Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Zero-Coupon Bond म्हणजे काय? अशा बाँड्सवर व्याज मिळते का?

What is zero coupon bond

सरकारी आणि खासगी कंपन्या पैसे उभे करण्यासाठी बाँड जारी करतात. गुंतवणूकदार ठराविक कालावधीसाठी बाँड खरेदी करतो, त्यावर कंपनी व्याज देते. या बाँड्सचे अनेक प्रकार आहेत. यापैकी झिरो कूपन बाँड म्हणजे काय ते या लेखात पाहूया. या बाँडवर व्याज मिळत नाही, तरीही फायदा कसा होतो, जाणून घ्या.

Zero-Coupon Bond: बाजारामध्ये कॉर्पोरेट आणि सरकारी कंपन्यांचे अनेक बाँड्स असतात ज्यामध्ये गुंतवणूक करता येते. ठराविक कालावधीच्या बाँड्समधून निश्चित परतावा मिळेल. तसेच इक्विटीमधील गुंतवणुकीपेक्षा बाँडमध्ये जोखीमही कमी असते. बाँडचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी झिरो कूपन बाँड्स म्हणजे काय ते पाहूया. 

बाँड्स म्हणजे काय?

सर्वप्रथम बाँड्स म्हणजे काय ते पाहूया. कंपन्या इक्विटी शेअर्सद्वारे किंवा कर्जाद्वारे व्यवसायासाठी पैसा उभारतात. यापैकी कर्जाद्वारे पैसा उभारण्यासाठी कंपन्या बाँड्स बाजारात जारी करतात. हे एक डेट इन्स्ट्रुमेंट आहे. यावर कंपनी गुंतवणूकदाराला व्याज देते.  

कंपन्या बाँड म्हणजेच गुंतवणुकदाराला एक प्रमाणपत्र देतात. हे सर्टिफिकेट डिजिटल सुद्धा असू शकते. यावर गुंतणुकीची रक्कम, कालावधी, व्याजदर अशी माहिती लिहलेली असते. या सर्टिफिकेटच्या बदल्यात गुंतवणुकदार कंपनीला कर्जाने पैसे देतो. कालावधी संपल्यानंतर कंपनी परताव्यासह मुद्दल परत करते. सरकारी आणि खासगी कंपन्या बाँड्सद्वारे पैसे उभारतात. 

झिरो कूपन बाँड्स म्हणजे काय?

इतर प्रकारच्या बाँड्सवर मासिक, सहामाई किंवा वार्षिक व्याज मिळते. किती व्याजदर मिळणार हे बाँडवर लिहलेले असते. मात्र, झिरो कूपन बाँड्समध्ये व्याज मिळत नाही. कूपन रेट म्हणजेच व्याजदर. त्याऐवजी बाँड खरेदी करताना डिस्काउंट मिळतो. दर्शनी किंमतीनुसार बाँड खरेदी केला जात नाही. मात्र, बाँडचा कालावधी पूर्ण झाल्यास कंपनी दर्शनी मुल्यानुसार पैसे देते. 

उदाहरणार्थ, महिंद्रा ऑटो कंपनीच्या पाच वर्षांच्या एका बाँडची किंमत 10 हजार रुपये आहे. मात्र, डिस्काउंटमध्ये तुम्ही हा बाँड 8 हजार रुपयांना खरेदी करू शकता. मात्र, जेव्हा बाँड मॅच्युअर होईल तेव्हा महिंद्रा कंपनी तुम्हाला 10 हजार रुपये माघारी देईल. व्याज जरी शून्य टक्के असले तरी गुंतवणुकदाराला त्याने खरेदी केलेल्या किंमतीपेक्षा जास्त पैसे मिळतील. 

बाँड देणाऱ्या कंपनीच्या रेटिंगचा अर्थ काय? 

कोणतेही बाँड खरेदी करताना AAA किंवा AAA+ रेटिंग असलेल्या कंपन्यांचे बाँड खरेदी करावे. कारण अशा कंपन्यांची आर्थिक स्थिती मजबूत असते. कमी रेटिंग असलेले बाँड खरेदी केल्यास तुमचे पैसे बुडू शकतात. त्यामुळे कंपनीचा सखोल अभ्यास केल्यानंतरच बाँड खरेदी करावे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन थेट कंपनीकडून बाँड खरेदी करता येईल. डिमॅट खात्याद्वारेही बाँडची खरेदी विक्री करता येते.