कोणत्याही प्रकारचा नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरु करताय तर त्या उद्योगाची नोंदणी करणे आवश्यक असते. या उद्योगांची सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगात या प्रकारात नोंदणी करण्यासाठी एक विशिष्ट क्रमांक घ्यावा लागतो. या क्रमांकाला उद्योग आधार असे म्हंटले जाते. व्यवसाय नोंदणीची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी 18 सप्टेंबर 2015 रोजी पंतप्रधानांनी उद्योग आधार योजना सुरू केली. ज्याचा मुख्य उद्देश सूक्ष्म, मध्यम किंवा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे आणि व्यापाऱ्यांना लाभ देणे हा होता.
उद्योग आधार म्हणजे काय?
अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर उद्योग आधार नंबर मिळवणे म्हणजे तुमच्या व्यवसायाची नोंदणी करणे. उद्योग आधार लागू करण्यामागील सरकारचा मुख्य हेतू सूक्ष्म, दुय्यम किंवा लघु उद्योगांना जास्तीत जास्त लाभ देणे हा होता, जे उद्योग आधार MSME द्वारे त्यांच्या आधार कार्ड क्रमांकाद्वारे नोंदणीकृत आहेत. त्याचबरोबर, उद्योग आधार सुरू होण्यापूर्वी व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाची नोंदणी करण्यासाठी अत्यंत किचकट प्रक्रियेचा सामना करावा लागायचा. या प्रक्रियेत भरपूर कागदपत्र आणि फॉर्म भरावा लागत असल्याने वेळ लागायचा पण उद्योग आधार योजना आल्याने व्यवसाय नोंदणीची प्रक्रिया सोपी झाली आहे.
उद्योग आधार कसं प्राप्त कराल?
उद्योग आधार नंबर मिळवण्याच्या दोन पद्धती आहेत. एक तुम्ही जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जाऊन ऑफलाईन फॉर्म भरू शकता किंवा उद्योग आधारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या उद्योगाची विनाशुल्क नोंदणी करू शकता.
उद्योग आधारची ऑनलाईन नोंदणी कशी करायची
- सर्वात प्रथम उद्योग आधारच्या अधिकृत संकेतस्थळावर जा
- समोर आलेल्या फॉर्ममध्ये आधारकार्ड नंबर आणि संपूर्ण नाव भरा.
- Validate & Generate OTP वर क्लिक करा.
- OTP क्रमांक टाकून व्हेरिफाय करा.
- व्हेरिफाय झाल्यानंतरत्याच्या खाली अजून काही फॉर्म ओपन होतील जिथे तुम्हाला तुमच्या व्यवसायाची माहिती उदा- व्यवसायाचा पत्ता ,पॅन कार्ड, व्यसायाच स्वरूप इत्यादी, भरून सबमिट करावी लागेल.
- अशा प्रकारे थोड्याच वेळात तुमच्या ई-मेल अकॉउंटवर उद्योग आधार प्रमाणपत्र आणि 12 अंकी UAN ही मिळेल.
उद्योग आधारसाठी लागणारे कागदपत्रे
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- चालक परवाना
- मतदार ओळखपत्र
- रेशन कार्ड
- पासपोर्ट
- दुकान आणि आस्थापना कायदा परवानाकृत
- भाडे करार
- पोलीस आणि इतर संस्थेकडून एनओसी पत्र
उद्योग आधार चे फायदे
- उद्योग आधारची नोंदणी घेतली तर सरकारकडून दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेऊ शकता.
- सबसिडी आणि काही योजनांअंतर्गत उद्योग आधारधारकांना सरकारकडून आर्थिक आणि व्यवसाय सहाय्य दिले जाते.
- त्यांना काही देश आणि परदेशात आयोजित व्यवसायिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळते आणि त्यांच्यासाठी विशेष सुविधा देखील दिल्या जातात.
उद्योग आधार कोण घेऊ शकतो?
प्रत्येक प्रकारच्या व्यवसाय संस्थेला उद्योग आधार मिळू शकतो, मग तो हिंदू अविभक्त कुटुंब असो, एक व्यक्ती आधारित कंपनी असो, भागीदारी फर्म, उत्पादन कंपनी, मर्यादित कंपनी, खाजगी मर्यादित कंपनी, मर्यादित दायित्व भागीदारी, सहकारी संस्था किंवा व्यक्तींची संघटना उद्योग आधार मिळवू शकते. 
आपल्या उद्योगासाठी सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर उद्योग आधारात नोंदणी करणे गरजेचे आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            