काही जणांना शॉपिंगचे इतके व्यसन जडलेले असते की, काहीही औचित्य नसताना ते बाजारातून महागड्या वस्तू खरेदी करतात. ज्याची त्यांना अजिबात गरज नसते. तुम्हाला देखील अशीच काहीशी सवय असेल आणि त्यामुळे तुम्हाला बचत करणे कठीण जात असेल तर भारतीय जीवन विमा महामंडळची एंडोमेंट पॉलिसी तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकेल. ती कशाप्रकारे लाभदायक ठरू शकते, याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.
एंडोमेंट पॉलिसीचे फायदे आणि परतावा अधिक असल्याने या पॉलिसीचा हफ्ता इतर पॉलिसींपेक्षा थोडा अधिक असतो. एंडोमेंट पॉलिसीमध्ये बरेच प्रकार आहेत. ही पॉलिसी 12 ते 35 वर्षांच्या कालावधीसाठी घेतली जाऊ शकते. तर वयाच्या 8 व्या वर्षापासून ते 55 वर्षांपर्यंत ही पॉलिसी घेता येते आणि वयाच्या 75 वर्षापर्यंत सुरू ठेवता येते.
एंडोमेंट पॉलिसीमध्ये विमाधारकाच्या मृत्यूनंतर मोठी रक्कम कुटुंबियांना/नॉमिनीला मिळते. तसेच पॉलिसीची मुदत संपल्यानंतर ही विमाधारक जिवंत असेल तर त्याला देखील याचा लाभ मिळतो. त्यामुळे वृद्धापकाळाचा विचार करून, मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी तसेच घर घेण्यासाठी लागणारा निधी उभा करण्यासाठी या पॉलिसीचा नक्कीच विचार करू शकता. जितक्या रकमेची एंडोमेंट पॉलिसी काढली आहे, तितकी रक्कम पॉलिसीची मुदत संपल्यानंतर विमाधारकाला मिळते. मुदतीच्या आधी विमाधारकाचा मृत्यू झाल्यास ती रक्कम त्याच्या वारसदाराला मिळते.
एंडोमेंट प्लान घेण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे गरजेच्या आहेत. जसे की, या योजनेत निश्चित परतावा मिळतो. पॉलिसीवर बोनस मिळत असल्याने विमाधारकाला जिवंत असतानाही आर्थिक लाभ मिळतो आणि विमा धारकाचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या वारसदाराला आर्थिक लाभ मिळतो.
तसेच या पॉलिसीमुळे कर सवलत मिळते.
एंडोमेंट प्लानचे फायदे
परिपक्वता (Maturity)
ही पॉलिसी 12 ते 35 वर्षांच्या कालावधीसाठी असते. पॉलिसी मुदतीच्या अखेरपर्यंत विमाधारक जिवंत राहिल्यास विमाधारकाला मोठी रक्कम मिळते. विमा राशी, जमा झालेला बोनस आणि अंतिम वाढीव बोनस विमाधारकाला परिपक्वतेचा (Maturity) लाभ म्हणून मिळतो. या पॉलिसीचा लाभ मिळाल्यानंतर ही पॉलिसी बंद होते.
आयकर (Tax)
या पॉलिसीमुळे एका आर्थिक वर्षात कलम 80 सी अंतर्गत 1.5 लाख रूपयांची सवलत मिळते. तसेच ही पॉलिसी मॅच्युर्ड झाल्यानंतर मिळणारी रक्कम कलम 10 (10) ड च्या अंतर्गत करमुक्त असते.
बचतीची सवय लावणारी पॉलिसी (Saving Plus Insurance)
प्रत्येक महिन्याला तुम्हाला एक ठराविक रक्कम मिळत असेल आणि या रक्कमेतील काही रक्कम तुम्ही बाजूला ठेवू शकत असाल तर एंडोमेंट पॉलिसीचा विचार करायला हरकत नाही. या पॉलिसीची मुदत संपल्यानंतर विमाधारकाला मोठी रक्कम मिळते. नोकरी करणारे, छोटे व्यवसाय करणारे, वकील-डॉक्टर यांसारखे व्यावसायिक सुद्धा या पॉलिसीचा नक्की विचार करू शकतात.
एंडोमेंट पॉलिसीमध्ये कोणताही धोका न पत्करता एका ठराविक काळानंतर चांगली रक्कम मिळते. कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी, बचतीसाठी आणि भविष्यात मिळणाऱ्या एका मोठ्या रकमेसाठी एंडोमेंट पॉलिसीचा नक्कीच विचार केला जाऊ शकतो. मात्र, याचा हफ्ता दरवर्षी भरणे आवश्यक आहे. तो काही कारणांमुळे भरला गेला नाही तर, पॉलिसी रद्द होऊ शकते. बाजारात अनेक एंडोमेंट पॉलिसी उपलब्ध आहेत. तुमचे उत्पन्न, वय आणि ईएमआय याचा विचार करून तुमच्यासाठी योग्य एंडोमेंट पॉलिसीची निवड करू शकता.