जर तुम्ही दुकानदार असाल तर तुमच्यासाठी दुकानाचा विमा उतरवणे फार महत्त्वाचं आहे. दुकानाचा विमा तुम्हाला अनेक प्रकारच्या आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकतो. विमा घेण्यापूर्वी, दुकानाला कोणकोणत्या प्रकारच्या जोखमी असू शकतात, याची खात्री करून घ्या. ज्या शहरात तुमचे दुकान आहे; त्या शहरात पूर किंवा भूकंप होण्याची शक्यता जास्त असेल तर त्या प्रकारचा विमा घ्यावा लागेल. तसेच दुकान विमा अंतर्गत कोणत्या प्रकारचे नुकसान कव्हर केले जात नाही हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे.
दुकान विमा म्हणजे काय? What is Shop Insurance?
दुकान विमा ही अशा प्रकारची विमा पॉलिसी आहे; जी दुकानाची आणि दुकानातील साहित्याचे आर्थिक नुकसान भरून काढण्यास मदत करते. दुकानाचा विमा तुम्ही खाजगी किंवा सरकारी विमा कंपनीकडून खरेदी करू शकता. या पॉलिसीत आग (Fire), पूर (Flood) आणि भूकंप (Earthquake) यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान भरून काढता येऊ शकते. त्याचबरोबर दुकानामध्ये चोरी झाल्यास किंवा चोरीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी बेसिक पॉलिसीमध्ये काही गोष्टी नव्याने अॅड-ऑन करू शकतो. जसे की, दुकानातील वस्तुंच्या मुल्यानुसार त्याचा विम्यामध्ये समावेश करू शकता.
पॉलिसीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो
- आग, वीज पडणे, संप किंवा दंगली, वादळ, चक्रीवादळ, पूर इत्यादींमुळे इमारती आणि साहित्याचे झालेले नुकसान कव्हर होते.
- दुकानातील अपघातामुळे दुकानदाराचा मृत्यू झाल्यास किंवा त्याला कायमचे अपंगत्व त्याचा आर्थिक लाभ पॉलिसी अंतर्गत संरक्षित आहे.
- दुकानात चोरी करताना किंवा तोडफोड झाल्यास झालेलं नुकसान भरून मिळू शकतं.
- एखाद्या अपघातात किंवा बाहेरील कोणत्याही वस्तूंमुळे दुकानाचे नुकसान झाल्यास ते भरून मिळू शकते.
- मशिनरी ब्रेकडाऊनचा कव्हर देखील यात उपलब्ध आहे.
- यात फसवणुकीद्वारे किंवा दुकानातील कर्मचार्यांमुळे झालेले आर्थिक नुकसान ही कव्हर होते.
अॅड-ऑन कव्हर काय असतो
वर नमूद केलेल्या गोष्टीं व्यतिरिक्त आणखीही काही तोटे आहेत; ज्यासाठी दुकानदाराला स्वतंत्र अॅड-ऑन कव्हर घ्यावे लागते आणि त्यासाठी अतिरिक्त प्रीमियम भरावा लागतो. अॅड-ऑन कव्हरमध्ये तुम्हाला वाटत असलेल्या संभाव्य धोक्यांचा यात समावेश करून त्यानुसार अतिरिक्त प्रीमियम भरून भविष्यातील आर्थिक नुकसान टाळू शकता.
दुकानाच्या विम्याचा प्रीमियम कसा आकारतात?
शहर, दुकानाचे क्षेत्रफळ, कव्हरची रक्कम, व्यवसायाचा प्रकार, तुम्हाला कोणत्या प्रकारचे नुकसान भरायचे आहे, दुकानातील मालाची रक्कम, कर्मचार्यांची संख्या आदी घटक लक्षात घेऊन दुकानाच्या विम्याचा हप्ता आकारला जातो. जर किराणा दुकान असेल तर प्रीमियम कमी असेल, पण जर दागिन्यांचे किंवा मौल्यवान वस्तुंचे दुकान असेल तर जास्त प्रीमियम भरावा लागेल. जर एखाद्या दुकानदाराने 5 लाखांचा मूळ कव्हर घेतला असेल तर त्याला वार्षिक 5 ते 10 हजारांचा प्रीमियम भरावा लागेल.
किती रकमेचा विमा काढावा?
समजा तुमचे कपड्यांचे दुकान आहे. तुमच्याकडे 500 कपड्यांच्या वस्तू आहेत आणि एकाची किंमत 500 रुपये आहे; तर तुम्ही 2.50 लाख (500×500) चे कव्हर घ्यावे. दुकानाचा विमा घेताना असा विचार केला गेला पाहिजे की, दुकानाचे नुकसान झाल्यावर त्याची दुरूस्ती करण्यासाठी तुम्हाला वैयक्तिकरित्या जितके नुकसान सहन करावे लागेल. तेवढ्या रकमेचा विमा काढणे आवश्यक आहे.