Farming Idea: आजही अनेक शेतकरी वर्षानुवर्षे पारंपारिक पिके घेऊन, पारंपारिक पद्धतीनेच शेती करतात. परंतु, अनेक वर्षांपासून एकच एक पिक घेतल्यास शेतीचा पोत खराब होतो आणि त्यामुळे पाहीजे तसे उत्पन्न शेतकऱ्याला मिळत नाही. काही वर्षानंतर शेतात वेगवेगळी पिके घेतली गेली पाहिजे. तसेच शेती करण्याची पद्धत देखील सुधारली पाहिजे. यामुळे शेतीचा पोत सुधारतो. सोबतच विविध पिके घेतल्यास शेतकऱ्याला चांगला नफा देखील होतो. आज आपण शेतकऱ्यांना खरबूजची शेती करायची असल्यास, कशा प्रकारे करायला हवी. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
नफा देणारे पिक
नांदेड जिल्ह्यात राहणारे शेतकरी नवनाथ देशमुख यांच्या कडे साडेपाच एकर शेती आहे. वडिलोपार्जित मिळालेल्या या शेतीमध्ये नवनाथ हे आधी सोयाबीन, ऊस, हरभरा असे पिक घ्यायचे. परंतु, या शेतीवर कुटुंबाचा आर्थिक खर्च भागत नसे. त्यामुळे नवनाथ यांनी बागायती शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी शेतीचा आणि मार्केटचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी खरबूजची शेती करण्याचे ठरवले. आता ते गेल्या दहा वर्षापासून खरबूजाची शेती करीत आहेत. या शेतीमुळे नवनाथ देशमुख यांना चांगला नफा मिळतो आहे.
खतांचा वापर
खरबूजाची शेती ही सेंद्रिय पद्धतीने सुद्धा अधिक चांगल्या प्रकारे केली जाऊ शकते. यासाठी शेणखत, गांडूळ खत, डिकंपोस्ट खत, जीवामृत यासारख्या गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो.
कशी केली जाते लागवड?
खरबूजाची शेती करण्याकरीता दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात रोपवाटिका तयार केली जाते. म्हणजे ट्रे मध्ये कोकोपीट टाकून त्यात खरबूजाचे बी रुजवले जाते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला या रोपांची पूर्नलागवड केली जाते. आठ फूटाचे अंतर आणि चार फूटाचा गादी वाफा तयार करुन झिगझॅग पद्धतीने पॉली मल्चिंग पेपरच्या आधारे रोपांची लागवड केली जाते. या सर्व प्रोसेस दरम्यान गांडूळ खताचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. खरबूजाची लागवड 3 टप्प्यांमध्ये केली जाते. ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत तीन ते चार टप्प्यांमध्ये लागवड केली जात असल्याची माहिती नवनाथ यांनी दिली.
खर्च आणि नफा किती?
साडेचार एकर शेतीमध्ये तीन ते चार टप्प्यांमध्ये या पिकाचे उत्पन्न घेण्यासाठी दरवर्षी दीड ते 2 लाख रुपये खर्च येतो. तर एक एकरला 18 ते 20 टन माल निघतो. हा माल मार्केटला नेऊन तसेच शेतकऱ्याकडून स्टॉल लावून स्वत: विक्री केला जातो. मार्केटला खरबूजला 16 हजार ते 20 हजार रुपये टन एवढा भाव आहे. त्यामुळे नवनाथ यांना वर्षाला 10 लाख रुपये नफा मिळतो, अशी माहिती नवनाथ यांनी दिली.