Job Loss Insurance Policy Terms And Condition : कोरोनानंतर आणि जागतिक आर्थिक मंदीमुळे कंपन्यांच्या महसूल आणि नफ्यावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. अपेक्षित नफा न मिळाल्यास कंपन्या त्यांच्या खर्चात कपात करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करतात. सध्याच्या परिस्थितीत आयटीसह अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांना नोकरी गमावण्याची चिंता आहे. त्यामुळे जर तुम्ही जॉब लॉस इन्शुरन्स काढले, तर तुम्हाला नोकरी सोडल्यानंतर येणाऱ्या खर्चाचे व्यावस्थापन कसे करावे? हा प्राथमिक प्रश्न भेडसावणार नाही. परंतु जॉब लॉस इन्शुरन्स काढण्यापूर्वी सगळ्या गोष्टी नीट तपासून पहा.
आरोग्य आणि जीवन विम्याप्रमाणेच नोकरी विम्याचीही संकल्पना हळूहळू रुजायला लागली आहे. जॉब लॉस इन्शुरन्स हा टर्म आणि इतर विमा उत्पादनांसह रायडर म्हणून देखील जोडला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर का घराचा विमा किंवा आरोग्य विमा घेत असाल तर, त्यासोबत तुम्हाला नोकरी गमावण्याचा विमा देखील घेता येवु शकतो. जॉब लॉस इन्शुरन्सच्या अटी शर्ती या कंपनी नुसार बदलणाऱ्या असते.
जॉब लॉस इन्शुरन्सचे फायदे काय आहेत?
जॉब लॉस इन्शुरन्स कव्हरमध्ये,पॉलिसी मध्ये अटींनुसार नोकरी गमावल्यास विमाधारकाला आर्थिक सुरक्षा दिली जाते. पॉलिसीधारकाला विशिष्ट कालावधीकरीता पैसे दिले जातात. यामुळे नोकरी सोडल्यानंतर कठीण परिस्थितीत आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. किंवा अचानक नोकरी सुटल्यास आता काय करावे असा प्रश्न तुमच्यापूढे उपस्थित होत नाही.
लक्षात ठेवायच्या गोष्टी
जॉब लॉस इन्शुरन्स विमा संरक्षणासाठी प्रत्येक विमा कंपनीच्या वेगवेगळ्या अटी-शर्ती असतात. यामध्ये कंपनीने तुम्हाला तात्पुरते काढून टाकले तरीही कव्हर मिळते. मात्र काही महत्वाच्या गोष्टी अश्या आहेत की, काही विमा कंपन्या तात्पुरत्या किंवा कराराच्या आधारावर काम करणाऱ्या लोकांना विमा संरक्षण देत नाहीत. फसवणूक, भ्रष्टाचार किंवा इतर चुकीच्या कृत्यांमुळे जर का नोकरी गेली असेल, तरीही या इन्शुरन्सचा फायदा मिळत नाही. तसेच प्रोबेशन कालावधीत नोकरी गमावल्यास देखील या इन्शुरन्सचा फायदा मिळत नाही.