Foreign Exchange Reserves याचा मराठीत परकीय चलन साठा असा अर्थ होतो. आता परकीय चलन साठा म्हणजे आपला देश सोडून इतर देशांचा म्हणजेच विदेशी चलनांचा साठा. जी आपल्या दृष्टीने एक प्रकारची मालमत्ता आहे. विदेशी चलनामध्ये कोणत्याही परदेशातील देशाचे चलन, सिक्युरिटीज, बॉण्ड असू शकतात.
अमेरिकेचा विचार करता डॉलर हे चलन संपूर्ण जगात मान्य आहे. म्हणजे भारतीय रुपयालाही जगात मान्यता आहे. पण ज्या पद्धतीने डॉलरची सर्वत्र देवाण-घेवाण होते. तशी रुपयाची होत नाही. अनेक देश मध्यस्थी चलन म्हणून डॉलरचा उपयोग करतात. त्यामुळे परकीय चलन साठ्यात सर्वाधिक वाटा हा अमेरिकेच्या डॉलरचा असू शकतो.
Table of contents [Show]
Forex Reserve म्हणजे काय?
Foreign Exchange Reserves ही टर्म Forex Reserve अशीही वापरली जाते. या दोन्हीचा अर्थ एकच आहे. Foreign Exchange या दोन शब्दांनी मिळून Forex हा शब्द तयार झाला आहे. याचाल काही जण रिझर्व्ह करन्सी (Reserve Currency) देखील म्हणतात.
परकीय चलनाचा साठा कोण करतं?
परकीय चलनाचा साठा हा देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून केला जातो. भारताबद्दल सांगायचे झाले तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे परकीय चलनाचा साठा (Foreign Exchange Reserves) केला जातो. यामध्ये परदेशातील देशांची चलने, रोखे, ट्रेझरी बिले आणि इतर सरकारी सिक्युरिटीज यांचा समावेश असतो. या साठ्याचा उपयोग स्वत:च्या देशाचे चलनविषयक धोरण ठरविताना होतो. परकीय चलनाबरोबरच सोन्याचा साठा हा देखील प्रत्येक देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. अनेक देश नोटांची छपाई करताना त्या बदल्यात सोन्याची साठवणूक करतात.
कोणत्या देशाकडे सर्वाधिक परकीय चलन आहे?
जगाचा विचार करता सर्वाधिक परकीय चलन (Forex Reserves) हे चीनमध्ये आहे. चीनकडे 3,400,780 मिलिअन डॉलर इतका परकीय चलनाचा साठा आहे. इंटेरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार चीनच्या परकीय साठ्यात मोठ्या संख्येने अमेरिकन डॉलर आहेत. चीननंतर पहिल्या 10 देशांमध्ये जपान, स्वित्झर्लंड, भारत, रशिया, तैवान, हाँगकाँग, साऊथ कोरिआ, सौदी अरेबिया आणि ब्राझिल यांचा क्रमांक लागतो. तर महासत्ता असलेली अमेरिका या यादीत 13 व्या क्रमांकावर आणि भारत चौथ्या क्रमांकावर आहे.
परकीय चलनसाठा भारतासाठी महत्त्वाचा का?
परकीय चलनसाठा हा फक्त भारतासाठीच नाही सर्व देशांच्यादृष्टिने महत्त्वाचा भाग आहे. देशाचा अर्थविषयक किंवा चलनविषयक धोरण ठरवताना आपल्याकडे परकीय चलनसाठा किती आहे? हे विचारात घेतले जाते. कारण भारताला जेव्हा इतर देशांशी देवाण-घेवाणीचे व्यापारविषयक करार करायचे असतात तेव्हा ते सर्व व्यवहार डॉलरमध्ये होतात. याच्यासाठी आपल्याकडे पुरेशा परकीय चलनाचा साठा असणे आवश्यक आहे. तसेच हा साठा आरबीआय इतर सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणुकीसाठी वापरते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (International Monetary Fund-IMF) गुंतवणूक करण्यासाठी परकीय चलन वापरले जाते.