नोकरी-शिक्षणासाठी किवा अन्य कोणत्या कारणाने अनेक जण भाड्याच्या घरात राहत असतात. अशा वेळी घरमालकाने घर खाली करण्यास सांगितले तर भाडेकरूंसमोर मोठा प्रश्न उभा राहू शकतो. मात्र कोणत्या परिस्थितीत असे घडू शकते, भाडेकरुने काय टाळणे आवश्यक आहे, याविषयी Maharashtra Rent Control Act 1999 काय सांगतो हे जाणून घेणे गरजेचे आहे.
सामान्यत: भाडेकरू पैसे देत नाही तोपर्यंत घर मालकाला जागेचा ताबा घेण्याचा अधिकार नाही. 90 दिवसांची मुदत संपेपर्यंत घरमालक भाडे न भरल्याच्या कारणाने भाड्याने घेतलेल्या जागेच्या ताब्यासाठी दावा दाखल करू शकत नाहीत. मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 च्या कलम 106 प्रमाणे भाडेकरुला नोटीस बजावल्यावर 90 दिवसांचा कालावधी सुरू होतो.
लेखी परवानगीशिवाय कायमस्वरूपी रचना उभारू नका
भाडेकरुला घरमालकाची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. भाडेकरुने घरमालकाची लेखी परवानगी घेतल्याशिवाय जागेमध्ये कायमस्वरूपी रचना उभारली असेल तरी भाडेकरुला घराचा ताबा सोडावा लागू शकतो.
नोकरीमुळे भाड्याने राहत असाल तर ..
भाडेकरू घरमालकाकडे नोकरीला असेल आणि त्या आधारावर भाड्याने राहण्यासाठी जागा दिली असेल अशा स्थितीत नोकरी सोडल्यावर घराचा ताबा घरमालक मिळवू शकतो. तसेच मालमत्ता हस्तांतरण कायदा, 1882 च्या कलम 108 च्या तरतुदींच्या विरोधात कोणतेही कृत्य भाडेकरुने केले असेल तरीही भाडेकरुला घर सोडावे लागू शकते.
शेजाऱ्यांना त्रास देऊ नका
भाडेकरुने शेजाऱ्याना त्रास दिल्याबद्दल दोषी ठरला असेल तरी तेही याबाबतीत महागात पडू शकते. किवा भाड्याने घेतलेल्या जागेचा वापर बेकायदेशीर, अनैतिक कृत्यांसाठी वापरल्याबद्दल दोषी ठरला असेल तरी घरमालकाला जागेचा ताबा मिळवता येतो.
Maharashtra Rent Control Act 1999 कायद्याप्रमाणे अशी काही कारणे आहेत. महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा हा भाडेकरू आणि घर मालक अशा दोघांच्याही हिताचा विचार करताना दिसतो. घर मालकाला केव्हाही, कसाही घराचा ताबा घेता येत नाही. यामुळे भाडेकरुला संरक्षण मिळते. मात्र आपल्या जागेबाबत घर मालकाचेही अधिकारचे यात संरक्षण होताना दिसते. तसेच भाडेकरूने कोणत्या चुका टाळायला हव्यात, याविषयीचे मार्गदर्शनही या कायद्यातून मिळते. आणि कोणत्या चुका केल्यावर किवा कोणत्या परिस्थितीत भाडेकरुला जागा सोडावे लागू शकते याविषयी स्पष्टता येते.
कित्येक जणांना वेगवेगळ्या कारणामुळे भाड्याच्या घरात राहावे लागते. यावेळी भाडेकरु आणि घर मालकाने सामंजस्याने राहणे आवश्यक असते. ते दोघांच्याही हिताचे ठरते.