काही वर्षांपूर्वी भारतात अनेक बॅंक ग्राहकांना जी नवी कार्डे मिळायला सुरुवात झाली त्यावर रुपे (RuPay) हे ब्रॅन्डनेम पाहायला मिळू लागलं. त्यानंतर RuPay हे नाव आपण वरचेवर ऐकत आहोत. अगदी अलीकडे जून 2022 मध्येच रिझर्व्ह बॅंकेने (Reserve bank of India) रुपे पेमेंट कार्ड हे युपीआय पेमेंट व्यवस्थेशी (UPI payment system) जोडण्यास मुभा देत असल्याचं जाहीर केलं. RuPay कार्ड नक्की आहे तरी काय? याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
एका अर्थी, RuPayचा इतिहास हा अगदी अलीकडचा आहे. Rupay Payment Network हे गेल्या दशकभरात नावारुपाला आलेले, अधिकाधिक स्वीकारले जात असलेलं एक पेमेंट नेटवर्क आहे. या नेटवर्कचा प्रारंभ भारतात झाला आहे. यूपीआय व्यवस्था चालविणाऱ्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) RuPay च्या विकासात, प्रचारात पुढाकार घेतल्याचं आपल्याला दिसतं.
पेमेंट कार्डच्या अनेक व्यवस्था प्रगत देशांमधून प्रचलित आहेत. जिथे आधुनिक अर्थव्यवस्था आहेतच; तिथे कार्ड पेमेंटसारख्या देवाणघेवाणीच्या सुविधा विकसित झालेल्या आणि वापरात असलेल्या दिसतात. क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंटची व्यवस्था आली आणि जगभरात लोकप्रिय झाली. काही कार्ड इतकी लोकप्रिय आहेत की, जगातल्या अनेक देशांतून दुकानं, हॉटेल आणि सर्व प्रकारच्या पेमेंटसाठी ती वापरली जातात. इंटरनेटचा सर्वदूर प्रसार झाल्यानंतर हीच ब्रॅंड्स ऑनलाईन माध्यमातूनही पेमेंटसह अनेक नाविन्यपूर्ण उत्पादनं आणि सेवा (Innovative Products & Services) देऊ लागली आहेत.
रुपे हे भारतातील पहिलं देशांतर्गत कार्ड पेमेंट नेटवर्क आहे. ज्याला भारतभरात ATM (automatic trailer machine), POS (point of sale) device आणि e-commerce वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात स्वीकारलं गेलं आहे. ‘रुपया’ आणि ‘पेमेंट’ या दोन शब्दांच्या स्पेलिंगपासून त्याचे RuPay हे ब्रॅंडनेम तयार झालं आहे, हे आपल्या सहज लक्षात येईल. या स्वरुपाची इतर पेमेंट नेटवर्क ही आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्तित्वात असली तरी ज्यात भारताने पुढाकार घेऊन तयार केलं आहे, असं नेटवर्क म्हणजे रुपे होय. देशात रोख रक्कम कमी असलेल्या अर्थव्यवस्थेकडे (less cash economy) वाटचाल करण्याच्या रिझर्व्ह बॅंकेची योजना प्रत्यक्षात आणणारे हे एक महत्त्वाचे साधन आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
देशात याबाबतच्या व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर रुपेची वेगवेगळ्या प्रकारची कार्ड सादर करण्यात आली. त्यात बॅंकांची डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांचा समावेश होता. प्रधानमंत्री जनधन योजनेत (Pradhan Mantri Jan Dhan Yojna) खातेधारकांना रुपे कार्डचे वाटप करण्यात आलं. त्या माध्यमातून रुपेची ओळख देशाच्या कानाकोपऱ्यात सर्वांपर्यंत पोहोचली.
रुपेबाबत गेल्या काही वर्षांत दोन बाबींवर भर देण्यात आला. एक तर या कार्डांचा प्रचार आणि स्वीकार देशात सर्वदूर व्हावा यासाठी मोठ्या स्वरूपात जनजागरण करण्यावर भर देण्यात आला आहे. दुसरं म्हणजे, या कार्डचा स्वीकार केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपे व्यवस्थेचा स्वीकार वाढला तर भारतीयांचे परदेशांतील व्यवहार त्यामार्फत अधिक सहज होऊ शकतील हाही एक मोठा लाभ भविष्यकाळात असू शकतो.
आर्थिक व्यवहारासाठी आधी वस्तू नंतर नाणी अशा पर्यायातून देश गेला आहे. रुपया हे चलन म्हणून भारतीयांना पिढ्यान् पिढ्या अगदी पूर्वीपासून माहिती आहेच. इतके दिवस रोकड म्हणजे थेट रुपये देणाऱ्यांसाठी आता रुपेद्वारे तंत्रस्नेही मंचावर व्यवहार अधिक वेगाने पार पाडता येत आहेत.