Compounded Annual Growth Rate: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना नेहमी CAGR पाहिला जातो किंवा दाखवला जातो. CAGR म्हणजे कम्पाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट (Compounded Annual Growth Rate-CAGR). यालाच साध्यासोप्या भाषेत वार्षिक परतावा म्हणतात. आपल्याला जर वार्षिक चक्रवाढ दर समजून घ्यायचा असेल, तर त्यापूर्वी चक्रवाढ दर म्हणजे काय? आणि तो कसा मोजला जातो, हे समजून घेणे गरजेचे आहे.
चक्रवाढ दर हा शब्द चक्रवाढ व्याज या संकल्पनेवर आधारित वापरला जातो. गुंतवणूकदार जेव्हा एखादी रक्कम बँकेत किंवा योजनेमध्ये गुंतवतो. तेव्हा बँक गुंतवणूकदाराला त्या रकमेवर व्याज देते. पण मूळ मुद्दल रकमेबरोबरच (Principal Amount) जमा झालेल्या व्याजावरही जेव्हा व्याज मिळते. तेव्हा त्याला चक्रवाढ व्याज (Compound Interest) म्हणतात. उदाहरणार्थ, 100 रुपयांच्या गुंतवणुकीवर 5 टक्के चक्रवाढ व्याज दिले जात आहे. म्हणजे पहिल्या वर्षी त्या 100 रुपयांवर 5 रुपये व्याज मिळाले. त्याच्या पुढच्या वर्षी जेव्हा व्याज मोजले जाणार तेव्हा 100 रुपये अधिक त्यावर 5 रुपये व्याज म्हणजे एकूण 105 रुपयांवर पुन्हा चक्रवाढ व्याज मिळणार त्याची किंमत असणार 5.25 रुपये. अशाप्रकारे, गुंतवणूकदाराच्या मूळ रकमेत जे व्याज जमा होते. त्या व्याजावरील व्याजाला चक्रवाढ व्याज (Compound Interest) म्हणतात.
दीर्घकालीन गुंतवणुकीतून संपत्तीत वाढ
गुंतवणुकीचा कालावधी दीर्घकालीन असेल, तर चक्रवाढ व्याजातून तुमच्या संपत्तीत वाढ होण्यास मदत होऊ शकते. जसे की, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली त्यावर तुम्हाला 10 टक्के कम्पाऊंड इंटरेस्ट मिळत आहे. तर तुमच्या 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 20 वर्षांनी मूल्य जवळपास 6.5 लाख रुपये होईल. यावरून तुम्ही पाहू शकता की, तुमच्या गुंतवणुकीत साडेसहापटीने वाढ झाली. ही चक्रवाढ व्याजाची गंमत आहे.
परतावा आणि CAGR मध्ये फरक काय?
परतावा म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून झालेला एकूण नफा, जो टक्केवारीतून दर्शवला जातो. उदाहरणार्थ, तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले आहेत आणि 3 वर्षात त्या 1 लाखाचे 1.4 लाख रुपये झाले. म्हणजे एकूण फायदा 40 हजार रुपयांचा म्हणजेच 40 टक्के परतावा. हा परतावा वरकरणी तसा चांगला वाटतो. कारण यामध्ये गुंतवणुकीचा कालावधी विचारात घेतला जात नाही. इथे 3 वर्षांचा कालावधी होता. त्यामुळे तो योग्य वाटत होता. पण 40 टक्के परताव्यासाठी तुम्हाला जर 10 वर्षे वाट पाहावी लागत असेल तर त्या गुंतवणुकीला काही अर्थ नाही. कारण या 10 वर्षात परताव्याबरोबरच महागाई सुद्धा वाढणार. ज्याचा तुमच्या गुंतवणुकीवर विपरित परिणाम होणार. यासाठी कम्पाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट खूप फायदेशीर ठरतो. यातून तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी जितका वाढतो. तितके तुमच्या गुंतवणुकीचे मूल्यदेखील वाढते.
प्रत्येक म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला की, त्याचा कम्पाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट चेक करतो. बहुतांश सर्वच म्युच्युअल फंड कंपन्या 1, 3, 5 आणि फंडाच्या स्थापनेपासूनचा चक्रवाढ वार्षिक वाढ दर (Compounded Annual Growth Rate) जाहीर करत असतात. सीएजीआर हा दर वन टाईम गुंतवणुकीवर लागू होतो. याचा वापर एसआयपी, एसटीपी, एसडब्ल्यूपी आदींसाठी करू नये. सीएजीआरमधून फंडाचा एकूण आढावा मिळतो. वेगवेगळ्या फंड हाऊसच्या स्कीमची तुलना सीएजीआरच्या माध्यमातून केली जाऊ शकते.