मुलांचे शिक्षण, लग्न आणि निवृत्तीनंतर आरामात आयुष्य जगता यावे, यासाठी भविष्यनिर्वाह निधी (PF) योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. मात्र, नोकरी सोडल्यानंतर अथवा 15 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पीएफ खात्यातून पैसे काढावे लागतात. पीएफ खात्यातून काढलेले पैसे कशात गुंतवावे, जेणेकरून नियमितपणे उत्पन्न सुरू राहील? अशा प्रश्न निर्माण होतो.
गुंतवणुकीचे अनेक असे वेगवेगळे मार्ग आहेत, ज्यात तुम्ही पीएफ खात्यातून काढलेले पैसे जमा करू शकता. अशाच गुंतवणुकीच्या काही पर्यायांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी
सर्वसाधारणपणे कर्मचाऱ्यांकडून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये (PPF) गुंतवणूक केली जाते. या दोन्हींमधील फरक समजून घेणे गरजेचे आहे. EPF मध्ये खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याचे खाते उघडले जाते. यात कर्मचाऱ्याच्या पगारातील काही रक्कम व कंपनीच्या माध्यमातून अशी दोन्ही मिळून रक्कम जमा केली जाते. तसेच, कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर यातून रक्कम काढू शकतो.
तर PPF खाते कोणतीही भारतीय व्यक्ती उघडे शकते व या खात्यात वर्षाला दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. यात गुंतवलेल्या रक्कमेचा मॅच्युरिटी कालावधी हा 15 वर्ष असतो. यानंतर यातून रक्कम काढता येते.
आपत्कालीन निधीची करा तरतूद
EPF असो अथवा PPF, दोन्ही खात्यातील पैसे हे भविष्यातील गरजांसाठी गुंतवलेले असतात. त्यामुळे या खात्यातून काढलेल्या पैशांचा वापर अनावश्यक खर्चासाठी करणे टाळावा. हे पैसे आपत्कालीन स्थितीसाठी सांभाळून ठेवावे. भविष्यात कोणतीही आर्थिक समस्या आल्यास आपत्कालीन निधीची मदत होईल.
नियमित उत्पन्नासाठी पीएफ खात्यातील रक्कम गुंतवण्याचे मार्ग
स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड | तुम्ही पीएफ खात्यातील रक्कम लाभांश देणारे स्टॉक्स व सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनसह येणाऱ्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता. यातील गुंतवणुकीमुळे तुम्हाला नियमित उत्पन्न सुरू होईल. |
रिअल इस्टेट | पीएफ खात्यात अनेक वर्ष जमा झालेल्या रक्कमेचा आकडा मोठा असतो. एकाचवेळी मोठी रक्कम उपलब्ध झाली असल्याने, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता. रिअल इस्टेट भाड्याने दिल्यास दरमहिन्याला नियमित पैसे मिळतील. |
रिव्हर्स मॉर्गेज | तुम्ही जर रिव्हर्स मॉर्गेज सुविधेच्या माध्यमातून कर्ज घेतलेले असल्यास पीएफचा वापर हे कर्ज फेडण्यासाठी करू शकता. रिव्हर्स मॉर्गेजची रक्कम फेडल्याने घरावर तुमचीच मालकी राहील. याशिवाय, तुम्ही हे कर्ज फेडून पुन्हा नवीन कर्जासाठी अर्ज करू शकता. |
मुदत ठेव | इतर कोणत्याही गुंतवणुकीच्या तुलनेत मुदत ठेवीमध्ये नियमित व सुरक्षितरित्या परतावा मिळतो. पीएफ खात्यातून काढलेली रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी व नियमित व्याज मिळावे यासाठी मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करू शकता. |
पोस्ट ऑफिस योजना | ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिस व सरकारच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहिन्याला नियमित पेन्शन सुरू होईल. तुम्ही जेवढी जास्त रक्कम गुंतवाल, तेवढे अधिक पेन्शन मिळेल. |