Mutual Funds Risks: दीर्घकाळ म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते. निश्चित परतावा देणाऱ्या योजना जसे की, मुदत ठेवी, बाँड्स, डेट, सरकारी सेव्हिंग स्कीम्सपेक्षा जास्त परतावा इक्विटी म्युच्युअल फंडमधून मिळू शकतो. मात्र, जास्त परतावा म्हणजे जास्त जोखीमही हे लक्षात घ्या. या लेखात पाहूया म्युच्युअल फंडमध्ये धोके कोणते?
जागतिक घडामोडी
इक्विटी म्युच्युअल फंड हाऊसद्वारे विविध क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते. त्यामुळे फंड हाऊसची जोखीम विभागली जाते. मात्र, जागतिक अर्थव्यवस्था, देशांतर्गत स्थिती, बाजारातील बदल यामुळे कोणतेही एक क्षेत्र तेजीत कधीच राहत नाही. उदाहरण, तेलाचा तुटवडा झाल्याने महागाई वाढते. त्यामुळे कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य कमी झाल्याने म्युच्युअल फंडची कामगिरीही खराब होते. या घडामोडी कोणाच्याही हातात नसतात.
लिक्विडिटी रिस्क
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास लिक्विटीडीची रिस्क असते. म्हणजेच तुम्हाला योजनेतून बाहेर पडायचे असल्यास फंड हाऊसकडे पैसे असतील असे निश्चित सांगता येत नाही. फंड मॅनेजरची शेअर्स खरेदी विक्रीचे निर्णय चुकल्यास फंडातून बाहेर पडण्यास अडचणी येऊ शकतात. किंवा तोटा जास्त होऊ शकतो.
क्रेडिट रिस्क
फंड हाऊसद्वारे विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. या कंपन्यांनी बऱ्याच वेळा कर्ज विकत घेतलेले असते किंवा इतर कंपन्यांना दिलेले असते. आर्थिक मंदीच्या काळात कंपन्यांची कर्ज देण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे म्युच्युअल फंडने ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे त्याचे मूल्यही कमी होते.
व्याजदरातील धोके
जेव्हा व्याजदर खाली येतात तेव्हा इक्विटीमधील गुंतवणूक तेजीत असते. कारण, बाँड्समधून मिळणार परतावा कमी होतो. इक्विटीमधून जास्त व्याजदर मिळण्याची शक्यता वाढते. मात्र, जेव्हा व्याजदर जास्त असतात, तेव्हा इक्विटीकडे गुंतवणूकदार पाठ वळवतात. अशा परिस्थितीत कमी जोखीम असलेल्या बाँड्समधून इक्विटीपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो.
पूर्वग्रह आणि मार्केटमधील सूर
गुंतवणूक करताना बऱ्याच वेळा गुंतवणूकदाराचे पूर्वग्रह आड येतात. तसेच बाजारातील स्थिती पाहून घाई घाईने निर्णय घेऊन नुकसानही होऊ शकते. जेव्हा मंदीसदृश्य परिस्थिती असते. भांडवली बाजार खाली आलेला असतो. अशा परिस्थितीत म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे मूल्य कमी झालेले असते. गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा गुंतवणुकदार लावतात. मात्र, अशा परिस्थितीत संयम बाळगून दीर्घकाळ राहिल्यास फायदा होऊ शकतो.
प्रवाहाच्या विरोधात जाण्याची भीती
प्रवाहाच्या विरोधात जाण्यास अनेकांना भीती वाटते. जेव्हा सर्वजण गुंतवणूक काढून घेत असतात तेव्हा गुंतवणूक करण्यास सहसा कुणी धजावत नाही. मात्र, अशा वेळी गुंतवणूक केल्यास भविष्यात फायदेशीर ठरू शकते. कोरोना काळात याचा अनुभव सर्वांनी घेतला. ज्यांनी गुंतवणूक काढून घेतील नाही त्यांना नफा अनेक पटींनी वाढला.