भारतामध्ये कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची खरेदी करताना विविध कागदपत्रांची गरज असते. त्यातील एक महत्वाचे कागदपत्र म्हणजे मालमत्तेचा सातबारा (7/12) . जमीन खरेदी किंवा विक्री करताना हा जमिनीचा पुरावा म्हणून काम करतो. सातबाऱ्याच्या उताऱ्याने जमिनीची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्याने हा दस्तऐवज महत्वाचा आहे.
सातबारा उतारा म्हणजे काय?
सातबारा (7/12) हे मालमत्तेच्या महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. यामध्ये मालमत्तेबद्दलची सर्व माहिती ही तपशीलवार दिलेली असते. जसे की, जमिनीचा भूमापन क्रमांक, गावाचे नाव, जमिनीचे क्षेत्रफळ, जमिनीचा भूतकाळ, वर्तमानकाळात असलेला त्या मालमत्तेचा मालक. प्रत्येक गावचा तलाठी हा गावातील सर्व जमिनींच्या संदर्भात वेगवेगळ्या नोंदणी वह्या ठेवत असतो. या नोंदणी वह्यांना वेगवेगळे अनुक्रमांक देण्यात आलेले असतात. याला गाव नमुना असेही संबोधले जाते.
सातबाराचा उद्देश काय?
सातबारा (7/12) म्हणजे सरकारने बनवलेले मालमत्तेच्या संदर्भातील उतारा नमूद करण्यासाठी असलेले एक नोंदणी रजिस्टर आहे. यामध्ये जमिनीचे क्षेत्रफळ, मालमत्तेचा मालक, शेतजमिनीची माहिती, शेतजमिनीचा प्रकार- सिंचित किंवा पावसाने सिंचित झालेली, शेवटी त्या जमिनीवर करण्यात आलेल्या शेतीबद्दलची माहिती असते. सातबारा (7/12) उतारामध्ये सरकारी एजन्सीकडून घेण्यात आलेल्या कर्जाबद्दलची माहिती दिलेली असते. ज्यामध्ये बियाणे खरेदी, कीटकनाशक, खते यांच्या खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची नोंद करण्यात येते. अश्या प्रकारे जमिनीचा सातबारा जमिनीच्या मालकी हक्काच्या संबंधित सर्व कागदपत्रांना तयार करतो.
सातबाऱ्याची गरज केव्हा लागते
जमिनीच्या मालकी हक्काबद्दल जाणून घेण्यासाठी हे एक महत्वाचे कागदपत्र आहे. या कागदपत्रामुळे विक्रेत्याच्या पार्श्वभूमी व खरेपणाबद्दल माहिती होते. जेव्हा विक्री पूर्ण होते, तेव्हा रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये ह्या कागदपत्राची गरज असते. शिवाय शेतीसाठी कर्ज घेताना देखील बँकमध्ये हे कागदपत्र मागण्यात येते. शिवाय कोणत्याही जमिनीशी निगडीत कोर्ट केसमध्ये आणि इतर अनेक कारणांसाठी या कागदपत्राची गरज असते.
सातबारा उताऱ्याचे स्वरूप
अलीकडच्या काळात महाराष्ट्र सरकारने फसवणूक टाळण्यासाठी सातबारा उताऱ्याच्या दस्तऐवजाचे स्वरूप बदलले. या कागदपत्रामध्ये आता लँड रेकॉर्ड विभागाचा वॉटरमार्क आणि राज्य सरकारचा लोगो असतो. शिवाय यात गावचे नाव आणि कोड देखील असेल. शेवटच्या जमीन मालकाची या कागदपत्रामध्ये नोंद करण्यात येते. एकूण १२ नवीन बदल हे या कागदपत्रांमध्ये झाले आहेत. या बदलांमुळे फसवणुकीला आळा बसू शकतो. या कागदपत्रामध्ये स्थानिक सरकारचा निर्देशिका कोड, त्या सर्वेक्षण क्रमांकाचे एकूण क्षेत्र याची माहिती दिलेली असते. या कागदपत्रामध्ये जमीन वापराचा हेतू नमूद केल्याने त्या जमिनीचा कोणता वापर आहे हे स्पष्ट होते.
ऑनलाइन सातबारा कसा मिळवायचा?
- सातबारा उतारा ऑनलाईन पाहण्यासाठी सरकारच्या महसूल विभागाच्या महाभूमिलेख या संकेतस्थळावर जावे.
- समोरच नकाशाच्या बाजूला असलेल्या पर्यायात तुमचा जिल्ह्याची निवड करा.
- जिल्ह्याची निवड केल्यानंतर, तुम्हाला तालुका आणि गावाची निवड करावी लागेल.
- गावामधील योग्य तो पर्याय निवडल्यावर तुमचा जमिनीशी निगडित माहिती जसे की, सर्व्हे नंबर, गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, संपूर्ण नाव, यापैकी एकाची माहिती द्या.
- त्याप्रमाणे ज्यांचे नाव सातबाऱ्यात आहे त्यांची नवे दिसतील त्यापैकी आपले नाव निवडून फोन नंबर टाका.
- पुढे कॅप्चा टाकून तुम्हाला तुमचा सातबारा पाहता येणार आहे.
ऑनलाईन दिसणारा हा सातबारा फक्त माहितीसाठी वापरता येणार आहे. तसेच हा कायदेशीर पुरावा नसेल असे ऑनलाईन दिसणार्या सातबारामध्ये सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे फक्त आपल्या जमिनीची माहिती हवी असल्यास ऑनलाईन सातबारा पाहू शकता. तसेच पक्का सातबारा (7/12) हवा असल्यास गावच्या तलाठी कार्यालयाला भेट द्या.