‘थिमॅटिक’ या शब्दाप्रमाणेच थिमॅटिक फंड (Thematic Fund) हे एखाद्या विशिष्ट थीममध्ये गुंतवणूक करतात. विशिष्ट थीम म्हणजे एखाद्या विशेष उद्योगाशी किंवा ट्रेण्डमध्ये असलेल्या क्षेत्राशी निगडित व्यवसायामध्ये गुंतवणूक करतात. जर एखाद्या स्पेशल थीमला फायनान्शिअली खूपच डिमांड असेल तर त्या स्पेशल थीमशी निगडित असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचे ठरू शकते. थिमॅटिक फंडचे फंड मॅनेजर अशा संधीचा अधिकाधिक फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात. थिमॅटक फंड हा एक प्रकारचा इक्विटी फंड असून तो आग्रही गुंतवणूकदारांसाठी (Aggressive Investor) योग्य मानला जातो.
काय असते थिमॅटिक फंडचे गुंतवणूक धोरण?
म्युच्युअल फंड हाऊस या वेगवेगळ्या थीमवर आधारित होणाऱ्या उलाढालीची संधी पाहत असतात. त्यानुसार एखाद्या विशिष्ट थीमची बूम होणार आहे, हे फंड हाऊसच्या लक्षात आले की, त्यांच्याद्वारे थिमॅटिक फंडची स्कीम मार्केटमध्ये आणली जाते. उदाहरणार्थ, केंद्र सरकारने डिजिटल इंडिया कार्यक्रमाची घोषणा केली. तेव्हा देशभर डिजिटलचे वारे वाहत होते. अनेक कंपन्या डिजिटलशी संबंधित व्यावसायांमध्ये गुंतवणूक करत होत्या किंवा त्यांना प्रमोट करत होत्या. त्यावेळी काही फंड हाऊसने डिजिटल थीमशी संबंधित थिमॅटिक फंड मार्केटमध्ये आणले होते. थिमॅटिक फंडचे गुंतवणूक धोरण अजून चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. हे आपण जाणून घेऊ.
थिमॅटिक फंड हा एक प्रकारचा इक्विटी फंडच आहे. सेबीने घालून दिलेल्या नियमानुसार, थिमॅटिक फंडमध्ये होणारी एकूण गुंतवणुकीपैकी 80 टक्के गुंतवणूक ही इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित घटकांमध्ये असणे आवश्यक असते.
थिमॅटिक फंड हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, स्पेशल आयडिया किंवा स्पेशल थीमशी संबंधित असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. या थीमचा सामाजिक आणि राजकीयदृष्टया होणारा फायदा थिमॅटिक फंड करून घेतात. उदाहरणार्थ, केंद्र सरकारच्या एखाद्या ग्रामीण विकासावर आधारित काम करणाऱ्या कंपन्या जसे की, रसायने, शेतीची अवजारे, खते, ऑटोमोबाईल, प्रत्यक्ष शेतीतील उत्पादन आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रातील कंपन्यांमध्ये थिमॅटिक फंड गुंतवणूक करू शकतात.
थिमॅटिक फंड हा प्रकार पारंपरिक गुंतवणूक पद्धतीच्या थोडा उलट आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये कंपनीचे भांडवल किंवा त्याची कोणकोणत्या क्षेत्रात गुंतवणूक आहे. त्यावर आधारित गुंतवणूक केली जाते. पण थिमॅटिक फंडमध्ये त्याच्या भांडवल आणि विविध क्षेत्रापेक्षा स्पेसिफिक थीममधील गुंतवणूक आणि भविष्यातील प्लॅन पाहून गुंतवणूक केली जाते.
थिमॅटिक फंडचे मॅनेजर ट्रेंडिंग असलेली थीम निवडून त्यातच गुंतवणूक करण्यावर अधिक भर देतात. फंड मॅनेजरनी निवडलेली योग्य पद्धतीने थीम चालली तर थिमॅटिक फंडमधून नियमित इक्विटी फंडपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो, असं म्युच्युअल फंडमधील तज्ज्ञ सांगतात.
थिमॅटिक फंड हे उच्च परतावा देणारे फंड आहेत; तसेच उच्च जोखीम असलेले फंड आहेत. ते एका विशिष्ट थीमवर लक्ष केंद्रीत करून असतात. जर मार्केटने त्याला चांगला प्रतिसाद दिला तर अशा फंडमधून मिळणारा परतावा खूपच जास्त असतो. पण एखाद्या वेळेस ती थीम चालली नाही तर गुंतवणूकदारांचे तितक्याच मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
थिमॅटिक फंड सेक्टरल फंड आणि फोकस फंडपेक्षा वेगळे कसे आहेत?
थिमॅटिक फंडवरून बहुतांश गुंतवणूकदारांचा गोंधळ उडतो. ते बऱ्याचवेळा थिमॅटिक फंडलाच सेक्टरल फंड किंवा फोकस फंड (Sectoral Fund Or Focused Fund) समजतात. पण हे तिन्ही फंड पूर्णपणे वेगळे आहेत. फोकस फंड हे लिमिटेड स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतात. जे कोणत्याही क्षेत्राशी संबंधित असू शकतात. सेक्टर फंड हे विशिष्ट सेक्टरमध्ये गुंतवणूक करत असतात आणि ते मर्यादित असतात. तर थिमॅटिक फंड हे अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करू शकतात. त्यांचा संबंध त्या क्षेत्राशी नसून त्या क्षेत्रातील थीमशी असतो. त्यानुसार ते त्या थीममध्ये गुंतवणूक करत असतात.
सेक्टरल फंड हे फार्मा, बॅंकिंग, रिअल इस्टेट, ऊर्जा आदी क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करू शकतात. तर थिमॅटिक फंड वेगळ्या पद्धतीने काम करतात. समजा होमलोनचे दर कमी होणार असतील आणि फंड मॅनेजर्सना परवडणाऱ्या घरांच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा असेल तर ते या थीमवर फंड सुरू करू शकतात. या फंडद्वारे जमा होणारा पैसा हा कन्स्ट्रक्शन, सिमेंट, बॅंकिंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस, पेंट्स इत्यादी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकतात. आता इथे बॅंकिंग आणि कन्स्ट्रक्शन ही दोन वेगवेगळी क्षेत्र आहे. पण इथे ते एका थीमशी निगडित आहेत.
थिमॅटिक फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी हे मुद्दे लक्षात घ्या!
- थिमॅटिक फंड हे आग्रही गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत. कारण बाजारातील अस्थिरतेचा याच्यावर सातत्याने परिणाम होत असतो. ज्यांना मार्केटमधील Volatility चा अनुभव आहे; ते अशा फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात.
- तुमच्यावर जेव्हा केव्हा थिमॅटिक फंडमध्ये गुंतवणूक करण्याची वेळ येईल. तेव्हा कमी किमतीत खरेदी करून आणि अधिकच्या किमतीने विकायचे, हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवा. बरेच नवखे गुंतवणूकदार वेगवेगळ्या चर्चा ऐकून थिमॅटिक फंडमध्ये गुंतवणूक करतात. ही पद्धत नुकसानकारक ठरू शकते.
- जर तुमच्याकडे शेअर मार्केटमधील पुरेसे ज्ञान आहे आणि तुम्ही अशाप्रकारची गुंतवणूक यापूर्वी केली असेल तर तुम्ही अशा फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.
- ज्यांना शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमधील सखोल माहिती आहे. अशा अधिकृत सल्लागारांच्या मदतीने तुम्ही फंडाचा गुंतवणुकीसाठी विचार करू शकता.