साठे खत (Agreement for sale) म्हणजे खरेदी खतापूर्वीची (Sale Deed) कायदेशीर प्रक्रिया होय. खरेदीखत एकाच दमात, एकाच रक्कमेत पूर्ण होते. पण जर रक्कम टप्प्याने देण्यात येत असेल तर या विश्वासाला साठे कराराची जोड दिली जाते. जमीन, जागा याचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी, मालकी हस्तांतरण करण्यासाठी खरेदीदार एक अभिवचन विक्रेत्याला देतो, ते म्हणजे साठे करार (Agreement for sale) होय.
Table of contents [Show]
भविष्यातील मिळकतीचा करारनामा
पूर्ण रक्कम देईपर्यंत साठे करार प्रभावी राहतो. त्यात कायदेशीररित्या दोन्ही पक्ष बांधिल असतात. एखादी मिळकत भविष्यात खरेदी करण्यासाठी Agreement for Sale हा दोन पक्षातील सामंजस्य करार असतो. एकदा रक्कम पूर्ण झाली की, अंतिम खरेदी खत महत्त्वाची भूमिका बजावते. संबंधित मिळकत खरेदीदाराला कोणत्या अटी आणि शर्तींवर हस्तांतरीत करण्यात येईल, याची सविस्तर माहिती साठे खतामध्ये, साठे करारामध्ये नमूद असते. मालमत्ता हस्तांतरण कायदा,1882 (Transfer of property act 1882) मध्ये संपत्ती, मिळकत, जमीन, जागा विक्री व्यवहार आणि हस्तांतरणाची कायदेशीर प्रक्रिया देण्यात आली.
वचन दिले तू मला!
आता साठे करार (Agreement for Sale) म्हणजे एकप्रकारे वचनच म्हणा ना. साठे करार हा एखादी मिळकत भविष्यात हस्तांतरीत करण्याचा करार आहे. हा करार झाला म्हणजे मिळकत तुमच्या नावे झाली, असा दावा तुम्हाला मुळीच करता येत नाही बरं. ‘मुळीच नव्हतं रे माझ्या मनात, जागा येईल माझ्या ताब्यात’, असं तुम्ही सर्व रक्कम दिल्यावर म्हणू शकता. साठे करार झाला नी तुम्ही लागलीच जागेवर ताबा सांगाल तर ते शक्य नाही.
साठे करारात ज्या अटी आणि शर्ती नमूद केल्या आहेत. त्याप्रमाणे पुढील प्रक्रिया पार पडली तर साठे करार संपुष्टात येऊन खरेदीखत व्यवहार पूर्ण करु शकता. तोपर्यंत प्रस्तावित खरेदीदाराला संबंधित मिळकती वर कसलाही हक्क प्राप्त होत नाही.
कायदा काहीच वेगळं सांगत नाही..
मालमत्ता हस्तांतरण कायदा,1882 (Transfer of property act 1882) या कायद्यातील कलम 54 नुसार, दोन पक्षांमध्ये मान्य असलेल्या करारातील अटींनुसार, एखाद्या मिळकतीचा विक्री व्यवहार पूर्ण होतो. निव्वळ असा करार झाला. साठे करार झाला, साठे खत झाले म्हणजे संबंधित मिळकतीवर खरेदीदाराचा कसलाही हक्क किंवा हितसंबंध प्रस्थापित होत नाही. कारण Agreement for Sale हा केवळ एखादी मिळकत भविष्यात हस्तांतरीत करण्याची वचन देणारा करार असतो. अटी आणि शर्तींची पूर्तता केल्यास खरेदी खतानंतर खरेदीदाराला मालकी हक्क हस्तांतरीत होतो.
कायदेशीर तोडगा!
साठे करारानुसार भविष्यातील मिळकतीसाठी खरेदीदाराने संपूर्ण रक्कम दिली आणि त्याला मिळकतीचा ताबा मिळाला नाहीतर, खरेदीदाराला specific relief act, 1963 नुसार न्यायालयात दाद मागता येते. त्याला खरेदी खत करण्याची म्हणजेच मालकी हस्तांतरणाची मागणी कायद्यानुसार करता येते.