Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Car Insurance Myths: सीएनजी किटमुळे कार विम्याचा प्रिमियम कमी होतो? इन्शुरन्स घेताना 'या' अफवांपासून राहा दूर

Car Insurance Myths

जर तुम्ही कार इन्शुरन्स घ्यायचा विचार करत असाल तर हे तुम्हाला माहिती असायला हवेच. कार विम्याबाबात अनेक अफवा आणि चुकीची माहिती पसरलेली आहे. त्यामुळे सखोल माहिती घेतल्यानंतर कार विमा घ्या. या लेखात पाहूया कार विम्याबाबत कोणती चुकीची माहिती पसरली आहे.

Car Insurance Myths: विमा खरेदी करताना अनेक वेळा अफवांचा सामना करावा लागतो. खोट्या माहितीच्या आधारे विमा घेतल्यास ऐनवेळी पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. कार विमा घेताना अशा अनेक अफवा किंवा खोटी माहिती तुमच्या पर्यंत येईल. या लेखात कार विम्याबाबत कोणती चुकीची माहिती पसरलीय ते पाहू. 

कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्सची गरज नाही

मोटार वाहन कायदा 1988 नुसार थर्ड पार्टी लायबिलिटी विमा संरक्षण प्रत्येक वाहनासाठी अनिवार्य आहे. मात्र, कॉम्प्रिहेन्सिव्ह विमा कव्हरमध्ये तुमच्या स्वत:च्या गाडीच्या नुकसानीपासून संरक्षण मिळते. त्याचबरोबर समोरील व्यक्तीच्या नुकसानीसही विम्याचे संरक्षण मिळते. अपघात सांगून होत नाही. त्यामुळे संपूर्ण सुरक्षा असलेले कधीही चांगले.

अपघात झाल्यास फक्त चालक जबाबदार असतो

अपघात झाल्यास गाडीचा मालक प्रामुख्याने जबाबदार असतो. समोरच्या व्यक्तीचे, गाडीचे, मालमत्तेचे जे काही नुकसान झाले असेल त्यास सर्वप्रथम जबाबदार वाहन मालक असतो.

कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्समध्ये सर्वकाही गोष्टींचा समावेश असतो

कॉम्प्रिहेन्सिव्ह विम्यातून अनेक गोष्टी वगळण्यात येतात. गाडीचे वापरामुळे झालेले नुकसान, टायर ट्यूब, मॅकॅनिकल/इलेक्ट्रिकल गोष्टींमुळे झालेले नुकसान, नशेमध्ये किंवा विना परवाना वाहन चालवताना अपघात झाल्यास विमा संरक्षण मिळत नाही. कोणतीही पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी सविस्तर माहिती वाचावी. 

जुन्या कारला चोरी जाण्याचा धोका कमी असतो

नव्या कारपेक्षा जुनी कार चोरी जाण्याची भीती जास्त असते. कारण, नव्या कारमध्ये अँटिथेफ्ट टेक्नॉलॉजी, जीपीएस, इंजिन लॉक, अलर्ट आणि अलार्म असे अनेक फिचर्स सहसा असतात. (Car Insurance Myths) त्यामुळे नवी कार चोरी होण्याची शक्यता कमी होते. त्या तुलनेत जुन्या कारमध्ये अत्याधुनिक फिचर्स नसतात. त्यामुळे जुनी कार चोरी होण्याचा धोका अधिक असतो. 

कारमधील सर्व वस्तुंनाही विमा संरक्षण असते

नाही. कारमधील सर्व वस्तुंना विमा संरक्षण नसते. कारमधील म्युझिक सिस्टिम, जीपीएस नेव्हिगेशन युनिट, सीएनजी, एलपीजी युनिटला विमा संरक्षण मिळते. मात्र, तुमच्या इतर वस्तू जसे की, पैसे, मौल्यवान दागिने चोरी गेल्यास संरक्षण मिळत नाही.

सीएनजी एलपीजी किटमुळे विम्याचा प्रिमियम कमी येतो

सीएनजी/एलपीजी गाड्यांचा सर्वाधिक वापर होतो, असे समजले जाते. रस्त्यावर जास्त म्हणजे अपघात होण्याची शक्यताही जास्त. त्यामुळे जोखमी पासून संरक्षण मिळण्यासाठी CNG/LPG किट असलेल्या गाड्यांना विमा प्रिमियम जास्त असतो. 

कारच्या रंगाचा प्रिमियमवर परिणाम होतो

नाही. कारच्या रंगाचा विमा प्रिमियमवर काहीही परिणाम होत नाही. (is car color affect insurance premium) कार कोणत्या वर्षी खरेदी केली, इंजिन क्षमता, नोंदणीचे ठिकाण, कारचा प्रकार/मॉडेल, असे घटक विम्याचा प्रिमियम ठरवतात. 

विमा कंपनी कार मालकाला आधी पैसे भरण्यास सांगते

कॅशलेस विमा पॉलिसी आणि रिम्बर्समेंट अशा दोन प्रकारे विम्याचा दावा मिळतो. कॅशलेसमध्ये पैसे थेट डिलरला विमा कंपनीद्वारे हस्तांतरित केले जातात. तुम्हाला फक्त उर्वरित काही रक्कम असेल तर तेवढी भरावी लागते. तर रिम्बर्समेंटमध्ये तुम्हाला सर्व पैसे आधी भरावे लागतात. नंतर विमा कंपनीकडून पैसे तुमच्या खात्यावर हस्तांतरित केले जातात. तुमची पॉलिसी ज्या प्रकारची आहे त्यानुसार हे लागू होते.