Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Personal Loan: आर्थिक अडचणीत वैयक्तिक कर्जाचे महत्त्व काय? त्याचे फायदे व तोटे जाणून घ्या

Personal Loan Advantages and Disadvantages

Personal Loan Advantages and Disadvantages: तुम्ही नेट बँकिंग किंवा बँकेच्या मोबाईल ॲपद्वारे किंवा बँकेत प्रत्यक्ष जाऊन वैयक्तिक कर्जासाठी (Personal Loan) अर्ज केल्यास तातडीने तुमची आर्थिक गरज पूर्ण होते. पण या पर्सनल लोनचे फायदे आणि तोटे तुम्हाला माहित आहेत का?

जर तुम्हाला अचानक आर्थिक गरज भासली आणि कोणताही मार्ग दिसत नसेल तर वैयक्तिक कर्ज (Personal Loan) हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी काहीही तारण ठेवण्याची गरज नसते.  तुम्ही एटीएम, नेट बँकिंग, बँकेच्या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे किंवा बँकेत भेट देऊन वैयक्तिक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि त्यातून तुमची आर्थिक गरज पूर्ण करू शकता. पण पर्सनल लोन घेताना ते कर्ज तुमच्यासाठी कितपत फायदेशीर आहे. त्यासाठी पात्रता काय आहे? त्याचे फायदे व तोटे काय आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत.

पर्सनल लोनसाठी पात्रता काय आहे? (Eligibility for Personal Loan)

तुम्ही पगारदार व्यक्ती असल्यास आणि तुम्हाला वैयक्तिक कर्ज हवे असेल तर, त्यासाठी तुमचे वय 18 ते 60 वर्षे या दरम्यान असणे गरजेचे आहे. समजा तुम्ही नोकरी करत नसाल, तर तुमचे वय 21 ते 65 वर्ष या दरम्यान असले पाहिजे. वेगवेगळ्या बँकांमध्ये वयाचे निकष वेगवेगळे असू शकतात. तुम्ही एका कंपनीत किंवा संस्थेत किमान एक वर्ष काम करत असाल तर तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी (Personal Loan) पात्र ठरू शकता. तसेच, व्यवसायात सलग दोन वर्षे काम केल्यानंतर, तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी पात्र  होऊ शकता. वैयक्तिक कर्ज काढण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असणे गरजेचे आहे. यापेक्षा कमी असल्यास कर्ज मिळण्यात अडचण येऊ शकते किंवा व्याजदर जास्त असू शकतो.

वैयक्तिक कर्जाचे फायदे (Advantages of Personal Loan)

पर्सनल लोनच्या फायद्याबद्दल सांगायचे झाले तर लग्न, वैद्यकीय समस्या किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत, जेव्हा अचानक पैशाची गरज भासते आणि त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नसतो. अशावेळी वैयक्तिक कर्जातून तुमची निकडीची आर्थिक गरज पूर्ण होऊ शकते. यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता केल्यास कर्जाची रक्कम काही वेळातच तुमच्या खात्यात जमा होऊ शकते. वैयक्तिक कर्जाची अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. ती आपण सविस्तरपणे समजून घेऊयात.

वैयक्तिक कर्जाच्या मोबदल्यात तुम्हाला काहीही गहाण ठेवण्याची गरज नसते. गृह कर्ज, कार कर्ज, दुचाकी कर्ज इत्यादींसारखी बहुतांश कर्जे सशर्त तुम्हाला मिळतात. पण वैयक्तिक कर्जावर असे कोणतेही निर्बंध नाहीत. तुमच्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार तुम्ही त्याचा कुठेही वापर करू शकता. तसेच, वैयक्तिक कर्जाची परतफेड करण्यासाठी बॅंकेकडून तुम्हाला पुरेसा कालावधी दिला जातो. 12 ते 60 महिन्यांच्या कालावधीत तुम्ही हे कर्ज फेडू शकता.

वैयक्तिक कर्जाचे तोटे (Disadvantages of Personal Loan)

गृह कर्ज, कार कर्ज इत्यादींच्या तुलनेत वैयक्तिक कर्जावरील व्याजदर खूप जास्त असतात. अशा परिस्थितीत, कर्जाची परतफेड करताना तुम्हाला जास्त ईएमआय द्यावा लागू शकतो. ज्यामुळे तुमच्या खिशावर अधिकचा ताण येऊ शकतो. तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तेवढीच रक्कम घ्या, जी तुम्ही सहज फेडू शकता. बहुतेक बँकांमध्ये वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना, नोकरदार वर्गातील लोकांचा  पगार दरमहा किमान 15,000 रुपये इतका असणे गरजेचे आहे . वैयक्तिक कर्ज काढताना, तुम्हाला प्री-पेमेंट शुल्क भरावे लागते. तर इतर कोणतेही कर्ज घेताना हे अतिरिक्त शुल्क लागू होत नाही. याशिवाय वैयक्तिक कर्जात प्रोसेसिंग फी देखील खूप जास्त भरावी लागते.

अशाप्रकारे वैयक्तिक कर्ज घेताना त्याच्या दोन्ही बाजू समजून घेणे गरजेचे आहे. त्याचे कमी-अधिक प्रमाणात जसे फायदे आहेत. तसे तोटे देखील आहेत. त्यामुळे कर्जाची गरज, ते फेडण्याची तयारी आणि त्यासाठी येणार साधारण खर्च लक्षात घेऊन पर्सनल लोन घेणे योग्य ठरू शकते.