आरोग्य विमा जसा वैयक्तिक आणि कुटुंबासाठी घेता येतो. तसाच तो समुहाचाही घेता येतो. यामध्ये संपूर्ण समूहाला एकच सुरक्षाकवच असे नसून वैयक्तिक विमाधारकांचा समूह अशी याची रचना असते. यामध्ये समूह एकसंध किंवा एकजिनसी असणे ही प्रमुख अट असते.
सामान्यतः, या योजनेच्या माध्यमातून विविध कंपन्या, संस्था आपल्या कर्मचार्यांना विमाकवच देऊ करतात. यासाठीचा हप्ता कंपनीकडून भरला जातो. या विम्यामध्ये सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पॉलिसीचे सुरक्षाकवच मिळू शकते.
ग्रुप हेल्थ इन्शूरन्स प्लॅन (Group Health Insurance Plan) किंवा गट विमा योजना ही कर्मचार्यांबरोबरच कंपनीला देखील फायदेशीर आहे. कारण यामुळे कर्मचार्यांच्या आरोग्यासाठीच्या खर्चाची काळजी कंपनीला राहात नाही. तसेच या अतिरिक्त सुविधेमुळे कर्मचारी देखील कंपनीत टिकून राहण्यास मदत मिळते. त्याचबरोबर कंपनीला, कर्मचार्याला कर सवलतीचा लाभही मिळतो.
सर्वधासारणपणे ग्रुप हेल्थ इन्शूरन्स पॉलिसी ही वैयक्तिक योजनेच्या तुलनेत स्वस्त असते. कारण हप्त्याची रक्कम ही कर्मचार्यांत विभागली जाते. जेवढा समूह मोठा म्हणजे समूहातील विमा योजनेत सामील झालेल्या व्यक्ती जास्त तेवढा प्रत्येकी विमा हप्ता कमी लागतो. महत्त्वाची बाब म्हणजे या समूहात कर्करोग, हृदयविकार आदी दुर्धर रोग झालेल्यांनासुद्धा सामान्य दरानेच विमाकवच मिळते.
सामान्य स्थितीत कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी व्यक्तिगत रुपातून पॉलिसी खरेदी करायची झाल्यास हप्ता अधिक द्यावा लागतो. तसेच यासाठी कुटुंबामध्ये कोणत्या व्यक्ती असाव्यात यासाठी काही नियम आहेत. समूह विम्यांतर्गत पॉलिसीत कुटुंबात आपण कोणत्याही व्यक्तीचा समावेश करू शकतो.
रुग्णालयात भरती होण्याच्या काळात विमा एजंटला फोन करण्यापेक्षा किंवा ऑफिसमध्ये जाण्यापेक्षा आपण केवळ एचआर टीमला सूचना देऊन आपले काम पूर्ण करू शकता. आपला दावा पूर्णपणे मिळावा यासाठी एचआरची टीम मदत करते.
ग्रुप विमा पॉलिसीमध्ये आपण अतिरिक्त लाभ जोडू शकता. थोडी फार अधिक रक्कम देऊन सुरक्षाकवच वाढवू शकतो. तसेच अतिरिक्त सदस्यांना कवच देऊ शकतो. अनेकांना हा प्रश्न पडतो की अशा विमा पॉलिसीचे नोकरी सोडल्यानंतर काय होते? पण आपण कंपनी सोडली तरीही पॉलिसी आपल्याकडेच राहते.