Life Insurance: तुमच्या पश्चात कुटुंबियांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी जीवन विमा अत्यावश्यक बाब आहे. कारण एक मोठी रक्कम विमाधारकाच्या मृत्यूनंतर वारसदाराला मिळते. मात्र, बऱ्याच वेळा विमा कंपन्यांकडून दावे नाकारले जातात. त्यामुळे कुटुंबियांना धावपळ करावी लागते. नक्की काय करावं सुचत नाही.
या लेखात पाहूया जीवन विम्याचा दावा कंपनी केव्हा नाकारू शकत नाही. (Life Insurance claim) तसेच कोणत्या परिस्थितीत विमा कंपनी दावा नाकारते. तसेच विमा घेताना काय काळजी घ्यायला हवी.
इन्शुरन्स अॅक्टमधील तरतूद काय?
1938 साली इन्शुरन्स कायदा अस्तित्वात आला. यामध्ये वेळोवेळी दुरूस्ती करण्यात आली आहे. 2015 साली केलेल्या एका दुरूस्तीमुळे विमाधारकांना दिलासा मिळाला आहे. (Insurance act section 45) जीवन विमा ज्यास टर्म इन्शुरन्स असेही म्हणतात. जीवन विमा पॉलिसीस 3 वर्ष पूर्ण झाल्यास विमा कंपनी कोणतेही कारण देऊन विम्याचा दावा नाकारू शकत नाही. म्हणजेच 3 वर्षानंतर विमा धारकाचा दुर्देवी मृत्यू झाल्यास कंपनीला दाव्याची रक्कम द्यावी लागेल. विमा कायद्यात कलम 45 चा समावेश करण्यात आला आहे.
3 वर्षांच्या आत दावा रद्द करू शकते का?
विमा कंपनी 3 वर्षांच्या आत जीवन विम्याचा दावा रद्द करू शकते. जर विमा धारकाने पॉलिसी घेताना चुकीची माहिती दिली असेल, विमा कंपनीची फसवणूक केली असेल तर दावा नाकारण्याचा पूर्ण अधिकार विमा कंपनीला आहे.
जर विमा धारकाची पॉलिसी प्रिमियम न भरल्यामुळे बंद पडली असेल. (what is insurance section 45) मात्र, नंतर पुन्हा प्रिमियम भरून पॉलिसी सुरू केली असेल तर त्यापुढील 3 वर्षानंतर (रिव्हायव्हल डेट) विम्याचा दावा नाकारता येणार नाही.
विमा कंपनीला पॉलिसी घेताना चुकीची माहिती दिली, किंवा माहिती लपवली तर कंपनी दावा नाकारते. मात्र, अशा परिस्थितीत तुम्ही भरलेले सर्व प्रिमियम वारसदाराला कंपनी देते. हे पैसे 90 दिवसांच्या आत देण्याचे कायदेशीर बंधन आहे.
चुकीची माहिती देऊ नका?
कंपनी 3 वर्षानंतर जीवन विम्याचा दावा नाकारू शकत नसली तरी पॉलिसी घेताना चुकीची माहिती देऊ नका. आरोग्य, वय, आजार याबाबत कोणताही माहिती लपवू नका. तसेच कंपनीला फसवण्यासाठी खोटा दावा करू नका. विमा कंपनीकडून दावा देताना सखोल चौकशी केली जाते. त्यामुळे त्या मार्गाला न गेलेलेच बरे.