गेल्याकाही काळापासून भारत एका अनोख्या परिस्थितीतून जात आहे. बरेच लोक संपत्तीने श्रीमंत आहेत. परंतु त्यांना पुरेसे उत्पन्न नाही. ते खूप श्रीमंत आहेत कारण त्यांनी काही दशकांपूर्वी कमी किमतीत मालमत्ता खरेदी केली होती. आज किमती कितीतरी पटीने वाढल्या आहेत, त्यामुळे महागाईही वाढली आहे. दुर्दैवाने त्यांच्यापैकी अनेकांना निवृत्तीनंतरचे उत्पन्न हे चांगली जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या उपचारांसाठी पुरेशी ठरत नाही. परिणामी , यापैकी बरेच लोकआर्थिक संकटात येतात . त्यांना त्यांची मालमत्ता विकावी लागते. दूरच्या ठिकाणी राहण्यासाठी जावे लागते. ह्यामुळे त्यांचे जीवन विस्कळीत होते आणि पदरी नैराश्य येते. सुदैवाने इथे आर्थिक समस्या असली तरी त्यावर काही उपाय ही आहेत. आज आपण याच्याशी संबंधित भारत रिव्हर्स मॉर्गेज योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.
रिव्हर्स मॉर्गेज स्कीम म्हणजे काय ?
रिव्हर्स मॉर्गेज स्कीम ही मॉर्गेज स्कीमच्या अगदी विरूद्ध आहे. मॉर्गेज म्हणजे तारण किंवा गहाण ठेवणे. होम लोन घेताना आपण बॅंकेकडून कर्ज म्हणून पैसे घेतो. तसे रिव्हर्स मॉर्गेज मध्ये आपण आपले राहते घर बॅंकेकडे तारण म्हणून ठेवतो आणि त्याबदल्यात बॅंक संबंधित व्यक्तीला प्रत्येक महिन्याला ठरावीक रक्कम देते. याचा उपयोग नियमित उत्पन्न म्हणून करता येते. यामध्ये कर्जदाराला किंवा रिव्हर्स मॉर्गेज घेणाऱ्या व्यक्तीला त्याची राहती मालमत्ता रिकामी करण्याची गरज नसते. तसेच बॅंक आणि कर्जदार यांच्यामध्ये सामंजस्याने ठरल्यानुसार त्याचे नियम तयार केले जातात आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाते.
रिव्हर्स मॉर्गेजचा वापर कशासाठी
रिव्हर्स मॉर्टगेज कर्जाखाली घेतलेले पैसे, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, दिवसागणिक गरजा, दुरुस्ती व मालमत्तेचे नूतनीकरण आणि परतफेड अशा विशिष्ट उद्दीष्टांसाठी वापरता येतात. प्रत्येक महिन्याला EMI पद्धतीने ठरावीक रक्कम मिळते.
रिव्हर्स मॉर्गेजसाठी पात्रता
६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेला घरमालक रिव्हर्स मॉर्गेज कर्जासाठी पात्र आहे. एखादे विवाहित जोडपे आर्थिक मदतीसाठी जॉईंट कर्जदार म्हणून पात्र ठरू शकतात. पण जोडीदारापैकी एकाचे किमान वय 60 वर्षांपेक्षा जास्त असायला हवे आणि अर्थातच रिव्हर्स मॉर्गेज लोन देणाऱ्या बॅंकेच्या नियमानुसार ते ठरते.
रिव्हर्स मॉर्गेजचे नियम
मालमत्ता किंवा प्रॉपर्टीचे टायटल क्लिअर असायला पाहिजे. प्रॉपर्टीवर कर्ज घेणाऱ्याचे नाव असावे. प्रॉपर्टीच्या एकूण किमतीच्या कमाल 60 टक्के रक्कम कर्ज स्वरूपात मिळते. काही बॅंका 60 टक्क्यांपेक्षा ही अधिक कर्ज देतात. यात प्रत्येक महिन्याला, तीन महिन्यांनी, एका वर्षाने किंवा एकदम सर्व कर्ज फेडण्याचा पर्याय असतो. कर्जदार जिवंत असेपर्यंत कर्जाची परतफेड करण्याची आवश्यकता नाही . कर्जदाराने घराशी संबंधित सर्व टॅक्स भरले पाहिजेत. तसेच घराची योग्य पद्धतीने निगा राखली पाहिजे.
• राहत्या घराचे ठरावीक कालावधीने मूल्यमापन केले जाते. हे कर्जदारांनी ध्यानात घ्यायला हवे. प्रॉपर्टीच्या पुनर्मुल्यांकनावर आधारित मासिक किंवा एकरकमी रकमेत बदल करण्याचा पर्याय बँकांकडे असतो.
• जेव्हा शेवटचा जिवंत कर्जदार मरण पावतो किंवा घर विकू इच्छितो किंवा कायमचे बाहेरगावी जाऊ इच्छितो तेव्हाच कर्ज फेडता होईल.
• घरमालकाच्या मृत्यूनंतर, कायदेशीर वारसांना घर ठेवण्याचा किंवा विकण्याचा पर्याय असतो. त्यांनी घर विकण्याचा निर्णय घेतल्यास, विक्रीतून मिळालेली रक्कम कर्ज फेडण्यासाठी वापरली जाते आणि उरलेली रक्कम वारसांना मिळते.
• नॅशनल हाऊसिंग बँके ( NHB) च्या नियमांनुसार, कर्जाच्या कालावधीचा कमाल कालावधी 15 वर्षे आहे. प्रॉपर्टीचे किमान आयुष्य 20 वर्षे असावे. ही प्रॉपर्टी कर्जदाराचे कायमच्या वास्तव्याचे ठिकाणे असावे.
• आर्थिक वर्ष 2008-09 पासून , रिव्हर्स मॉर्गेजमधून मिळणाऱ्या रकमेवर कोणत्याही प्रकारचा टॅक्स लावला जात नाही.
रिव्हर्स मॉर्गेजचे सेटलमेंट
कर्जदाराच्या मृत्यूनंतर किंवा कर्जदाराने घराची मालमत्ता कायमची सोडल्यास किंवा कर्जाचा कालावधी संपल्यानंतर , घराच्या विक्रीदतून कर्जाची परतफेड व्याजासह केली जाते. कर्जदार/वारस देखील कर्जाची परतफेड करू शकतात. तसेच ते प्रॉपर्टी न विकता ती गहाण ठेवू शकतात. प्रॉपर्टीच्या विक्रीतून मिळालेली अधिकची प्रॉपर्टीच्या कायदेशीर वारसांना दिली जाते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रॉपर्टी विक्रीदरम्यान होणारे नुकसान हे बँकेद्वारे भरले जाते.
रिव्हर्स मॉर्गेज लोनची लक्षणीय वैशिष्ट्ये
कर्जदार कर्जाच्या कालावधीत कोणतेही प्री-पेमेंट शुल्क न भरता कधीही कर्जाची परतफेड करू शकतो. कर्जाची मुदत संपल्यावर कर्जदाराला घरातून बाहेर काढता येणार नाही . पण त्याची मासिक बिलं जप्त केली जाऊ शकतात. रिव्हर्स मॉर्गेज स्कीमला, रिव्हर्स मॉर्गेज सक्षम वार्षिकी योजना असेही म्हटले जाते.