What is Infrastructure MF: इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड हा सेक्टोरल (क्षेत्रीय) फंड आहे. अर्थव्यवस्थेतील एखाद्या ठराविक क्षेत्रात म्युच्युअल फंड योजनेद्वारे पैसे गुंतवले जातात. जसे, आयटी फंड, डिफेन्स फंड, बँकिंग फंड आहेत. त्याचप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड आहे. बांधकाम आणि निर्माण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये या फंडाद्वारे गुंतवणूक केली जाते.
भांडवली वस्तू निर्मिती, बांधकाम कंपन्या, पॉवर, टेलिकॉम, पेट्रोलियम प्रॉडक्ट्स, इंडस्ट्रियल उत्पादने क्षेत्रातील कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले जातात.
एक वर्षांत दोन फंडातून 40% पेक्षा जास्त परतावा
iStock संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, मागील 3 वर्षात इन्फ्रास्ट्रक्चर फंडांनी सरासरी 35.49% परतावा दिला तर पाच वर्षात 15.61% परतावा दिला. टॉप दोन फंडांनी एका वर्षात 40% पेक्षा जास्त परतावा दिला. निप्पॉन इंडिया पॉवर अँड इन्फ्रा फंड आणि एचडीएफसी इन्फ्रास्ट्रक्चर फंडने मागील एक वर्षात अनुक्रमे 42.53% आणि 41.08% परतावा दिला.
सात फंडांतून 30% पेक्षा जास्त परतावा
आदित्य बिर्ला एसएल इन्फ्रा फंड, आयसीआयसीआय प्रू इन्फ्रा फंड, बंधन इन्फ्रा फंड, एचएसबीसी इन्फ्रा फंड, डीएसपी इंडिया T.I.G.E.R फंड, फ्रँकलिन बिल्ड इंडिया फंड आणि कोटक इन्फ्रा आणि इको रिफॉर्म फंडने एक वर्षाच्या कालावधीत 30% पेक्षा जास्त परतावा दिला.
इन्फ्रास्ट्रक्टर फंडातील धोके काय आहेत?
ज्या गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता जास्त आहे त्यांच्यासाठी सेक्टोरल फंड योग्य असतात, असा सल्ला गुंतवणूक तज्ज्ञ देतात. एखाद्या ठराविक क्षेत्रातच पैसे गुंतवले जातात. (What are Infrastructure Mutual Funds) जर त्या क्षेत्राची कामगिरी खराब राहिली तर तोटा होण्याची शक्यता असते. एखाद्या क्षेत्राची सखोल माहिती असणाऱ्या व्यक्तींनीच या फंडात शक्यतो गुंतवणूक करावी. कारण, गुंतवणुकीतून कधी बाहेर पडावे किंवा किती काळापर्यंत थांबावे हा निर्णय महत्त्वाचा ठरतो.
दीर्घकाळात ठरू शकतात फायदेशीर
दीर्घकाळ गुंतवणुकीचे उद्दिष्ट असेल तर हे फंड तुमच्या फायद्याचे ठरू शकतात. सात वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक ठेवण्याचा सल्ला गुंतवणूक सल्लागार देतात. तसेच तुमच्या पोर्टफोलिओपैकी 10% पेक्षा जास्त पैसे सेक्टोरल फंडात शक्यतो नसावेत. अर्थव्यवस्थेतील बदलांनुसार विविध क्षेत्रांची कामगिरी बदलत असते. त्यामुळे घाईघाईत गुंतवणुकीचा निर्णय न घेता विचारपूर्वक अभ्यास करून निर्णय घ्यावा.
(डिसक्लेमर : शेअर मार्केट, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            