कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी अनेक जण होल जीवन विमा (Whole life Insurance) किंवा टर्म लाइफ इन्शुरन्स (Term life Insurance) काढतात. या दोन्हीही विमा पॉलिसीचे वेगवेगळे फायदे आहेत. त्यामुळे तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, गरजा आणि जबाबदारी ओळखून योग्य तो लाइफ इन्शुरन्स घ्यावा. होल लाइफ इन्शुरन्स म्हणजे आयुष्यभरासाठी तुम्हाला विमा कवच मिळते. जोपर्यंत तुम्ही जिवंत असाल तोपर्यंत तुम्हाला विम्याचे कवच मिळेल. तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला पॉलिसी कव्हर आणि बोनसही मिळेल. होल लाइफ इन्शुरन्सला पर्मनंट लाइफ इन्शुरन्स असेही म्हणतात.
विमा कवचाबरोबरच बचतही करायचा तुमचा विचार असेल तर होल लाइफ इन्शुरन्स आहे. मात्र, फक्त कुटुंबाला सुरक्षित करायचे असेल तर टर्म लाइफ इन्शुरन्स योग्य ठरतो. कारण यात प्रिमीयम होल लाइफ इन्शुरन्सच्या तुलनेत खूपच कमी असतो.
होल लाइफ इन्शुरन्स आणि बचत -
होल लाइफ इन्शुरन्समध्ये जीवनाच्या सुरक्षिततेबरोबच आर्थिक फायदेही समाविष्ट आहेत. टर्म इन्शुरन्सच्या तुलनेत तुम्हाला जास्त प्रिमीयम भरावा लागतो. यापैकी काही पैसा शेअर बाजारात किंवा इतर योजनेत गुंतवला जातो. त्यामधून मिळणारा नफा तुम्हाला दिला जातो. म्हणजे तुमच्या पैशाची बचतही होते आणि तुम्हाला आयुष्यभराचे विमा कवचही मिळते. जे पैसे तुमचे बचत होतात, त्यावर व्याजही मिळते आणि तुम्ही कर्जही काढू शकता.
पॉलिसी दरम्यान बचत झालेले पैसे तुम्ही काढूही शकता किंवा त्यावर कर्ज घेवू शकता. यावर व्याज वेगवेगळ्या प्रकारे लावले जाऊ शकते. कोणताही कर न भरता बचत झालेले पैसै पॉलिसी होल्डर काढू शकतो. मात्र, जर तुम्ही काढलेले कर्ज परत केले नाही तर शेवटी तुम्हाला मिळणारी रक्कम कमी भेटेल. इन्शुरन्स काढलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर काही पॉलिसीमध्ये डिव्हिडंडही मिळू शकतो.
पॉलिसीचा कालावधी किती?
होल लाइफ इन्शुरन्समध्ये तुम्हाला दहा ते पंधरा वर्ष प्रिमीयम भरावा लागतो. मात्र, संपूर्ण आयुष्यासाठी तुम्हाला विम्याचे कवच मिळते. मात्र, टर्म इन्शुरन्सच्या तुलनेत खूपच जास्त प्रिमियम तुम्हाला भरावा लागू शकतो. या पॉलिसीतून आर्थिक परतावा किती मिळेल याची खात्री नसते. कारण, गुंतवणूक केलेल्या पैशांवर किती फायदा होईल, हे कंपनीलाही माहिती नसते.
होल लाइफ इन्शुरन्सचे प्रकार किती?
होल लाइफ इन्शुरन्सचे अनेक प्रकार आहेत. तुमच्या गरजा ओळखून तुम्ही प्लॅन निवडू शकता. नॉन पार्टिसिपेटिंग होल लाइफ इन्शुरन्स, पार्टिसिपेटिंग होल लाइफ इन्शुरन्स, प्युअर होल लाइफ इन्शुरन्स, लिमिटेड पेमेंट होल लाइफ इन्शुरन्स, सिंगल प्रिमियम होल लाइफ इन्शुरन्स असे अनेक प्रकार आहेत.