प्रश्न – मला वारंवार बँकेच्या प्रतिनिधीकडून डेबिट कार्ड, नेटबँकिंग सुविधा बंद होईल याबाबत कॉल येत आहेत. हे कॉल खरचं बँकेकडून आले आहेत, हे कसे ओळखावे? स्कॅमबाबत कोठे तक्रार करावी?
महामनीचे उत्तर – भारतात गेल्याकाही वर्षात ऑनलाईन शॉपिंग, डिजिटल बँकिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यासोबतच, ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण देखील वाढल्याचे दिसते सायबर गुन्हेगार फसवणुकीचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. स्कॅमर्सकडून प्रामुख्याने टेक सपोर्टच्या नावाखाली फसवणूक केली जाते. टेक सपोर्ट स्कॅमपासून वाचण्यासाठी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तसेच, या संदर्भात काही कॉल आल्यास त्वरित तक्रार करावी.
कसा केला जातो टेक सपोर्ट स्कॅम (Tech Support Scam)?
टेक सपोर्ट स्कॅममध्ये सायबरचोरांकडून बँक, सरकारी संस्था अथवा एखाद्या प्रसिद्ध कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगून फोन केला जातो. फोनवर ग्राहकांना त्यांचे बँक खाते, डेबिट कार्ड बंद होणार असल्याचे सांगून घाबरवले जाते. तसेच, या सुविधा सुरू ठेवण्यासाठी बँक खात्याचा क्रमांक, डेबिट कार्डचा पिन, ईमेल आयडी, ओटीपी अशी खासगी माहिती मागितली जाते. अनेकदा ग्राहक बँक खाते बंद होईल या भितीने ही माहिती देतात व अशावेळी सायबरचोरांकडून खात्यातून पैसे काढून घेतले जातात.
याशिवाय, कॉम्प्युटरवर पॉप-अप जाहिराती दाखवल्या जातात. कॉम्प्युटरमध्ये समस्या असल्याचे, व्हायरस असल्याचे सांगितले जाते. यानंतर TeamViewer, AnyDesk सारखे रिमोट डेस्कटॉप सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्यास सांगितले जाते. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बँक खात्याची माहिती मिळवून पैसे चोरी केले जातात. सायबर गुन्हेगार कॉल सेंटरच्या माध्यमातून असे स्कॅम चालवतात. स्कॅमसाठी बनावट क्रमांकाचा वापर केला जातो.
बनावट वेबसाइट आणि अॅपच्या माध्यमातून देखील फसवणूक केली जाते. अनेकजण टीव्ही, फ्रिज, कॉम्प्युटर व इतर गोष्टी दुरुस्त करायची असल्यास कंपनीची हेल्पलाइन शोधण्यासाठी गुगलवर सर्च करतात. मात्र, गुगलवर स्कॅमर्सने प्रसिद्ध कंपन्यांची नावे वापरून बनावट वेबसाइट आणि अॅपचे जाळे उभारलेले असते. कंपनीची वेबसाइट खरी की खोटी हे लक्षात न आल्याने अनेकांची फसवणूक होते.
ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी या गोष्टी ठेवा लक्षात
खासगी माहिती शेअर करणे टाळा – बँकेकडून कधीही फोनवर खात्याशी संबंधित कोणतीही माहिती मागितली जात नाही. तुम्हाला जर बँक प्रतिनिधीकडून कॉल आला असल्यास बँक खाते, एटीएम पिनशी संबंधित कोणतीही माहिती देऊ नका. याशिवाय, ओटीपी देखील मागितला जातो. तुम्ही सायबर गुन्हेगारांना ओटीपी सांगितल्यास बँक खात्यातून पैसे मिनिटात गायब होऊ शकतात.
बनावट वेबसाइटपासून सावध – अनेकदा आपण बँकेशी संबंधित माहिती हवी असल्यास अथवा नेटबँकिंगचा वापर करण्यासाठी गुगलवर सर्च करतो. मात्र, एकाच बँकेच्या नावाखाली असंख्य साइट्स उपलब्ध असतात. त्यामुळे कोणत्याही कामासाठी केवळ अधिकृत वेबसाइटचाच वापर करावा. बनावट ईमेल, फोन कॉलला उत्तर देणे टाळा.
कॉम्प्युटरचा रिमोट अॅक्सेस देऊ नका – कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमच्या कॉम्प्युटरचा रिमोट अॅक्सेस देणे टाळा. अशा सॉफ्टवेअरच्या मदतीने स्कॅमर्स तुमच्या कॉम्प्युटरमध्ये मॅलवेअर इंस्टॉल करू शकतात.
टू-फॅक्टर ऑथिंटिकेशनचा करा वापर – तुम्ही जर डिजिटल बँकिंगचा सातत्याने वापर करत असाल तर टू-फॅक्टर ऑथिंटिकेशनचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच, वेळोवेळी पासवर्ड बदलणे गरजेचे आहे. तुमच्या सोशल मीडिया अकाउंट व डिजिटल बँकिंग अकाउंटचा पासवर्ड समान असू नये.
स्कॅमविषयी येथे करा तक्रार –
सायबरचोरांनी तुमच्या बँके खात्यातून पैसे काढून घेतल्यास याबाबत त्वरित बँकेला माहिती द्यावी. बँकेला नेट बँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड बंद करण्यास सांगू शकता. फसवणूक झाल्यानंतर त्वरित बँकेला माहिती दिल्यास पैसे परत मिळण्यास मदत होते. तुम्ही जवळील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू शकता.
याशिवाय, तुम्हाला https://cybercrime.gov.in. या सरकारी वेबसाइटवर जाऊन तक्रार करता येईल. तसेच, 1930 या क्रमांकावर कॉल करून स्कॅमची माहिती देऊ शकता.