Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Literacy: आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय? जाणून घ्या लगेच!

Insurance

Image Source : www.coverfox.com

Health Insurance and Life Insurance: जीवन विमा पॉलिसीधारकाच्या लाभार्थ्यांना त्याचा किंवा तिचा मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य पुरवतो, तर आरोग्य विमा पॉलिसीधारकाला आजार किंवा दुखापत झाल्यास झालेल्या वैद्यकीय खर्चाचे कव्हर करतो. दोन्ही प्रकारच्या विमा पॉलिसी व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक आणि वैद्यकीय कल्याण सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

जीवन विमा आणि आरोग्य विमा या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या विमा पॉलिसी आहेत ज्या पॉलिसीधारकांना विविध प्रकारचे कव्हरेज देतात. या दोन्ही विम्यांमध्ये काही मूलभूत फरक आहेत ते समजून घेऊयात.

जीवन विमा म्हणजे काय? (What is Life Insurance?)

जीवन विमा ही एक प्रकारची विमा पॉलिसी आहे जी पॉलिसीधारकाच्या मृत्यूच्या घटनेत पॉलिसीधारकाच्या लाभार्थ्यांना, म्हणजेच नॉमिनीला आर्थिक सहाय्य प्रदान करते. जीवन विम्याचा प्राथमिक उद्देश पॉलिसीधारकाच्या अकाली निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे. लाइफ इन्शुरन्स पॉलिसी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात जसे की टर्म लाइफ, युनिव्हर्सल लाइफ आणि व्हेरिएबल लाइफ इत्यादी. पॉलिसीधारक पॉलिसी लागू ठेवण्यासाठी नियमितपणे प्रीमियम भरत असतो.

जीवन विमा पॉलिसी ही पॉलिसीधारकाच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींसाठी असते. यात विमा देणारी कंपनी, पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला विम्याची रक्कम प्रदान करते.एक प्रकारे कुटुंबातील व्यक्तीसाठी भविष्यातील आर्थिक तजवीज म्हणून हा विमा आहे.   जीवन विमा पॉलिसी मध्ये जी गुंतवणूक केली जाते त्या गुंतवणुकीसाठी इन्कम टॅक्स कलम  80 C च्या अंतर्गत विम्याची रक्कम करमुक्त असते. काही जीवन विमा पॉलिसी मध्ये गुंतवणुकीचे पर्याय देखील उपलब्ध आहेत

सविस्तरपणे जीवन विमा पॉलिसीबद्दल आपण माहिती घेऊ.

संपूर्ण जीवन विमा (Whole Life Policy) : संपूर्ण जीवन विमा पॉलिसी म्हणजेच आजीवन विमा पॉलिसी होय. नावाप्रमाणेच ही पॉलिसी विमाधारकाला आयुष्यभरासाठी कव्हर देते. ही योजना दीर्घकालीन असल्यामुळे यामध्ये पॉलिसीधारकाला दीर्घ कालावधीसाठी प्रीमियम भरावा लागतो. विमाधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला विमा कंपनी ठरलेली रक्कम सुपूर्द करत असते. ही पॉलिसी घेताना विमाधारक आयुष्यभरासाठी प्रीमियम भरू शकतो किंवा ठराविक कालावधीसाठी प्रीमियम भरण्याचा पर्याय निवडू शकतो.  संपूर्ण जीवन विमा पॉलिसी मध्ये विमाधारकाच्या वारसदाराला मिळणारी रक्कम करमुक्त असते हे विशेष.

मुदत जीवन विमा (Term Life Insurance): यामध्ये विमाधारकाचा ठराविक कालावधीमध्ये मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला जीवन विम्याची रक्कम दिली जाते. 
विमा कालावधी संपल्यानंतर व्यक्ती हयात असेल तर अशा प्रकरणात पॉलिसीधारकाने भरलेले पैसे त्याला परत मिळत नाही. परवडणारा विमा म्हणून मुदत जीवन विमा ओळखला जातो. जास्त रक्कम आणि अधिक कालावधी घेतल्यास मुदत जीवन विमा स्वस्त पडतो.

बाल विमा पॉलिसी (Child Life Insurance) : बाल विमा एक गुंतवणूक पॉलिसी असून यामध्ये मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ही पॉलिसी मदत करते. वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर विमा कंपनी एकरकमी किंवा प्रत्येक वर्षी विमाधारकाला परतावा देत असते.

सेवानिवृत्ती विमा योजना (Pension Life Insurance) : या योजनेअंतर्गत विमाधारकास सेवानिवृत्तीनंतर नियमितपणे उत्पन्न मिळते.म्हणूनच या योजनेला पेन्शन विमा योजना असेही म्हटले जाते.

युलीप विमा योजना : गुंतवणूक आणि विमा संरक्षण असा दुहेरी फायदा युलीप विमा योजनेमध्ये विमाधारकास मिळतो. 
काही युलीप योजनांमध्ये विशिष्ट रोगावरच्या उपचारांचा खर्च देखील समाविष्ट आहे.

आरोग्य विमा म्हणजे काय? (What is Health Insurance?)

आरोग्य विमा हा एक प्रकारचा विमा पॉलिसी आहे जो पॉलिसीधारकाचा वैद्यकीय खर्च कव्हर करतो. आरोग्य विमा पॉलिसी पॉलिसीधारकाने आजारपण किंवा दुखापत झाल्यास केलेल्या वैद्यकीय खर्चासाठी पैसे देतात आणि हॉस्पिटलायझेशन, शस्त्रक्रिया आणि प्रिस्क्रिप्शन औषधांचा खर्च देखील कव्हर करू शकतात. आरोग्य विमा पॉलिसी वेगवेगळ्या प्रकारात येतात जसे की वैयक्तिक आरोग्य विमा, कौटुंबिक आरोग्य विमा आणि गट आरोग्य विमा आणि पॉलिसीधारक पॉलिसी लागू ठेवण्यासाठी नियमितपणे प्रीमियम भरतो.

वैयक्तिक आरोग्य विमा (Personal Health Insurance): वैयक्तिक आरोग्य विम्यामध्ये तुम्ही स्वतः, तुमचा जोडीदार, मुले आणि आई-वडील यांना समाविष्ट केले जाते.
कुटुंबातील कुणालाही काही आजार झाल्यास रुग्णालयामध्ये भरती झाल्यानंतर, तेथील खर्च व औषधोपचार याचा सर्व खर्च वैयक्तिक आरोग्य विम्यामध्ये ग्राह्य धरला जातो.

फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा (Family Floater Health Insurance) : फॅमिली फ्लोटर विमा मध्ये कुटुंबातील सर्व व्यक्तीसाठी एकच प्रीमियम भरून त्यांना योजनेत समाविष्ट केले जाते. वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसीच्या तुलनेत फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा पॉलिसी चा प्रीमियम हा कमी असतो.  वयोमर्यादा 60 पेक्षा जास्त असेल तर मात्र त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येऊ शकत नाही.

ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा (Seinior Citizen Health Insurance) : वयोमर्यादा 60 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. वयोमानानुसार शारीरिक किंवा मानसिक त्रासामुळे वृद्ध व्यक्तींना होणारे आजार, अपघात – दुखापत यासाठी होणारा खर्च ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा यामध्ये सामाविष्ट असतो.

सारांश, जीवन विमा पॉलिसीधारकाच्या लाभार्थ्यांना त्याचा किंवा तिचा मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य पुरवतो, तर आरोग्य विमा पॉलिसीधारकाला आजार किंवा दुखापत झाल्यास झालेल्या वैद्यकीय खर्चाचे कव्हर करतो. दोन्ही प्रकारच्या विमा पॉलिसी व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक आणि वैद्यकीय कल्याण सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.