• 02 Oct, 2022 09:56

लिक्विड फंड म्हणजे काय?

लिक्विड फंड म्हणजे काय?

अल्प मुदत आणि कमी जोखमीच्या गुंतवणुकीसाठी लिक्विड फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

कोणत्याही गुंतवणुकीची सुरवात हि कमी जोखमीच्या पर्यायाने करावी असा सल्ला अनेक आर्थिक सल्लागार (Financial advisor) देतात. अशा वेळी कमी जोखमीचा पर्याय म्हणून लिक्विड फंडाचा (Liquid fund) विचार प्रामुख्याने केला जातो. यात तुमचे पैसे सुरक्षित राहतात तसेच अशा गुंतवणुकीवर चांगला परतावाही मिळतो. तसेच गुंतवलेली रक्कम अचानक आलेल्या आर्थिक अडचणीत कधीही काढता येते. 

लिक्विड फंड म्हणजे काय ?

लिक्विड फंड (Liquid fund) हे डेट (Debt) म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे. तसेच हे नेहमी ओपन एंडेड (Open ended) असतात. म्हणजेच या फंडात कधीही गुंतवणूक करता येते आणि कधीही कडून घेता येते. यामधील गुंतवणूक हि इक्विटी (Eqyity) किंवा शेअर्स (Shares) मध्ये होत नसल्याने शेअर बाजारातील चढ-उताराचा यावर काही परिणाम होत नाही. त्यामुळे लिक्विड फंड हे (Liquid Funds) हे कमी जोखमीच्या (Low risk) प्रकारात मोडतात. हे फंड प्रामुख्याने ट्रेजरी बिल्स (Treasury bills), कमर्शियल पेपर्स (Commercial papers), मुदत ठेव प्रमाणपत्र (Certificates of deposits) इत्यादी मध्ये 1 दिवसापासून 91 दिवसांपर्यंत गुंतवणूक करतात.

लिक्विड फंडाची वैशिष्ट्ये 

  • गुंतवणुकीसाठी 91 दिवस किंवा त्याहीपेक्षा कमी दिवसांची मुदत असते.
  • लिक्विड फंडचे पैसे एक दिवसाच्या पूर्वसूचनेने काढता येतात.
  • या योजनेतील गुंतवणूक ही अल्पकालीन असते. त्यामुळे पैसे अडकून राहत नाही. 
  • अल्पकालीन गुंतवणुकीमुळे बदलत्या व्याजदराचा मिळणाऱ्या परताव्यावर परिणाम होत नाही. 
  • मोठ्या कंपन्या आणि कॉर्पोरेट्स आपल्याकडील अतिरिक्त पैसा हंगामी स्वरुपात गुंतवणूक करु शकतात.
  • बँक मुदत ठेवीवर जसा टीडीएस लागतो. तसा या गुंतवणुकीवर लागत नाही.
  • खरेदी किंवा विक्रीवर कोणताही कर लावला जात नाही.
  • बँकेतील बचत खाते किंवा अल्प-मुदतीच्या ठेवीपेक्षा जास्त टक्के परतावा मिळू शकतो.

जर तुमच्याकडे बँकेच्या बचत खात्यात काही रक्कम पडून असेल तर अल्प मुदतीच्या या लिक्विड फंडात गुंतवणूक करू शकता. तसेच बँकेच्या बचत खात्यातुन मिळणाऱ्या व्याजापेक्षा लिक्विड फंडातील गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळतो.