Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

युपीआय (UPI) कसं काम करतं, पैसे कसे ट्रान्सफर होतात?

युपीआय (UPI) कसं काम करतं, पैसे कसे ट्रान्सफर होतात?

आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जवळपास युपीआय पेमेंट अॅप (UPI Payment App) हे असतंच. पण हे अॅप नेमकं कसं काम करतं. काही वेळा नेटवर्क असूनही पेमेंट प्रोसेस पूर्ण होत नाही; मग अशावेळी काय करायचं, हे आपल्याला माहिती असायला हवं.

युपीआय म्हणजे युनीफाईड पेमेंट्स इंटरफेस (Unified Payments Interface) ही भारतात बॅंक खात्यांतून पेमेंट करण्यासाठी बनवलेली एक पेमेंट व्यवस्था आहे. युपीआयमुळे अनेक बॅंकांच्या अनेक खात्यांना एकाच मोबाईल अ‍ॅपद्वारे पैसे पाठवणे, जमा करणे किंवा खरेदी करणे सोयीचे होते. युपीआयमधून पैसे पाठवताना लॉगिन करण्याची, खाते क्रमांकाची (Bank Account Number), आयएफएससी कोड (IFSC Code)ची गरज लागत नाही. युपीआय ही व्यवस्था नॅशनल पेमेन्ट कॉपोरेशन ऑफ इंडिया (NCPI)ने विकसित केली असून त्याच्या नियमनाची जबाबदारी सुद्धा एनसीपीआयकडे आहे. एनसीपीआय (NCPI) पैशांच्या डिजीटल व्यवहारांसाठी वेगवेगळ्या प्रकारची टूल्स तयार करते. युपीआय (UPI) हे बॅंक ग्राहकांसाठी तयार केलेलं असंच एक साधन आहे.

युपीआय कसं काम करते? How does UPI work?

बॅंका ग्राहकाची ओळख त्याच्या सहीवरून करतात. युपीआयने (UPI) बॅंक ग्राहकांचा मोबाईल क्रमांक आणि मोबाईल फोन ही त्याची ओळख बनवली आहे. त्याला पीन आणि पासवर्डची जोड देऊन ते अधिक सुरक्षित बनवलं. ग्राहकाने त्याच्या बँक खात्याला त्याचा मोबाईल क्रमांक जोडलेला असणे हा UPI पेमेंट व्यवस्थेचा मुख्य भाग आहे. अॅप डाउनलोड केल्यानंतर आपला पीन पासवर्ड ने ही व्यवस्था वापरता येते. ज्याचा संपर्क क्रमांक हा त्याच्या बँक खात्याशी जोडला आहे अशा कोणत्याही बॅंक ग्राहकाला आपण फोन नंबरच्या मदतीने पैसे पाठवू शकतो. तसेच ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे ती व्यक्ती किंवा तो विक्रेत्यांचा त्यासाठीचा क्युआर कोड (QR code) स्कॅन करून पैसे पाठवता येतात.

एनसीपीआयचे (NCPI) योगदान

एनसीपीआय (NCPI) ही रिझर्व्ह बॅंकेच्या (RBI) पुढाकाराने आणि इंडियन बॅंक्स असोसिएशनच्या (IBA)  सहकार्याने 2007 च्या संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार ना नफा तत्वावर स्थापन केलेली  कंपनी आहे. इमिडेट पेमेंट सर्विस (IMPS) ही बॅंका वापरत असलेली सेवा एनसीपीआयनेच तयार केली आहे. याशिवाय रुपे (RuPay) कार्ड पेमेंट व्यवस्थेची देशाला ओळख करून देण्याचे कामही एनपीसीआयने केलं आहे. फोन, गॅस, वीज, पाणी यासारख्या सुविधांसाठी आपल्याला वारंवार भराव्या लागणाऱ्या बिलांची एकत्रित सुविधा एनसीपीआयने भारत बिल पे (Bharat Bill Pay) नावाने आणली आहे.

अनेक बॅंका ग्राहकांना त्यांच्या अॅपच्या माध्यमातून विविध सेवा उपलब्ध करून देतात. त्याचप्रमाणे पेमेंट वॉलेट सर्व्हिस देणाऱ्या कंपन्याही युपीआय सेवा देऊ शकतात. अनेक प्लॅटफॉर्मना वापरायला सोयीचं पैशाचं सहजपणे हस्तांतर करता येणारी सेवा म्हणून युपीआय सेवा अल्पावधीत लोकप्रिय ठरली आहे. सुरुवातीपासून या सेवा वापरण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यावर आणि नवनवीन फिचर देण्यावर यंत्रणेचा भर राहिला आहे. त्यामुळेही युपीआयच्या (UPI) लोकप्रियतेत वाढ झाली आणि त्याचा वापरही दिवसेंदिवस वाढत आहे.