आरबीआयने ठरवून दिलेल्या नियमानुसार भारतातील सर्व बँका काही कॉमन नियम पाळतात. या नियमांमध्ये आरबीआयने काही प्रमाणात बँकांना निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार काही बँका सेव्हिंग अकाउंसाठी झिरो बॅलन्सची सुविधा देतात. तर काही बँकांनी किमान रकमेसाठी नियम केले आहेत.
सार्वजनिक किंवा खासगी क्षेत्रातील कोणतीही बँका असो. सेव्हिंग अकाउंटमध्ये किमान रक्कम शिल्लक (Average Monthly Balance-AMB) ठेवण्याचा नियम सर्वांनाच पाळावा लागतो. ही रक्कम किती असावी याचे प्रत्येक बँकेचे नियम वेगवेगळे आहेत. त्याचबरोबर ग्रामीण आणि शहरी, निमशहरी, महानगरातील बँकांसाठीही हे नियम अजून वेगळे असू शकतात. पण ज्या बँकांमध्ये खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवण्याचा नियम आहे. त्या खात्यात किमान रक्कम नसेल तर बँक खातेदाराकडून दंड वसूल करते.
आज आपण सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील काही नामांकित बँकांचे, बचत खात्यात किमान शिल्लक रकमेबाबतचे नियम जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India)
स्टेट बँकेने बचत खात्यातील किमान रक्कम ठेवण्याच्या नियमामध्ये बदल केला आहे. हा बदल मार्च, 2020 पासून लागू करण्यात आला आहे. पूर्वी एसबीआयमध्ये खाते असणाऱ्या खातेधारकांना त्यांच्या ठिकाणानुसार किमान 3 हजार, 2 हजार आणि 1 हजार रुपये बचत खात्यात ठेवणे आवश्यक होते. पण आता हा नियम एसबीआयने बदलला असून, ग्राहकांना खात्यात किमान रक्कम ठेवणे गरजेचे नाही.
याचबरोबर एसबीआयने बचत खात्यातील रकमेनुसार काही सुविधाही सुरू केल्या आहेत. जसे की, जे खातेदार बचत खात्यात जास्त पैसे ठेवत आहेत. त्या खातेधारकांना एटीएममधून पैसे काढण्यावरील निर्बंध कमी केली आहेत. तसेच जे खातेदार बचत खात्यात किमान 1 लाख रुपये ठेवत आहेत. त्यांना महिन्यातून कितीवेळा एटीएममधून पैसे काढता येतात.
पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank-PNB)
पंजाब नॅशनल बँकेत खाते असलेल्या सर्व खातेदारांना खात्यात किमान रक्कम ठेवणे बंधनकारक आहे. जर या बँकेची एखादी शाखा महानगरात किंवा शहरी भागात असेल तर, या शाखेतील ग्राहकांना 3 महिन्यांसाठी 20 हजार रुपये खात्यात ठेवणे बंधनकारक आहे. नाहीतर त्यावर बँक दंड आकारते. निम-शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना अनुक्रमे 1 हजार आणि 500 रुपये किमान रक्कम खात्यात असणे गरजेचे आहे.
आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)
आयसीआयसीआय बँकेत सेव्हिंग अकाउंट असणाऱ्या ग्राहकांना खात्यात किमान रक्कम ठेवणे गरजेचे आहे. मेट्रो किंवा अर्बन परिसरातील शाखेत खाते असणाऱ्या ग्राहकांना किमान 10 हजार रुपये शिल्लक ठेवावी लागते. तर सेमी-अर्बन आणि ग्रामीण भागातील शाखांसाठी हा नियम अनुक्रमे 5 हजार आणि 2 हजार रुपये आहे. ज्या खात्यात किमान रक्कम नसेल त्या खातेधारकाकडून बँक 6 टक्के दंड किंवा 500 रुपये यापैकी जे कमी असेल ते वसुल करते.
एचडीएफसी बँक (HDFC Bank)
शहरी किंवा मेट्रो भागातील एचडीएफसीच्या सेव्हिंग अकाउंटसाठी किमान शिल्लक रक्कम 10 हजार रुपये आहे. सेमी-अर्बन शाखेतील खातेधारकांसाठी महिन्याला 5 हजार रुपये आणि ग्रामीण भागातील खातेधारकांसाठी 3 महिन्यांसाठी 2,500 रुपये खात्यात शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे. किमान रक्कम नसेल तर बँक दंड आकारते.
कॅनरा बँक (Canara Bank)
कॅनरा बँकेतील शहरात/महानगरात ब्रान्च असलेल्या खातेधारकांना बचत खात्यात महिन्याला 2 हजार रुपये किमान रक्कम ठेवणे आवश्यक आहे. निम-शहरी भागातील खातेधारकांसाठी ही रक्कम 1 हजार रुपये आणि ग्रामीण भागातील खातेधारकांसाठी 500 रुपये आहे.
कोटक महिंन्द्रा बँक (Kotak Mahindra Bank)
कोटक महिंन्द्रा बँकेतील शहरातील खातेधारकांना प्रत्येक महिन्याला किमान 10 हजार रुपये शिल्लक रक्कम ठेवणे बंधनकारक आहे. एवढी रक्कम नसेल तर खातेदाराकडून शिल्लक रकमेच्या 6 टक्के दंड वसूल केला जातो. निम-शहरी भागातील खातेधारकांसाठी हा नियम 5 हजार रुपये इतका आहे.