• 28 Nov, 2022 16:58

खरेदी खत (Sale Deed) म्हणजे काय?

What is Sale Deed

खरेदी खताला इंग्रजीत Sale Deed म्हणतात. म्हणजेच मालकीचं हस्तांतरण. थेट मालकच बदलायचा तर खरेदी खत करावं लागतं. मालकी हक्काचा प्रबळ पुरावा म्हणजे खरेदी खत असते. इंग्रजीत याला Sale Deed म्हणत असले तरी मराठीत याला खरेदी खत (Sale Deed) म्हणतात.

मूळ मालकाकडून शेतजमीन (Agriculture Land), घर (Home), भूखंड (Plot), सदनिका (Flat) किंवा एखादा टुमदार वाडा आपण खरेदी केला की, याचे मालकी हस्तांतरण ज्या कागदावर होते, त्याला खरेदी खत असे म्हणतात. खरेदी खत हा मालकी हस्तांतरणाचा कायदेशीर जाहीरनामा (Legal Declaration of Transfer of Ownership) आहे. म्हणजे तुमची एक अमुकतमूक जागा, घर तुम्ही संबंधित व्यक्तीच्या नावे करुन देता. सरकारी दप्तरात त्याची नोंद करता. सरकार या व्यवहाराला मान्यता देते. ही सर्व जी प्रक्रिया करण्यात येते तिला कायद्याच्या भाषेत खरेदीखत (Sale Deed) म्हणतात.

मालकी हस्तांतरणाचा कायदेशीर पुरावा! (Legal Proof of Ownership!)

दोन व्यक्तींमध्ये, दोन पक्षांमध्ये जमीन, मालमत्ता विक्रीचा व्यवहार हा सहमतीने होतो. ठरलेली रक्कम अदा करण्यात येते.पण हा व्यवहार पूर्ण झाला याचा काही पुरावा असणे आवश्यक असते. मालकी हक्क हस्तांतरीत झाला याची नोंद दोन्ही पक्षाकडे असावी. कायद्याच्या भाषेत मालकी हस्तांतरण पूर्ण झाले याचा पुरावा म्हणजे खरेदी खत असते. खरेदीखत म्हणजे संबंधित जमीन, जागेचे मालकी हस्तांतरण पूर्ण झाले याची नोंद अथवा पुरावा होय.


एकरकमी बोलीवरच खरेदी खत बनतं!

एक गोष्ट इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ती म्हणजे व्यवहाराची. व्यवहार चोख झाला. एका झटक्यात झाला तरच खरेदीखत पूर्ण होते. म्हणजे एकरकमेची बोली पूर्ण झाली तरच खरेदीखत अस्तित्वात येते. टप्प्याटप्प्याने हा व्यवहार पूर्ण करायचा असेल तर लागलीच मालकी हस्तांतरीत होत नाही आणि मग दोन्ही पक्षांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी साठे करार करावा लागतो. 

पैशांचा व्यवहार झाल्यावरच खरेदी खत करा!

आपला व्यवहार पूर्ण होत असेल तर खरेदीखत करायला काही हरकत नाही. पण हा व्यवहार टप्प्यांमध्ये होत असेल तर शेवटची रक्कम मिळेपर्यंत तुम्ही खरेदी खत न करणे हिताचे ठरते. पूर्ण रक्कमच मिळाली नाही आणि खरेदीखत तयार झाले तर, मात्र मूळ मालकाच्या अडचणी वाढतात. समोरची पार्टी लबाड असली तर ते गोड बोलून तुम्हाला गंडा घालू शकतात. अशावेळी रक्कम ही पूर्ण मिळत नाही आण खरेदीखत झाल्याने तुम्ही मालकीही गमावून बसलेले असतात. पुढच्या कटकटी वाढू नये यासाठी व्यवहारात जागरुक राहणे आवश्यक असते. व्यवहार पूर्ण होत असेल तर खरेदी खत करणे गरजेचे ठरते.

सब-रजिस्ट्रारकडून स्टॅम्प ड्युटी जाणून घ्या!

खरेदी खत तयार करण्यासाठी संबंधित जागा, जमीन ज्या भागात आहेत, तेथील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये बाजारभावाप्रमाणे अगोदर जमीन, जागेचे मूल्यांकन काढून घ्यावे लागते. दुय्यम निबंधक (Sub-Registrar) हा मुद्रांक शुल्क (Stamp Duty) काढून देतो. त्याआधारे दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी खत तयार करण्यासाठी आवश्यक शुल्क, कागदपत्रे आणि अनुषांगिक खर्चाची माहिती मिळते. खरेदी खतावर सर्व्हे क्रमांक, जमिनीचा प्रकार, तिचे क्षेत्र, मूळ मालक आणि इतर वहीहिश्शाची माहिती द्यावी लागते. जमीन कशासाठी विक्री करण्यात येत आहे, याची माहिती द्यावी लागते. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर खरेदी खत करण्यात येते. 

खरेदी खत तयार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे! (Document for Sale Deed)

खरेदी खत तयार करण्यासाठी 712, मुद्रांक शुल्क, 8 अ, मुद्रांक शुल्काची पावती, प्रतिज्ञापत्र, फेरफार, दोन ओळखीच्या व्यक्तींचे छायाचित्र, एनए ऑर्डर, अर्जासहीत दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी सादर करावी लागतात.