PM Svanidhi Yojana: केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मुंबई महानगर पालिकेला येत्या 10 दिवसांत 40 हजार फेरीवाल्यांपर्यंत पीएम स्वनिधी योजना पोहोचवण्याचे लक्ष्य दिले आहे. पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधी योजने अंतर्गत फेरीवाले किंवा रस्त्यावर विक्री करणाऱ्यांना 10 हजार रूपयांपर्यंत आर्थिक मदत पुरवली जाते. मुंबई महापालिकेकडे अंदाजे ऑगस्ट 2000 पासून 60 हजार फॉर्मस आले आहेत.
काय आहे पीएम स्वनिधी योजना? | What is PM SVANidhi?
पीएम स्वनिधी योजने अंतर्गत फेरीवाल्यांना कोणतीही हमी न देता दहा हजार रुपयांचे कर्ज मिळण्याची तरतूद आहे. आत्मनिर्भर निधी योजने अंतर्गत विशेषतः फेरीवाल्यांसाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली. सरकार या कर्जावर अनुदान देखील देते. कोरोनाच्या काळात अनेक फेरीवाल्यांना आपला व्यवसाय बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे त्यांचे बरेच नुकसान झाले होते. अशा फेरीवाल्यांना पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार स्वनिधी योजनेद्वारे मदत करत आहे.
स्वनिधी योजने अंतर्गत किती कर्ज मिळते?
स्वनिधी योजने अंतर्गत सर्वप्रथम कोणतीही हमी न देता 10 हजार रुपयांचे कर्ज मिळते. हे कर्ज जर वेळेत फेडले गेले तर दुसऱ्यांदा कोणत्याही हमीविना 20 हजार रुपयांचे कर्ज देण्याची सुविधा आहे. त्याचप्रमाणे दुसरे कर्जही वेळेत परत केल्यास त्या कर्जदाराला किंवा फेरीवाल्याला तिसऱ्यांदा 50 हजार रूपयांचे कोणत्याही हमीविना कर्ज दिले जाते. अशाप्रकारे फेरीवाल्यांना 10 हजार ते 50 हजारांपर्यंतचे कर्ज या योजनेतून मिळू शकते. तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्यांना आणि डिजिटल व्यवहारांचा वापर करणाऱ्यांना कॅशबॅकही दिला जाणार आहे.
स्वनिधी योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
स्वनिधी योजनेसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन असा दोन्हीप्रकारे अर्ज करता येतो. ऑफलाईन प्रक्रियेमध्ये बॅंकेद्वारे हा अर्ज भरता येतो. यासाठी बॅंकेकडून अर्ज घेऊन तो विविध कागदपत्रे जोडून पुन्हा बॅंकेकडे जमा करणे गरजेचे आहे. बॅंक सर्व कागदपत्रांची खातरजमा करून अर्ज मान्य करते. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://pmsvanidhi.mohua.gov.in/ या वेबपोर्टलद्वारे अर्ज करता येतो.