Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Missed SIP Instalment: SIP चा हप्ता चुकल्यावर काय होते? खात्यात रक्कम नसल्यास दंड होईल का?

missing sip instalment

SIP चा हप्ता भरण्यासाठी बँक खात्यातून ऑटो डेबिट सुविधा वापरली जाते. मात्र, जर तुमच्या खात्यात रक्कम नसेल तर SIP बंद होते का? दंड आकारला जातो का? जर तुमच्या खात्यात रक्कम नसेल तर काय करायला हवे, जाणून घ्या.

Missed your SIP instalment: दरमहा काही रक्कम म्युच्युअल फंड योजनेमध्ये गुंतवणं हा सर्वात योग्य आणि सोपा पर्याय आहे. याद्वारे गुंतवणुकीची सवय आणि आर्थिक शिस्त लागते. मात्र, काही गुंतवणुकदारांना SIP चा हप्ता भरणं अनेक कारणांमुळं शक्य होतं  नाही. आर्थिक चणचण, अचानक आलेला मोठा खर्च, आणीबाणी यामुळे बँक खाते रिकामं होऊ शकते. अशा वेळी जर तुमच्या SIP चा हप्ता चुकला तर काय होते ते या लेखात पाहूया.

SIP चा हप्ता चुकल्यास घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही ज्या म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या (AMC) योजनेत पैसे गुंतवले आहेत, ती कंपनी दंड आकारत नाही. मात्र, ज्या ब्रोकर किंवा वितरक संस्थेकडून तुम्ही SIP सुरू केली असेल ती तुम्हाला दंड करू शकते. 

अनेक बँका म्युच्युअल फंड वितरकाचे काम करतात. जर तुमच्या बँक खात्यात पुरेसा बँलन्स नसेल तर Electronic Clearing Service (ECS) कडून पेमेंट विनंती अमान्य होईल. त्यासाठी बँक तुम्हाला दंड करू शकते. प्रत्येक ब्रोकर, डिस्ट्रिब्युटर त्यांच्या नियमाप्रमाणे दंड आकारेल. तीन महिने सलग SIP चा हप्ता चुकल्यास पॉलिसी बंद होऊ शकते. तुमच्या वितरक कंपनीशी संपर्क साधून याबाबतचे नियम जाणून घ्या. 

फक्त एकच महिन्यात हप्ता चुकल्यास पॉलिसी बंद होणार नाही. बँक खात्यात पैसे जमा करून पुढील महिन्यापासून हप्ता पुन्हा कापून घेतला जाईल. तुम्ही जर सतत हप्ते चुकवत असाल तर एसआयपी सुरू करण्याचा उद्देश सफल होणार नाही. कारण, दरमहा काही पैसे बाजूला काढून दिर्घकाळात संपत्ती निर्माण करण हे ध्येय तुम्हाला गाठायचे असते.  

SIP चा हप्ता चुकल्यास तुम्ही खालील गोष्टी करू शकता?

एसआयपीचा हप्ता चुकल्यास पुढील हप्ता येण्याआधी खात्यात पुरेशी रक्कम ठेवा. त्यामुळे नियमित हप्ता कट होईल आणि एसआयपी बंद पडणार नाही. 

एसआयपी तात्पुरती बंद करू शकता - जर तुम्ही आर्थिक अडचणींचा सामना करत असाल तर तुम्ही तात्पुरती एसआयपी बंद करू शकता. 

उदाहरणार्थ, ICICI बँकेच्या अॅपद्वारे तुम्ही जर एसआयपी योजना सुरू केली असेल तर तुम्ही मोबाइलवरून तीन महिन्यांसाठी एसआयपी तात्पुरती बंद करू शकता. त्यामुळे बँक तुम्हाला दंड करणार नाही. तसेच पॉलिसी बंद होणार नाही. तुमच्याकडे पैसे आल्यावर तुम्ही पुन्हा एसआयपी सुरू करू शकता. 

एसआयपी योजनेत बदल करू शकता - तुम्ही एसआयपी योजनेची तारीख, रक्कम, वर्षातून किती वेळा हप्ता कापून घेतला जावा, यासंबंधीच्या माहितीत बदल करू शकता. तुम्हाला ब्रोकर, वितरक कंपनीला याबाबत माहिती द्यावी लागेल. तुम्हाला जी तारीख सोईची ठरेल ती तारीख तुम्ही निवडू शकता.