Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

General Insurance म्हणजे काय? त्याचे प्रकार किती?

General Insurance & it's types

General Insurance हा इन्शुरन्स कंपनी (Insurer) आणि पॉलिसीधारक (insured) यांच्यामध्ये अस्तित्वात आलेला एक कायदेशीर करार आहे. जनरल इन्शुरन्स मृत्यूव्यतिरिक्त उर्वरित आर्थिक नुकसान भरून काढून पॉलिसीधारकाला नुकसानपुर्व स्थितीमध्ये आणण्यास मदत करतो.

“I don't have health insurance. But I do have car insurance. So whenever I get seek, I go crash my car into a tree.” वाचून हसू आलं ना. या quote मधला विनोदाचा, उपहासाचा भाग सोडला तर रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण इतके गुंतलेलो आहोत की, आपण ज्या विविध जोखीमयुक्त घटकांचा अविभाज्य भाग बनून गेलो आहोत, त्याचाच विसर पडतो. मुळातच बहुतांश लोकांसाठी विमा अर्थात इन्शुरन्स (Insurance) हाच मुळी optional subject असतो. त्यातून फार तर  “लाईफ इन्शुरन्स (Life Insurance)” आणि कायद्याने अनिवार्य केला गेल्यामुळे “मोटार इन्शुरन्सची (Motor Insurance)” ओळख आपल्याला झालेली असते. तेव्हा आज आपण लाईफ इन्शुरन्सव्यतिरिक्त (जीवन विमा) इतर सर्व अजैविक वस्तूंना होऊ  शकणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण देणारा “नॉन-लाईफ इन्शुरन्स” अर्थात ज्याला सर्वसाधारणपणे “जनरल इन्शुरन्स (General Insurance)” (अर्थात सामान्य विमा) असे संबोधले जाते, त्याची ओळख करून घेणार आहोत.

जनरल इन्शुरन्स हा देखील इन्शुरन्स कंपनी (Insurer) आणि पॉलिसीधारक (insured) यांच्यामध्ये अस्तित्वात आलेला कायदेशीर करार असतो. मात्र लाईफ इन्शुरन्स पॉलिसीधारकाचा विशिष्ट कालावधीमध्ये (Policy Term) मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाकरिता आर्थिक आधार देण्याची भूमिका बजावतो. तर जनरल इन्शुरन्स मृत्यूव्यतिरिक्त उर्वरित आर्थिक नुकसान भरून काढून पॉलिसीधारकाला नुकसानपुर्व स्थितीमध्ये आणण्यास मदत करतो. या करारानुसार ज्या पॉलिसीधारकाचे आर्थिक हित गुंतलेले असते, तो पॉलिसीधारक संभाव्य धोक्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून प्रिमिअमचा भरणा करून इन्शुरन्स कंपनीकडे आपली जोखीम ट्रान्सफर करतो. तर अशा प्रकारचे संरक्षण देणारी जनरल इन्शुरन्स कंपनी ही त्या पॉलिसीधारकाचे नुकसान झाल्यास प्रत्यक्ष झालेल्या आर्थिक हानीच्या इतकेच नुकसान भरून देण्याचे कबूल करीत असते मात्र तशा संभाव्य धोक्यांचा आणि संरक्षणप्राप्त गोष्टींचा उल्लेख करारामध्ये स्पष्टपणे केला गेलेला असतो. सर्वसाधारणपणे जनरल इन्शुरन्स एका वर्षासाठी केलेला करार असतो. अपवादात्मक स्थितीमध्ये तो पाच वर्षांइतकादेखील असू शकतो.

सुरुवातीला उल्लेखलेल्या quote मधील मोटार इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स (Motor & Health Insurance) हे प्रकार जनरल इन्शुरन्स मध्येच मोडतात. रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांचे अपघात किंवा चोरी अथवा नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झाल्यास मोटार इन्सुरन्सचे विविध प्रकार ज्याप्रमाणे नुकसानभरपाई करत असतात, त्याचप्रमाणे आरोग्य विमा (हेल्थ इन्शुरन्स) पेशंटस् च्या आजारपणात हॉस्पिटलायझेशन, क्रिटिकल इलनेस कव्हर  तसेच इतर दुय्यम / सहाय्यक (secondary / auxiliary) सेवांच्या करीता होणाऱ्या खर्चांसाठी नुकसानभरपाई देत असतो. याव्यतिरिक्त जनरल इन्शुरन्समध्ये पॉलिसीधारकाला देण्यात येणाऱ्या नुकसानीच्या संरक्षणाच्या क्षेत्राची व्याप्ती अतिप्रचंड आहे. त्यातील महत्वाची क्षेत्रे आणि त्यांना संभाव्य धोक्यांपासून होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देणारे जनरल इन्शुरन्सचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

General Insurances

  1. फायर इन्शुरन्स (Fire Insurance) : कारखाने, गगनचुंबी इमारतींना संरक्षण, रेल्वे-जहाजांतून  वाहून नेला जाणारा माल, तसेच मालाचे अग्नीमुळे नुकसान झाल्यास संरक्षण मिळवण्यासाठी.
  2. ट्रॅव्हल इन्शुरन्स (Travel Insurance) : प्रवासातील चोरी, पासपोर्ट-इतर महत्वाचे सामान हरविणे, विमान हायजॅक केले गेल्यास होणारे नुकसान भरून काढण्यासाठी.
  3. होम इन्शुरन्स (Home Insurance) : घराला नैसर्गिक आपत्ती किंवा आगीपासून तसेच चोरी, दरोडा यामुळे किमती चीजवस्तू, दागिन्यांना असलेल्या धोक्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी.
  4. मोटार इन्शुरन्स (Motor Insurance) : यामध्ये “थर्ड पार्टी इन्शुरन्स”च्या (Third Party Insurance-TPA) अंतर्गत वाहनामुळे इतर सार्वजनिक संपत्ती, वाहनचालकांव्यतिरिक्त अपघातात सापडलेली व्यक्ती यांना झालेले नुकसान कव्हर केले जाते.
  5. मरीन इन्शुरन्स (Marine Insurance) : सागरी वाहतुकीदरम्यान मालाला असणाऱ्या वादळ, आग, जहाजाला जलसमाधी, सागरी मार्गातील विलंब, चाचेगिरीपासून (pirates) धोका, तसेच मालाचे सागरी हवामानामुळे होणारे नुकसान कव्हर केले जाते. 
  6. हल आणि कार्गो इन्शुरन्स (Cargo Insurance) : जहाज, विमान यांना प्रत्यक्ष होणारे नुकसान भरून काढण्यासाठी.
  7. कमर्शिअल इन्शुरन्स (Commercial Insurance) : यामध्ये की-पर्सन इन्शुरन्स (महत्वाच्या व्यक्तीच्या नसण्याच्या स्थितीमध्ये होणारे नुकसान), प्रॉपर्टी इन्शुरन्स, इंजिनिअरिंग इन्शुरन्स, तसेच कामगारांच्या अचानक होणाऱ्या संप-टाळेबंदी यामुळे होणारे व्यावसायिक नुकसान (Business interruption) अशा गोष्टी कव्हर केल्या जातात. 
  8. मोबाईल इन्शुरन्स (Mobile Insurance) : अलिकडेच मोबाईलकरीता मोबाईल इन्शुरन्ससारखे प्रकार देखील उपलब्ध झाले आहेत.