Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर बाजार ठरतोय मायाजाल? काय आहेत शेअर मार्केट मधील Scams

share market scams

वर्षांनुवर्ष लोकांना कमी वेळेत अधिक पैसे मिळवून देण्याची जाहिरात करून त्यांची आर्थिक फसवणूक करत असलेल्या काही फ्रॉड इन्व्हेस्टमेंट स्कीम

दरवर्षी शेअर मार्केट आणि गुंतवणुकीच्या संदर्भात फसवणुकीच्या घटना घडत असतात. वर्षानुवर्ष लोक फसत आहेत. लोकांनी मेहनतीने कमावलेले लाखो रूपये बुडतात. चला आज आपण अशाच काही योजना पाहणार आहोत. ज्या लोकांची फसवणूक करताना दिसतात आणि तरीही लोक वर्षानुवर्षे त्याला बळी पडत आहेत.

share market scams 

पॉन्झी स्कीम : 

घोटाळेबाज लोक अनेक गुंतवणुकदारांकडून काही टक्के पैसे कमी वेळेत कमवून देण्याच्या बहाण्याने पैसे गोळा करतात. त्यानंतर त्याच गुंतवणुकदारांच्या पुढील साखळीतील लोकांकडून आधीच्या लोकांना त्या प्रमाणात पैसे दिले जातात. नवीन गुंतवणूकदार मिळेपर्यंत किंवा घोटाळेबाज पैसे घेऊन पळून जाईपर्यंत ही स्कीम सुरू असते. बर्नी मॅडॉफ हे अशा प्रकारच्या स्कीमचे एक मुख्य उदाहरण होते.  

विश्वासार्ह प्रणाली (Trusted System) घोटाळा : 

घोटाळ्याच्या या थोड्या वेगळ्या प्रकारामध्ये, घोटाळेबाज बऱ्याचवेळा प्रसिद्ध व नामांकित पेपरमध्ये किंवा गुगल ऍड वर्ड्स  किंवा त्यांनी विकसित केलेल्या एका विश्वासार्ह प्रणालीमधून आणि ईमेलद्वारे जाहिरात करतात. ते ठराविक वेळेत भरघोस व्याजदर म्हणजेच इंटरेस्ट देण्याची जाहिरात करत असतात. बहुतेक नवखे / कमी अनुभव असलेले  गुंतवणूकदार या अशा जाहिरातींना भुलतात आणि स्वत:चे कष्टाचे पैसे अशा स्कीममध्ये गुंतवून त्यांच्या सापळ्यात अडकतात. असे अनेक जण सापडले की घोटाळेबाज पैसे घेऊन पळून जातात.      

50-50 घोटाळा : 

अशा प्रकारच्या घोटाळ्यात एक पत्रक लोकांना पाठवले जाते ज्यात विशिष्ट स्टॉक खरेदी किंवा विक्री करण्याची शिफारस केली जाते. या अशा पत्रकांमधून किंवा माहितीवजा जाहिरातींमधून साधारणतः 50%  लोकांना खरेदीचा तर इतर 50 % लोकांना विक्रीचा सल्ला  मिळतो. अनपेक्षणितपणे 50% लोकांना योग्य सल्ला मिळतो. मग अशा यशस्वी ठरलेल्या लोकांना आणखी एक पत्रक पाठवले जाते. त्यामध्ये पुन्हा एकदा 50%  लोकांना खरेदीचा तर 50% लोकांना विक्रीचा सल्ला मिळतो. ही प्रक्रिया अशीच कमी आणि यशस्वी गुंतवणुकदारांचा गट शिल्लक असेपर्यंत चालत राहते. या गटासाठी मग सबस्क्रिप्शन ऑफर किंवा पोर्टफोलिओ मॅनेज करून देऊ अशी ऑफर दिली जाते. साहजिकच काहीजण याला बळी पडतात. साधारण यातले सगळेच ह्या घोटाळेबाजाकडून वेगवेगळ्या पद्धतीने फसवले गेलेले असतात. त्यांचे पैसे डुबलेले असतात. काही काळाने हीच योजना वेगळ्या नावाने परत मार्केटमध्ये आणली जाते आणि पुन्हा नवनवीन लोक ह्याला बळी पडतात.      

पंप आणि डंप : 

हा घोटाळा  स्मॉल-कॅप शेअर वर आधारलेला असतो. घोटाळेबाज  कंपनीबद्दल खोटी आणि दिशाभूल करणारी पॉझिटीव्ह स्टेटमेंट्स पसरवून कंपनीच्या स्टॉकच्या किमती वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी काही एजंट आणि जाहिरातदार नेमले जातात. जे पूर्णवेळ याच्यासाठी काम करतात. या घोटाळेबाजांना एकदा हवी ती किंमत मिळाली की, ते बाजारातून त्यांचा नफा काढून घेतात. आणि शेवटी किरकोळ गुंतवणूक करणारे यात पूर्णपणे अडकतात आणि त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.

ब्रॉयलर रूम घोटाळा : 

ही पंप आणि डंप घोटाळ्याची दुसरी आवृत्ती आहे. ज्यामध्ये गुंतवणूकदारांना धोकादायक स्टॉक खरेदी करण्यास प्रवृत्त करणे आणि त्याद्वारे स्टॉकची कृत्रिम मागणी निर्माण करणे असे प्रकार केले जातात. एकदा किमती पुरेशा प्रमाणात  वाढल्या की स्टॉक त्वरित विकून टाकले जातात.

सर्क्युलर ट्रेडिंग : 

या योजने अंतर्गत घोटाळेबाज एकमेकांचे शेअर्स खरेदी करतात आणि विकतात. अनेकवेळा स्वत:हून शेअर्सच्या किमती वाढवतात. किमतीतील ही अचानक झालेली वाढ इतर ट्रेडर्सना आकर्षित करते. ते मग झटपट नफा मिळविण्यासाठी भरमसाठी शेअर्स विकत घेतात. दरम्यान, अशा कंपन्यांची बाजारात जाहिरात करण्यासाठी, तिची फेस व्हॅल्य़ू वाढवण्यासाठी किंवा लोकांना आकर्षित करण्यासाठी पैसे देऊन लोक नेमले जातात. पण काही दिवसांनी अधिक पैसे देऊन विकत घेतलेल्या ह्या शेअर्सची भाव झरझर खाली येतात आणि याचा सगळा फायदा सर्क्युलर ट्रेडिंग मध्ये सहभागी झालेल्या घोटाळेबाजांना होतो. 

खरं तर  “वॉल स्ट्रीट स्टोरीज” या पुस्तकात, एडविन लेफेव्हरे या प्रसिद्ध लेखकाने वरीलपैकी अनेक घोटाळ्यांच्या प्रकारांवर प्रकाश टाकला आहे. परंतु दर वेळेस घोटाळेबाज लोकांच्या असहायतेचा किंवा शेअर बाजारातील अशिक्षितपणाचा फायदा घेऊन त्यांना फसवत राहतात. म्हणून नेहमी विविध घोटाळ्यांपासून सावध राहूनच सुरक्षित गुंतवणूक करा.