध्ये कॅशलेस सुविधा असते. मात्र, जर रुग्णालय विमा कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये नसेल तर तुम्हाला रिम्बर्समेंट पद्धतीने दावा करावा लागेल.
जेव्हा एमर्सन्सीमध्ये कोणाला रुग्णालयात भरती करण्याची वेळ येते तेव्हा जवळचे रुग्णालय पाहिले जाते. नंतर विम्याची प्रक्रिया केली जाते. समजा, कुटुंबातील कोणाला हृदयविकाराचा झटका आला तर तातडीची वैद्यकीय सेवा मिळवण्यास प्राधान्य दिलं जाईल. रुग्णालय कॅशलेस आहे की नाही हे पाहण्यास वेळच मिळणार नाही.
भारतातील सरासरी क्लेमची रक्कम किती?
सिक्युअर नाऊ या विमा ब्रोकर संस्थेने आर्थिक वर्ष 2022-23 मधील सुमारे 4 हजार हेल्थ क्लेमचा अभ्यास केला. भारतीयांचा सरासरी विम्याचा दावा 42 हजार रुपये आहे, असे यातून समोर आले. तसेच रिम्बर्समेंट पद्धतीने फक्त 15% नागरिकांचे 1 लाखांपेक्षा जास्त दावे निकाली निघाले. तर 10 लाखांपेक्षा जास्त दाव्यांची संख्या फक्त 0.2% इतकी होती. 10.73% क्लेममध्ये कागदपत्रांसबंधित अडचणी आल्या. म्हणजेच विमा कंपनीने अतिरिक्त पुरावे मागितले किंवा त्याबाबत स्पष्टता मागितली.