Direct to Mobile TV: मोबाइलवर इंटरनेटशिवाय लाइव्ह टीव्ही पाहता येईल अशा प्रकल्पावर टेलिकॉम मंत्रालय आणि आयआयटी कानपूर काम करत आहे. डायरेक्ट टू होम (DTH) जसे टीव्हीवर विना इंटरनेट पाहता येते तसे डायरेक्ट टू मोबाइल टीव्ही पाहता येऊ शकतो. यावर लवकरच सरकारची महत्त्वाची बैठक आहे.
ऑनलाइन एज्युकेशनसह इतर अनेक फायदे
भारतामध्ये 80 कोटींपेक्षा जास्त मोबाइल वापरकर्ते आहेत. तसेच मोबाइलद्वारे जो कंटेट पाहिला जातो त्यात 80% वाटा व्हिडिओचा आहे. जर डायरेक्ट टू मोबाइल टीव्ही इंटरनेटशिवाय सुरू झाला तर त्याचे अनेक फायदे नागरिकांना मिळणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी सरकारी एज्युकेशन प्रकल्प, अभ्यासक्रम, आणीबाणीच्या काळासाठी सूचना, मनोरंजन थेट लोकांच्या मोबाइलमध्ये येईल.
मोबाइलवर टीव्ही पाहताना इंटरनेट लागणार?
डायरेक्ट टू मोबाइलची खासियत ही आहे की तुम्हाला इंटरनेटची गरज लागणार नाही. त्यामुळे ज्या प्रमाणे आपण घरात टीव्ही पाहतो तसा टीव्ही थेट मोबाइलवर पाहता येईल. मोबाइल इंटरनेट कायम अस्थिर असते. नेटवर्क इश्यूमुळे एकसारखा इंटरनेट स्पीड मिळत नाही. मोबाइलवर इंटरनेट शिवाय टीव्ही पाहता आल्यास ही नागरिकांपर्यंत माहिती पोहचवण्यातील क्रांती असेल.
सर्व विभागांची बैठक होणार
मोबाइल टीव्ही सुविधा लागू करण्याआधी सरकार सर्व विभागांची एक बैठक घेणार आहे. या बैठकीला टेलिकॉम मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, टेलिकॉम कंपन्यांचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित असतील. पुढील आठवड्यात ही बैठक होण्याची शक्यता आहे, असे इकॉनॉमिक्स टाइम्सने म्हटले आहे.
टेलिकॉम कंपन्यांचा विरोध होण्याची शक्यता
मोबाइल टीव्ही सुरू करण्यास टेलिकॉम कंपन्यांचा विरोध होऊ शकतो. कारण, ग्राहकांच्या डेटा वापरातून कंपन्या मोठा नफा कमावतात. जर लाइव्ह टीव्ही ग्राहकांना मिळाला तर कंपन्यांचा इंटरनेट डेटाचा वापर कमी होईल, पर्यायाने कंपन्यांचे उत्पन्नही कमी होईल. त्यामुळे टेलिकॉम कंपन्या मोबाइल टीव्ही सुरू करण्याच्या निर्णयाचा विरोध करू शकतात.
नागरिकांना होऊ शकतो फायदा
टीव्ही ब्रॉडकास्ट सुरू झाल्यास नागरिकांना टीव्ही चॅनलवरील सर्व कार्यक्रम मोबाइलवर पाहता येतील. त्यासाठी कोणताही इंटरनेट रिचार्ज करण्याची गरज नाही. ही सुविधा सुरू झाल्यास इंटरनेटचा रिचार्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. मात्र, युट्यूब, इंटरनेट, विविध अॅप आणि संकेतस्थळे वापरण्यास इंटरनेट ग्राहकांना लागेल. त्यासाठीचे रिचार्ज खाली आले तर ग्राहकांचा फायदा होईल.