आर्थिक वर्ष 2021-22 चे प्राप्तीकर रिटर्न सादर करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे. शेवटच्या क्षणी रिटर्न भरताना नेमके काय करावे याची माहिती बऱ्याच जणांना नसते. पण रिटर्न भरण्यापूर्वी संबंधित कागदपत्रांची योग्यप्रकारे पूर्वतयारी केली तर शेवटच्या क्षणी होणाऱ्या चुका टाळता येतात.
महत्त्वाची कागदपत्रे गोळा करा
रिटर्न फाईल जुन्या टॅक्सच्या पावत्या, उत्पन्न व गुंतवणुकीच्या पावत्या, फॉर्म 26 AS, फॉर्म 16 यांची गरज लागते. फायलिंगची प्रक्रिया लगेच व्हावी यासाठी ही सर्व कागदपत्रे एकत्रित जवळ ठेवा. रिटर्न फॉर्म भरल्यानंतरही सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवण्यास विसरू नका. कारण रिटर्नचे व्हेरिफिकेशन करतेवेळी तुम्हाला या या कागदपत्रांची पुन्हा गरज भासू शकते.
सर्व उत्पन्नांची माहिती द्या
तुम्हाला जितक्या प्रकारे आणि ज्याच्यातून उत्पन्न मिळते अशा सर्व गोष्टींची माहिती प्रमाणिकपणे द्या. तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नावर टॅक्स लागतो किंवा नाही, हे महत्त्वाचे नाही. तुमचे उत्पन्न तिथे दिसणे महत्त्वाचे आहे. तुम्ही काही माहिती लपवून ठेवण्याचा किंवा चुकून देण्यास विसरल्यास तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो. काही प्रमाणात कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
स्वत:च हिशोब तपासा
टॅक्सच्या पावत्या, बचत आणि गुंतवणूकीच्या रक्कमा यांचा हिशोब तुम्ही स्वत:च तपासून घ्या. तुमचे उत्पन्न, खर्च आणि गुंतवणूक ही तुमच्याशिवाय अधिक कोणाला माहित असणार. त्यामुळे त्याची योग्य पद्धतीने पडताळणी करा. यासाठी इंटरनेटवरील विविध पर्यायांचा वापर करा आणि तुमचा हिशोब तुम्हीच चोख ठेवा. यामुळे ऐनवेळी होणाऱ्या चुका टाळण्यास मदत होते.
रिटर्न फाईल केल्यानंतर ITR तपासा
रिटर्न ऑनलाईन पद्धतीने फाईल केल्यानंतर ते नेटबँकिंग, आधार कार्ड किंवा मोबाइल – ईमेलद्वारे व्हेरिफाय करून घ्या. रिटर्न व्हेरिफाय झाल्यानंतरच इन्कम टॅक्स विभागाकडून त्याच्यावर पुढील प्रक्रिया केली जाते. रिटर्न फाईल केल्यानंतर त्याची प्रत इन्कम टॅक्स विभागाला पोस्टाने पाठवण्याची गरज नाही. पण ज्यांना ऑनलाईन आयटीआर व्हेरिफाय करता येत नाही त्यांना तो इन्कम टॅक्स विभागाला पोस्टाने पाठवावा लागतो.