Job Loss Insurance Plan: लेऑफ हा शब्द गेल्या अनेकदिवसांपासून सातत्याने कानावर पडत आहे. 2022 च्या अखेरपासून अनेक बड्या कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. आर्थिक मंदीचा कंपन्यांच्या नफ्यावर होणाऱ्या प्रभावामुळे सध्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जात आहे, पगार कपात केले जात आहेत. अशा परिस्थितीत नोकरदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. काहींना ईएमआय भरण्याची चिंता आहे तर काहींना घर चालवण्याची चिंता आहे. परंतु, नोकरी गमावल्यास विमा संरक्षणाचा दावा करता येतो, याला जॉब लॉस इन्शुरन्स कव्हर म्हणतात.
जॉब लॉस कव्हर इन्शुरन्स म्हणजे काय? (What is Job Loss Cover Insurance?)
कोणतीही सामान्य विमा कंपनी नोकरी गमावण्याच्या नावाखाली वेगळी पॉलिसी विकत नाही. परंतु इतर पॉलिसींसह ते रायडर म्हणून घेतले जाऊ शकते. म्हणजेच, जनरल इन्शुरन्समध्येच काही वेगळे पैसे भरून जॉब लॉस कव्हर घेता येऊ शकते. यामध्ये तुमचे उत्पन्न काही प्रमाणात कव्हर केले जाते. काहीवेळा कर्ज देऊन उत्पन्न कव्हर केले जाते. तर काहीवेळा उत्पन्नाच्या 50 टक्के रक्कम दिली जाते. तसेच, काही हफ्तादेखील (EMI: Equated monthly installment) सेटल केले जातात. यासाठी विम्याची सर्व कागदपत्रे नीट समजून घेणे, त्यातील अटी शर्ती समजून घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे नेमके काय संरक्षण मिळणार आहे हे समजेल. यासह, हे संरक्षण अमर्याद काळासाठी नसते. केवळ, काही महिन्यांसाठी ही सुविधा घेता येते.
राजीव गांधी कामगार कल्याण योजना (Rajiv Gandhi Worker Welfare Scheme)
खाजगी विमा कंपन्यांखेरीज, सरकार निव्वळ जॉब लॉस कव्हर योजना ऑफर करते. राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना (RGSKY: Rajiv Gandhi Shramik Kalyan Yojana) पूर्ण नोकरीचे नुकसान कव्हर करते. भारतातील ही एकमेव बेरोजगारी विमा योजना आहे जी कर्मचारी राज्य विमा महामंडळाद्वारे (ESIC: Employees' State Insurance Corporation) चालविली जाते. ईएसआयसीला सरकारचा पाठिंबा मिळतो. परंतु खाजगी कंपन्या स्वतंत्रपणे जॉब लॉस कव्हर देत नाहीत परंतु ते सामान्य विम्यात रायडर म्हणून हा लाभ देतात.
जॉब इन्शुरन्स कव्हरमधील सुविधा (Facility in Job Insurance Cover)
- पॉलिसीधारकाने नोकरी गमावल्यास, विमा कंपनी त्याला ठराविक कालावधीसाठी आर्थिक सहाय्य देते.
- कंपनी कव्हर आणि रक्कम ठरवते. या प्रकरणात, सर्वांनी टर्म्स आणि कंडिशन्स तपासेण गरजेचे आहे.
- जर भ्रष्टाचार किंवा कोणत्याही चुकीच्या कारणामुळे कंपनीतून काढले गेले असेल, तर विमा संरक्षणाचा लाभ मिळत नाही.
- तात्पुरती नोकरी करणाऱ्यांनाही विमा संरक्षणाचा लाभ मिळत नाही.
- प्रोबेशन कालावधीत नोकरी गेल्यास, विम्याचा लाभ मिळत नाही.
- आजारपण, स्वेच्छेने राजिनामा, गैरवर्तणूक किंवा शिस्तभंग, खराब कामगिरी यामुळेही नोकरी गेल्यास विम्याचे लाभ मिळत नाहीत.
दावा कसा करायचा? (How to make a claim?)
अचानक नोकरी गेली असेल, तर नोकरीशी संबंधित सर्व कागदपत्रांसह विमा कंपनीकडे दावा करता येतो. यानंतर कंपनी या संपूर्ण दाव्याची पडताळणी करते. यानंतर, सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्यानंतरच तुम्हाला हा दावा दिला जाईल. हे लक्षात ठेवा की ही विमा पॉलिसी तात्पुरती दिलासा आहे, परंतु उत्पन्नाशिवाय, वाढत्या खर्चाच्या दरम्यान ती तुम्हाला दिलासा देऊ शकते.