सध्या महाराष्ट्रातील राजकारणात बरीच उलथापालथ सुरू आहे. एकीकडे सरकार पडण्याच्या स्थितीत आहे; तर दुसरीकडे एका पक्षाचे मूळ अस्तित्व धोक्यात आले आहे. यात आमदारांची संख्या, पक्षप्रमुख आणि राजकारण थोडं बाजूला ठेवून यातील अनेक आर्थिक गणितांपैकी एक साधंसोप्पं आमदारांची ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चार्टर्ड विमानाच्या (chartered plane) खर्चाचं आर्थिक गणित समजून घेणार आहोत.
चार्टर्ड विमान हे शक्यतो पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि मोठमोठं बिझनेसमॅन वापरतात. अर्थात या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वेळे ही खूप मोठी आणि मौल्यवान गोष्ट आहे. पण सध्या राज्यात सुरू असलेल्या आमदारांच्या बंडामुळे चार्टर्ड विमानांचा खर्च किती? ते कोणासाठी वापरले जाते? यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते का? आमदारांना बंड करण्यासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी चार्टर्ड विमानंच का वापरले जाते? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागले आहेत. यातील काही उत्तरं राजकीय जाणकार नक्कीच सांगू शकतात. पण आज आपण चार्टर्ड विमानांबद्द्लची इत्यंभूत माहिती जाणून घेणार आहोत.
चार्टर्ड प्लेन म्हणजे काय?
साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, चार्टर्ड फ्लाइट ही अशी एक फ्लाइट आहे, जी वैयक्तिकरीत्या, व्यावसायिक कामासाठी किंवा इतर महत्त्वाच्या कामासाठी बूक किंवा आरक्षित केलेली असते. चार्टर्ड फ्लाईट ही इतर व्यावसायिक विमानांचे वेळापत्रक फॉलो करत नाही. चार्टर्ड प्लेन बुक करणाऱ्या व्यक्तीच्या गरजेनुसार याचे वेळापत्रक तयार केले जाते. थोडक्यात सांगायचं झालं तर हे प्लेन काही वेळासाठी भाड्याने घेतंल जातं.
चार्टर्ड फ्लाइटमधील सीट्स या पॅकेजनुसार किंवा सीटनुसार ही विकल्या जातात. ही उड्डाणे 'खाजगी' असली तरी येथे कोणत्याही प्रकारची मनमानी करता येत नाही. चार्टर प्लेनची उड्डाणे, त्याची ऑन-बोर्ड सुरक्षा यासाठी फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनचे (FAA) नियम पाळावे लागते. यावर एफएए (FAA)ची नजर असते.
चार्टर्ड प्लेनचे कोणते प्रकार आहेत?
तुमची स्वतःसाठी चार्टर्ड फ्लाइट बुक करण्याचा विचार करत असाल, तर चार्टर्ड प्लेनचे विविध प्रकार आहेत. यात प्रामुख्याने प्रायव्हेट चार्टर्ड, पब्लिक चार्टर्ड, अॅफिनिटी चार्टर्ड आणि कार्गो चार्टर्ड असे 4 प्रकार आहेत.
चार्टर प्लेन कुठून उड्डाणं घेतात?
चार्टर्ड प्लेन नियमित विमानतळांवरून किंवा संरक्षण दलाच्या तळावरून उड्डाण करू शकतात. अर्थात यासाठी विमान वाहतूक प्राधिकरणाची परवागनी घ्यावी लागते. चार्टर्ड विमानातून भारतीय व्यक्ती प्रवास करत असतील तर लगेच परवानगी मिळू शकते. पण परदेशातील व्यक्तींसाठी (भारत सरकारने आमंत्रित न केलेले, परदेशातील राजकीय व प्रशासकीय अधिकारी वगळता) मंजुरी मिळवण्यासाठी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते.
चार्टर्ड प्लेनचा खर्च किती येतो?
चार्टर्ड प्लेनचा खर्च हा तासांवर आधारित असतो. साधारणत: चार्टर्ड प्लेन भाड्याने बुक केल्यास एका तासाला किमान 1.5 ते 2 लाख रूपये भाडं आकारलं जातं. चार्टर्ड प्लेन भाड्याने घेताना तासांचा हिशोब पकडला जातो. 5 तासांच्या प्रवासासाठी चार्टर्ड प्लेनसाठी अंदाजे 10 लाखांचा खर्च येऊ शकतो. तसंच याचं उड्डाणाचं वेळापत्रक आपल्या गरजेनुसार असलं तरी, विमान प्राधिकरणाकडून मिळालेली वेळ पाळणं तितकंच आवश्यक असतं.
चार्टर्ड प्लेनची किंमती किती असते?
व्यावसायिक विमानांच्या तुलनेत चार्टर्ड प्लेनची किंमत जास्त असते. एका नवीन चार्टर्ड प्लेनची किंमत 5 मिलियन डॉलर तर सेकंड हॅण्ड प्लेनची किंमत 3 मिलियन डॉलर इतकी असू शकते.
चार्टर्ड प्लेनमध्ये काय-काय सुविधा असतात?
चार्टर्ड प्लेनची सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील प्रवास हा पूर्णत: खाजगी प्रवास असतो. इथे तुम्हाला सार्वजनिक नियम पाळण्याची आवश्यकता नसते. पण विमान कंपन्यांनी घालून दिलेले नियम पाळावे लागतात. विमानात चढताना किंवा उतरताना लाईन लावावी लागत नाही. बऱ्याच विमानतळांवर चार्टर्ड प्लेनसाठी वेगळी जागा असते. त्यामुळे खूप वेळ वाट पाहावी लागत नाही. चार्टर्ड प्लेनमधून पेट्सना घेऊन जाण्याची परवानगी असते. तसेच विमान प्राधिकरणाकडून परवानगी मिळालेल्या प्रवासानुसार आपण कोठेही आणि किती ही वेळ प्रवास करू शकतो.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            