पारंपरिक बँका देऊ करत असलेल्या डिजिटल सेवा आणि ग्राहकांच्या विकसित होणाऱ्या अपेक्षा यांमधील अंतर दूर करण्याचे काम निओ बँकिंग करते. भारतात निओ बँकेचा (Neo Banking) हवा तेवढा विकास झालेला नाही. तरीही निओ बँकिंग त्यांच्या फंड ट्रान्स्फरच्या 24*7 सारख्या सेवांमुळे देशात लोकप्रिय होत आहे. पारंपरिक बँका देत असलेल्या सेवांच्या तुलनेत निओ बँकिंग उत्तम सेवा देते. निओ बँकिंगला फिनटेक कंपनी स्वरूपात ओळखले जाते. या बँकिंगमध्ये कोणतीही प्रत्यक्ष शाखा अस्तित्वात नसते. या बँकिंगमध्ये सर्व बँकिंग सेवा मोबाईल अॅपवर उपलब्ध असतात.
निओ बँकिंग डिजिटल सेवांपेक्षा वेगळी (Neo Banking is Different From Digital Services)
निओ बँकिंग ही युजर फ्रेंडली, कमी खर्च येणारी आणि वेगवान बँकिंग पुरवते. विशेष म्हणजे कमी सेवा शुल्कात निओ बँकिंगचा लाभ घेता येतो. निओ बँकिंगची सर्व कामे डिजिटल स्वरूपात असतात. त्यामुळे ग्राहकांचे श्रम आणि पैसा दोन्हींची बचत होते. निओ बँकिंगच्या सुविधेसाठी ग्राहकाला प्रत्यक्ष बँकेत जावे लागत नाही. बँकेच्या सर्व सुविधा या अॅपवर मिळतात. यासोबतच काही हायटेक निओ बँका या ग्राहकांना चांगल्या गुंतवणूक योजना तयार करण्यात मदत करतात. निओ बँक पेमेंट, डेबिट कार्ड, मनी ट्रान्सफर यासह कर्ज देणे यासारख्या बँकिंग सेवा देते.
भारतातील निओ बँकिंग (Neo Banking in India)
भारतात निओ बँकिंगला कायदेशीर मान्यता नाही. अशावेळी या निओ बँक पारंपरिक बँकांशी भागीदारीने त्यांच्या सेवा ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचे काम करतात. ही भागीदारी पारंपरिक बँक आणि निओ बँक दोघांनाही फायद्याची ठरते. पारंपरिक बँकांनी कमावलेली विश्वासार्हता निओ बँकिंगला उपयोगी ठरते तर निओ बँकिंगमुळे अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास पारंपरिक बँकांना सुलभ जाते.
निओ बँकिंगची वैशिष्टये (Features of Neo Banking)
- एआय-समर्थित तंत्रज्ञानासह वैयक्तिक ऑनलाइन बँकिंग
- कोणतीही भौतिक शाखा किंवा कोणतेही भौतिक भांडवल नाही
- ही बँक 24/7 ऑपरेट करते
- सेवा प्रदाता आणि ग्राहक दोघांनाही किफायतशीर
निओ बँकेचे तोटे (Disadvantages of Neo Bank)
टेक सॅव्ही असणे आवश्यक – तुमच्याजवळ टेक्नॉलॉजी ट्रेंड्सविषयी जाणून घेण्यास वेळ नसेल तर तुम्हाला निओ बँकिंगने व्यवहार करणे पसंतीस पडणार नाही. नवनवीन अॅप्सविषयी माहिती करून न घेणे किंवा त्यांचा वापर न करणे थोडक्यात विश्रांतीपूर्ण व्यवहार करायला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही निओ बँकिंगचा पर्याय न निवडणे योग्य ठरेल.
कायदेशीर मान्यता नाही (No Legal Consideration)
निओ बँकिंगला कोणतीही कायदेशीर मान्यता नसल्याने अशावेळी तुमची जर अॅप्स, सेवा किंवा कोणत्याही थर्ड-पार्टी सेवा प्रदात्याकडून फसवणूक झाल्यास जबाबदार कोण किंवा दाद कोणाकडे मागायची याबाबत प्रश्न निर्माण होतो.